महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,26,677

इतिहासातील आगळीवेगळी फितुरी

By Discover Maharashtra Views: 4373 6 Min Read

इतिहासातील आगळीवेगळी फितुरी

इतिहासात आपण बरेच फितुर पाहिले. कोणी वतनासाठी फितुर झाले तर कोणी पदासाठी तर कोणी मोहरांच्या मोहासाठी. पण एक फितुरी अशीही होती की ज्याचे कारण कोणीच सांगू शकत नाही. तो दुर्दैवी फितुर म्हणजे “पोटल्याचा डोंगर”.

इस १८१५ पासून स्पष्ट दिसू लागले की रायगडाचा अंत जवळ आलाय. त्याला कारण मराठ्यांचा शेवटचा, निष्क्रिय, दुबळा अन अपेशी पेशवा सुद्धा इंग्रजांच्या मगरमिठीतुन सुटण्याची शेवटची धडपड करत होता. त्याच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यासाठी इंग्रजांनी खडकी येथे एल्फिन्स्टन ला नेमले होते.

रायगड किल्ला हा हिंदुस्थानातील एक अभेद्य किल्ला होता. त्याच्या रक्षणार्थ एक हजार अरबी शिबंदी रायगडावर होती. रायगडाचे महत्त्व बाजीराव ओळखून होता. अरबांच्या तलवारी त्यास आधार देत होत्या. म्हणूनच त्याने त्याच्या पत्नी वाराणशीबाईस बरेच जडजवाहीर देऊन रायगडी धाडले होते.

त्यामुळे रायगड झुंजवण्याची जरुरी आहे ही जाणीव किल्लेदाराला झाली होती असे ब्लॅकर ने लिहून ठेवले होते. गॅझेटियर च्या लेखनाप्रमाणे कर्नल प्रॉथर मार्च १८१८ ला कोकणातील किल्ले घेण्यास निघाला. २३ एप्रिल का त्याचे सर्व सैन्य इंदापूरहुन महाडकडे निघाले. त्या पलटणीवर मेजर हॉल होता.

तो २४ एप्रिल ला सकाळी रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे पोहचला. पाचाडच्या संरक्षणासाठी ३०० मराठा सैनिक सज्ज होते. त्यामुळे फक्त पाहणी करण्यासाठी आलेल्या हॉल ने हल्ला करणे योग्य समजून पाचाडच्या पेठेवर हल्ला चढवला. लढाईत २० मराठे पडले व केवळ ३ इंग्रज जखमी झाले.

मेजर हॉल ने पाचाडवर कब्जा केला. पण त्याने तिथे तळ ठोकला नाही कारण उन्हाळा असल्याने पाण्याची सोय नव्हती. म्हणून ३ मैल मागे जाऊन त्याने कोंझरच्या आसपास तळ ठोकला. इंग्रज घोडदलाने मराठ्यांचे काही उंट, घोडे अन २ हत्ती पकडून मेजर हॉल च्या स्वाधीन केले.

त्याच दिवशी प्रॉथर चे सैन्य महाडला येऊन पोहोचले व महाड त्याने घेतले. २५ एप्रिल रोजी मेजर हॉल ला महाडचे सैन्य येऊन मिळाले. त्याने अनेक तुकड्या करून आपला तळ रायगडाच्या जवळ नेला अन जवळपास रायगडाला वेढा घातला. त्यातील एक मोर्चा त्याने खुबलढा बुरुजसमोर ठेवला.

त्यामुळे मराठ्यांचा मोर्चा अन त्याचा मोर्चा अगदी समोरासमोर आले. एप्रिल संपत आलेला. हॉलजवळ हल्ला करण्यास पुरेसे लोक नव्हते. त्यामुळे किल्ला घेण्याचे काम रेंगाळणार असे त्याला जाणवले. पण मुंबईहून ब्रिटिशांनी मेजर हॉल च्या मदतीसाठी ६७ वी पलटण रायगडाच्या दिशेने पाठवून दिली.

४ मे १८१८ ला ती फौज रायगडाच्या पायथ्याला येऊन पोहोचली. त्यामुळे इंग्रज सैन्याची संख्या मुबलक झाली. पण तोपर्यंत २५ एप्रिल ते ४ मे पर्यंत हॉल ने खूबलढ्यासमोरच्या मोर्चावरून मारा सुरू केलेला व मराठ्यांचे काही मोर्चे उध्वस्त केले.

महाड येथे ठेवलेल्या लेफ्टनंट क्रॉसबी याच्या तुकडीने रायगडाच्या रक्षणार्थ प्रतापगडाहून येणाऱ्या मराठी सैन्यास तिकडेच थोपवून रायगडाची मदत बंद केली.

