महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,24,123

नृत्य गणेश

By Discover Maharashtra Views: 2578 2 Min Read

नृत्य गणेश (होट्टल, ता. देगलूर, जि. नांदेड)

होट्टल येथील सिद्धेश्वर मंदिराच्या बाह्यअंगावर उत्तरेला ही अप्रतिम अशी नृत्य गणेशाची तीन फुट उंच सुबक मूर्ती आहे. हा सहा हातांचा गणेश आहे. उजव्या बाजूला वरच्या हातात परशु आहे. उजव्या मधल्या हातात भग्नदंत आहे. डाव्या बाजूला वरच्या हातात नाग आहे. डाव्या मधल्या हातात मोदक आहेत.(नृत्य गणेश)

खालचे दोन्ही हात सुंदर अशा नृत्यमुद्रेत आहेत. डाव्या हाताच्या या मुद्रेला “गजहस्त” असे म्हणतात. डावा पाय जमिनीवर समर्थपणे रोवलेला आहे याच्या नेमकं उलट उजव्याचा केवळ अंगठाच कलात्मकरित्या वळवून जमिनीवर टेकवला आहे. अगदी असं वाटतं प्रत्यक्ष गणराज नाचत असताना त्याचे छायाचित्र घेतले आणि त्या छायाचित्रावरून हे शिल्प कोरले. मेखलेची मी माळ मध्यभागी खाली सुटली आहे ती बरोबर डावीकडे झुकली आहे. केवळ स्थीर उभा गणेश असता तर ही माळ ओळंबा रेषेत जमिनीच्या दिशेने सरळ दाखवली असती. माथ्यावरच्या मुकुटाच्या झिरमाळातील मध्यभागीचे पदकही जरा डावीकडे झुकलेले दाखवले आहे.

डावा पाय सरळ असल्याने ती मेखला खाली दिसते आहे तर उजवा पाय वर उचलला असल्याने मेखलेची माळ वर सरकली आहे. शिल्पकाराची खरेच कमाल आहे. गणेशाचे वाहन मुषक खाली उजव्या बाजूला आहे. या भागातील अशा काही कलात्मक मूर्तीतून संगीत या प्रदेशात समृद्ध असल्याचे पुरावे मिळतात.

फोटो सौजन्य – Travel Baba.

-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद.

गणेशाचं हे रुप खरोखरच मनाला मोहीत करते.शैव संप्रदायाच्या विचारांतून नटेश आणि नर्तन करणार्या शिवाची मुर्ती निर्माण झाली आणि गाणपत्य संप्रदायाचा प्रभाव वाढला तसे नर्तन करणारा गणपती निर्माण झाला. हा भाग वेगळा पण नटेशापेक्षा नर्तन करणारा गणेश अधिक लोभसवाणी दिसतो हे निःसंशय.

Leave a Comment