तेव्हाची तिजोरी | पूर्वींचा लॉकर / सेफ डिपॉझिट व्हॉल्ट
पूर्वी गावागावातून एक बरे होते. बहुतेक कुटुंबांच्या गरजेच्या उदा. भाज्या, फळे, धान्य इ. गोष्टी स्वतःच पिकवल्या जात असत . वस्तुविनिमय ( barter system ) पद्धत अस्तित्वात होती. जे आपल्याकडे जास्त आहे ते दुसऱ्याला देऊन त्याच्याकडून आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी घेतल्या जात असत. त्यामुळे रोख रकमेचा कमीतकमी वापर करणारा रोकडविरहित (cashless) असा समाज तेव्हां होता.तिजोरी.
घरात चोरी होण्यासारखी जोखमीची वस्तू म्हणजे घरातील दागिने, जडजवाहीर ! तांबे-पितळ-जर्मन सिल्वर इत्यादींच्या भांड्यांमध्ये चोरांना रसच नव्हता. चांदीही तशी स्वस्तच असल्याने चांदीच्या भांड्यांनाही चोरांकडून फारशी मागणी नसायची. पण परंपरागत सोन्याचे आणि जडजवाहीर जडविलेले दागिने मात्र मालक आणि चोर यांच्या खूप आवडीचे असत. घरात असणारी खूप माणसे, गडी माणसे, शेजारीपाजारी इत्यादींमुळे मोठी चोरी किंवा दरोडा घालणे इतके सोपे नव्हते. घरातली महत्वाची कागदपत्रे कपाटात बोचकी बांधून ठेवली जात असत. पण मग दागदागिने …..त्यांचे काय ? .
दागदागिन्यांसाठी अगदी सर्रास नसला तरी अनेक घरांमध्ये एक हंडीसारखा किंवा मोदकपात्रासारखा पितळेचा किंवा तांब्याचा डबा वापरला जात असे. या डब्याच्या झाकणाला बिजागर, छोटे कुलूप लावायला कडीकोयंडा आणि झाकणावर आणखी एक कडी असायची. घरातील मुख्य स्त्रीच्या अखत्यारीत एकच सामाईक डबा किंवा प्रत्येक स्त्रीचा स्वतंत्र एकेक डबा असे. याला छोटेसे कुलूप लावून अनेकदा त्याची किल्ली ही एका लोकरी गोफात घालून मालकिणीच्या गळ्यात घातलेली असे. हा डबा प्रत्येकीच्या अखत्यारीतील कपाट किंवा त्यातील खणामध्ये ठेवला जात असे. अशा बंदोबस्तामुळे प्रत्येकीला आपले दागिने सुरक्षित वाटत असत. जेथे चोरांची भीती अधिक असेल तेथे, असे डबे घरातच, एखाद्या कोपऱ्यातील जमिनीत पुरून ठेवले जात असत. अनेकदा ती जागा फक्त कर्त्या पुरुषालाच माहिती असे. अशा कर्त्या किंवा जागा माहिती असलेल्या पुरुषाचा अचानक मृत्यू झाला तर हे घबाड जमिनीखालीच कायमचे गाडले जात असे. आता आपण एखाद्या घराचा पाया खोदताना हंडा सापडल्याच्या बातम्या वाचतो तो याचाच परिणाम आहे. जाड धातूच्या आणि नीट बंद होणाऱ्या अशा या डब्यातील दागिने उंदीर, कसर, वाळवी त्यांच्यापासून तरी नक्कीच सुरक्षित असत. गेल्या जमान्यातले हे लॉकर किंवा सेफ डिपॉझिट व्हॉल्टच म्हणायचे !
‘अशी हंडी म्हणजे मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवायची भांडे ‘ असे समीकरणच झाले होते. पूर्वीच्या नाटक – चित्रपटात असे डबे हमखास पाहायला मिळायचे. अजूनही दक्षिण भारतातील अनेक मंदिरांमध्ये, दानपात्र म्हणून अशाच आकाराच्या पण मोठ्या हंड्या ठेवलेल्या आढळतात.
माहिती साभार – Makarand Karandikar