चहाच्या टेबलवरील जुन्या आश्चर्यकारक वस्तू भाग २ |
Old items on the tea table
(मिशीवाल्यांसाठी विशेष प्रकारचा कप)
चहा हा एखाद्या छान रंगलेल्या मेहफिलीसारखा, संगतीत रंगून घेतला जातो तसा तो घाईघाईत ढोसलाही जाऊ शकतो. कधीकधी तो एकट्यानेच आठवणीत गुंगून समाधिस्त अवस्थेत घेतला जातो तर कधी व्यसनासारखा कटिंग कटिंगने प्यायला जातो. पण टेबलवर, काही जणांच्या संगतीत साग्रसंगीतपणे चहा घेणे हा एक मोठा खानदानी शिष्टाचार आहे. या चहापानाच्या समारंभाला अधिकाधिक ‘स्टेटस ‘ देण्यासाठी कितीतरी खास वस्तूंची निर्मिती केली जाते. अशा काही गंमतीदार ‘चहा कुटुंबीयांची ‘ ही ओळख….
१) किटलीचा दिवा आणि कटिंग चहाच्या मेणबत्त्या — टेबलवर काहीशा मंद प्रकाशात चहाची लज्जत काही वेगळी असावी. खालील छायाचित्रात दिसणारी छोटी किटली ही पितळी असून त्यावर असलेला रॉकेलचा दिवा आवश्यक तेवढाच मंद प्रकाश देतो. पंतप्रधान मोदी यांनी आपण पूर्वायुष्यात चहा विक्रेते होतो हे अभिमानाने सांगितल्यानंतर ‘ कटींग चहासंस्कृती’लाही एक स्टेटस लाभला. याचा संदर्भ घेऊन मी माझ्या एका मेणबत्त्या बनविणाऱ्या मित्राकडून दोन खास मेणबत्त्या बनवून घेतल्या. एका क्रेटमधील दोन ग्लासात अगदी चहाच्या रंगाच्या मेणाच्या या मेणबत्त्या ह्या लांबून दोन कटींग चहा आणून ठेवल्यासारख्या वाटतात. हे दोन्हीही दिवे चहाचा संदर्भ लाभल्याने टेबलवर छान शोभून दिसतात.
२) माझ्याकडे डोग्रा शैलीतील एक छान कोरीव काम असलेला पितळी कप आहे. हा जरी ६ औंस चहा राहील इतका छोटा असला तरी वजनाला मात्र तो चांगला जड आहे. चहा हा औंसांमध्ये मोजला जात असे. आपल्या वापरातील सर्वसाधारण कपात ८ ते १० औंस चहा राहतो तर कॉफीमग मध्ये १० ते १२ औंस राहतो. आपल्या देशात चहा पिणे हे तसे खूप जुने ! पण आपल्याकडे तो चिनीमातीच्या कपबश्यांऐवजी धातूच्या भांड्यातून पिण्याचा प्रघात होता. मुंबईसारख्या प्रगत शहरामध्ये अगदी आजसुद्धा कित्येक दाक्षिणात्य हॉटेलमधून चहा हा छोटी स्टीलची पातेली आणि भांडे या संचातून दिला जातो.
३) पूर्वी तुमचा चहा कुठून आयात केलेला आहे यावरही स्टेटस ठरत असे. तुमच्या ब्रेकफास्टला मॉरिशसच्या अँटिक टी इस्टेट मधील चहा असेल तर मग “क्या बात है” ! हा सर्व उल्लेख असलेला आणि घट्ट झाकणाचा पितळी खास डबा हा चहाच्या टेबलवरचा स्टेटसवाला पाहुणा !!
