महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,25,270

प्राचीन मंदिरे, वडनेर दुमाला

By Discover Maharashtra Views: 1343 1 Min Read

प्राचीन मंदिरे, वडनेर दुमाला –

नाशिक शहरापासून साधारण १२ किलोमीटर अंतरावर देवळाली कॅम्पच्या कवेत अन्‌ वालदेवी नदीच्या किनारी वसलेले वडनेर दुमाला म्हणजे नाशिकचा अनोखा वारसाच म्हणावा लागेल. प्राचीन मंदिरे अन् देव घडविण्याची परंपरा जपणाऱ्या वडनेरमध्ये ग्रामीण संस्कृतीच्या पाऊलखुणा आपल्याला आजही आढळतात. आज केवळ अवशेषरुपी शिल्लक असलेले ग्रामदैवत सिद्धेश्वर महादेवाचे राऊळ असो किंवा परिसरातील इतर प्राचीन मंदिराचे भग्नावशेष.. गावच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देत आजही उभी आहेत.

गावात गेल्यानंतर काही अंतरावर एका सात फूट उंच दगडी चौथऱ्यावर आपल्याला प्राचीन सिद्धेश्वर मंदिराचे भग्नावशेष नजरेस पडतात. मंदिर पूर्वाभिमुख असून आजमितीस मंदिराच्या केवळ सभामंडपाचा काही भाग शिल्लक आहे. शिल्लक अवशेष व त्यावरील शिल्पं कामावरून मंदिराच्या गतवैभवाची आपल्याला प्रचिती येते. चौथऱ्यावर श्री गणेश व इतर काही झीज झालेल्या मूर्ती आपल्या नजरेस पडतात. सभामंडपात नंदी व शिवलिंग आहेत. अलीकडच्या काळात ग्रामस्थांनी सिद्धेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला असून या मंदिरापासून काही अंतरावर नव्याने भव्य राऊळ बांधले आहे.

सिद्धेश्वर मंदिराच्या पाठीमागे आणखी एक छोटेखानी प्राचीन मंदिर दृष्टीस पडते. या मंदिराची देखील बरीच पडझड झालेली आहे. मंदिरात शिवलिंग आहे.

गावातील ही प्राचीन मंदिरे दुर्लक्षित असल्याची खंत स्थानिक व्यक्त करतात. या मंदिरांचे सर्व्हेक्षण अन् त्यांना संरक्षित करण्यासाठी प्रयत्न होण्याचे गरजेचे आहे. हा वारसा आपलाच असून तो जपण्याची जबाबदारी देखील आपलीच आहे.

रोहन गाडेकर

Leave a Comment