ओंकारेश्वर मंदिर, पुणे –
पुण्यातील पेशव्यांच्या काळात बांधली गेलेली महादेवाची देवळं म्हणून प्रामुख्याने अमृतेश्वर, ओंकारेश्वर, पर्वतीचे देवदेवेश्वर आणि खाजगीवाल्यांचे रामेश्वर मंदिर ही नावं डोळ्यांसमोर येतात. त्यातील सगळ्यात प्रख्यात मंदिर म्हणजेच मुठा नदीच्या काठी वसलेले श्री ओंकारेश्वर मंदिर. २६ ऑक्टोबर १७३६ ते १८ जून १७३८ या कालावधीत शिवरामपंत चित्राव यांच्या देखरेखेखाली थोरले बाजीराव पेशवे यांच्या आज्ञेने या मंदिराचे बांधकाम करण्यात आले. मंदिराच्या बांधकामखर्चाची तरतूद खुद्द श्री चिमाजीअप्पा ह्यांनी केली होती.
मंदिराचे बांधकाम अत्यंत मजबूत दगडी बांधणीचे आणि सुबक आहे. याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्याला असलेली नऊ शिखरे. सर्वसाधारणपणे मंदिराला एकच शिखर असतं, गाभाऱ्यावर. पुढे सभामंडप असतो. त्यावरही कमी उंचीचे शिखर असतात. तथापि या मंदिराला मात्र एक मुख्य शिखर आणि सभोवती आठ उपशिखरे असे वेगळेच स्वरूप दिलेलं आहे. मुख्य शिखराचे कामही रूढ संकल्पनांप्रमाणे न करता, अनेक टप्यांनी हळूहळू कमी होत जाणाऱ्या चौरस बांधणीच्या अगदी वेगळ्या धर्तीवर केलेलं आहे. आठ उपशिखरांखाली असणारे दगडी घुमट वेगवेगळे आहेत. चौरसाकारापासून ते चोवीस पाकळ्यांपर्यंत त्यांच्यात विविधता आढळते. तसेच, अगदी प्रवेशद्वारापासून ते गाभाऱ्यापर्यंतच्या भिंतींत असणाऱ्या कोनाड्यांच्या कमानींचे आकारही वेगवेगळे आहेत.
ओंकारेश्वर मंदिराच्या पूर्वेकडे भक्कम तटबंदीत मंदिराचे महाद्वार आहे. समोर एक सुंदर दगडी दीपमाळ आहे. या महाद्वाराच्यावर नगारखान्याची लहान इमारत आहे. महाद्वारातून आत प्रवेश केल्यानंतर फरसबंदी केलेला मोठा चौक लागतो. तेथेच मंदिराच्या प्राकारभिंतींमध्ये ओवऱ्यांची सोय केलेली आहे. मंदिराच्या गर्भगृहात तीन फूट खोलीवर शिवलिंग आहे. हे शिवलिंग पाषाणाचे असून येथील बाण(पिंडी) उत्तम लक्षणयुक्त नर्मदेतील दगडाचा आहे. शिवमंदिराच्या बरोबर समोर नंदीसाठी वेगळा आच्छादित चौथरा आहे. मीटरभर उंचीचा देखणा डौलदार नंदी तिथे विराजमान झालेला आहे.
पानशेतच्या पुरात या देवळाजवळ असलेला घाट वाहून गेला होता. त्या भयंकर पुरात श्री ओंकारेश्वर मंदिराचे मात्र नुकसान झाले नाही. पूर्वेकडे बालगंधर्व पूल झाल्यानंतर मंदिराचा दर्शनी भाग झाकला गेला. मंदिर परिसरात विष्णू, शनी, मारुती मंदिरे आणि पुरातन दगडी दीपमाळ आहे. देवळासमोर चिमाजीअप्पा व त्यांच्यासमवेत सती गेलेल्या त्यांच्या पत्नी अन्नपूर्णा देवी यांची समाधी आहे. तर मंदिराच्या परिसरात काळू महाराज व बाहेरील आवारात, नदीकाठी नानामहाराज साखरे ह्यांची समाधी मंदिरं आहेत.
संदर्भ:
सफर ऐतिहासिक पुण्याची – संभाजी भोसले
हरवलेले पुणे – डॉ. अविनाश सोहनी
मुठेकाठचे पुणे – श्री. प्र. के. घाणेकर
पत्ता : https://goo.gl/maps/ZtFhfTLLj4tkSMHZA
आठवणी इतिहासाच्या