४) आमच्याकडे सुमारे ७० / ७५ वर्षांपूर्वीचा एक टी सेट आहे. यातील कपाची काच अक्षरशः कागदासारखी पातळ असून त्यावरील चित्रांमध्ये अल्पशा प्रमाणात खऱ्या सोन्याचा वापर केलेला आहे. या कपामध्ये तुम्ही डोकावून पहिले तर स्वच्छ नितळ तळ दिसतो. पण जर याच कपाचा तळ प्रकाशाकड़े धरून पाहिल्यास यामध्ये एका जपानी गेशाचा चेहरा दिसतो. जपानी परंपरागत गेशा म्हणजे विविध कलांमध्ये पारंगत असलेली आणि यजमानांचे मनोरंजन करणारी स्त्री असायची. तुम्ही हातात कप धरून चहा पिताना, कप रिकामा होत जातो तस तसा त्याचा तळ वरवर जातो. कप पूर्ण रिकामा झाल्यावर तळाशी या गेशाचे दर्शन होणे ही एक आगळीवेगळी रसिकताच म्हणायची ! ( सोबतच्या छायाचित्रात हा पूर्ण टी सेट आणि तळाशी दिसणारी गेशा )
५) कपबशीमध्ये चहा दिल्यावर, शिष्टाचारानुसार फक्त कप तोंडाला लावूनच तो प्यायचा. पण समजा तुम्ही तो बशीत ओतून प्यायलात तर चहाने माखलेला कपाचा तळ, टेबलवरच आपला गोल ठसा उमटवतो. तो उमटू नये म्हणून मग हे कप ठेवण्यासाठी ” टी कोस्टर्स ” अवतरले. लाकूड, शिंपले, काच, प्लॅस्टिकपासून ते अगदी चांदी, हस्तिदंत, मौल्यवान जवाहीर जडवलेले कोस्टर्स अस्तित्वात आले. माझ्याकडे चक्क संगीताच्या रेकॉर्डसारखे टी कोस्टर्स आहेत. त्यावर तुम्ही कप ठेवायचा. तुमच्या चहा मैफिलीला ही जराशी अव्यक्त संगीताची जोड !!
६) माझ्या संग्रहातील सर्वात भन्नाट वस्तू म्हणजे चहा पिणाऱ्या मिशीवाल्यांसाठी खास निर्माण केलेला कप ! १८५० ते १९०० पर्यंत इंग्लंडमध्ये मोठ्या मिशा ठेवायची फॅशन लोकप्रिय होती. या मिशा ताठ आणि नीटनेटक्या राहण्यासाठी मिशांना खास प्रकारचे मेण लावले जात असे. अशा मेण लावलेल्या मिशीवाल्याने चहाचा कप तोंडाला लावला की गरम चहा आणि वाफांमुळे त्याच्या मिशांचे मेण वितळत असे. ते चहात मिसळत असे आणि मिशांची शानही जात असे. मिशांना चहाकॉफीचे डाग पडत असत. यावर उपाय म्हणून हार्वे अॅडम्स या ब्रिटिशाने १८६० मध्ये चिनीमातीच्या एक विशेष कप तयार केला. चहा पिण्यासाठी कपाला जेथे तोंड लावले जाते तेथे त्याने एक मजेदार आडवी पट्टी बसवली आणि ओठांशी लंबगोलाकार मोकळी जागा ठेवली. त्यामुळे कप तोंडाला लावला तर या मोकळ्या जागेतून चहा तोंडात जात असे पण आडव्या पट्टीमुळे त्याचा मिशीला अजिबात स्पर्श होत नसे. यामध्ये आणखी एक अडचण निर्माण झाली. चहाचा कुठलाही साधा कप हा डावखुरा माणूस कपाचा कान डावीकडे करून वापरू शकतो. पण अशी पट्टी बसविलेला ” मिशीवाल्यांचा कप ” कानाची दिशा फिरवून वापरता येत नाही. मग चक्क अशा मिशीवाल्या डावऱ्यांसाठीही वेगळे, डाव्या कानाचे कप बनविण्यात आले. वस्तूसंग्राहकांमध्ये हे मिशीवाले कप आजसुद्धा प्रिय असून ते असे कप, खूप मोठ्या रकमेला ( ऑनलाईन सुद्धा ) विकत घेतात. भारतात धातूच्या भांड्यांमधून चहा प्यायला जात असल्याने येथे धातूचे ‘ मिशीवाले कप ‘ बनविले जात असत.
आपल्या बऱ्याच जुन्या पाहुण्यांच्या आज नव्याने ओळखी झाल्या. चला जरा चहा घेऊ या !!
माहिती साभार – Makarand Karandikar