तोपर्यंत कर्नल प्रॉथर अन मेजर हॉल यांनी रायगडाच्या शेजारील वाघ दरवाजासमोर असलेल्या पोटल्याच्या डोंगरावर मोर्चा बांधला.
अत्यंत बिकट अन अवघड अशा जागेवर इंग्रजांनी तोफा चढवल्या. त्यावेळी वाराणशी बाई रायगडीच होत्या. गॅझेटियरच्या नोंदीप्रमाणे ४ मे नंतर दोन दिवसातच वरील चकमकी संपल्या.
ब्रिटिशांनी रायगडी वाराणशीबाईंनी रायगड सोडून जाण्यासाठी निरोप पाठवला पण त्यांनी साफ नकार दिला.
त्यामुळे इंग्रज चवताळले.
अन इंग्रजांच्या तीव्र तडाख्यास सुरुवात झाली. असे तडाखे रायगड प्रथमच अनुभवत होता. ब्लॅकरच्या नोंदीप्रमाणे ६ मे रोजी दुपारी ४ वाजता इंग्रजी तोफेचा एक आठ इंची गोळा पडून फुटला व वाराणशीबाईंच्या निवासस्थानाला आग लागली.

ती आग भडकत होती. त्यामुळे किल्लेदाराला वाटले की वाराणशीबाईंनी गडउतार होण्याच्या इंग्रजांच्या प्रयोजनाचा विचार करावा. त्यांनीही ते मान्य केले व रायगड सोडण्याचा निर्णय घेतला. ९ मे ला दुपारी ३ पर्यंत पोटल्याच्या डोंगरावरून इंग्रजांचा तोफमारा रायगडावर सुरूच होता.

भव्यदिव्य असा रायगड जळत होता. शिवछत्रपतीच काळीज जळत होत, आऊसाहेबांच लेकरू जणू जळत होत. मराठ्यांचा स्वाभिमान जळत होता पण त्यावेळी वाचवणारे असे कोणीच नव्हते. शेख अबू या किल्लेदाराने तहाच्या अटी ठरवल्या अन तोफमारा बंद झाला.

१० मे १८१८ ला दुपारी कर्नल प्रॉथर रायगडी गेला. किल्ल्यावरील मराठा शिबंदी रांगेने त्याच्या समोरूनच खाली उतरली. १०० इंग्रज शिपायांनी महादरवाजाचा ताबा घेतला. गडावर फक्त वाराणशीबाईंचे नोकर होते. किल्ल्यावरील एक घर व एक धान्याचे कोठार फक्त त्यातून बचावले होते.

रायगड आसवं ढाळत होता…
मराठा शिबंदी झोपड्यात राहत होती. शिवरायांचा राजवाडा पूर्णपणे उध्वस्त झाला होता. किल्ल्यावर सर्वत्र भग्न इमारतींचे अवशेष दिसत होते. गडावरील रस्ते, सुंदर इमारती, मंदिरे, वाडे, दफ्तरखाना सगळं भग्न झालं होतं. शिवरायांची समाधी भग्न झाली होती. पण मोठ्या प्रयासाने ओळखू येत होती.

हे फक्त पोटल्याच्या डोंगरावरून तोफा डागल्यामुळे शक्य झाले होते. रायगडाची अक्षरशः राखरांगोळी झालेली. ते बघून कोणाचाही विश्वास बसला नसता की जगातील सगळ्यात मोठ वैभव याच रायगडाने पाहिलं होतं. कुठे तो वैभवशाली रायगड अन कुठे हा बेचिराख झालेला रायगड.

त्या फितुर पोटल्याच्या डोंगराने सुद्धा शिवछत्रपतींचा राज्यभिषेक सोहळा हळूच मान वर करून पाहिला असेलच. मराठ्यांच्या इतिहासातील सगळ्यात सुवर्णक्षण म्हणजे ६ जून १६७४. पोटल्याचा तो डोंगर सुद्धा या क्षणाचा साक्षीदार झाला असेलच.

हत्तीवरून थाटात निघालेली महाराजांची मिरवणूक त्यानेही पाहिली असेलच. नगारखान्यात वाजलेल्या नगाऱ्यांचा आवाज त्यानेही ऐकला असेलच. सर्वांसोबत त्यानेही या दैवताला मुजरा केला असेलच. हे सगळं तो फितुर एवढ्या लवकर कसा विसरला असेल….

त्याच्या अंगाखांद्यावर तोफा चढवू देण्याआधी त्याला बत्तीस मण सोनेरी सिंहासन दिसले नसेल..? तो जगदीश्वर दिसला नसेल..? शिवरायांची समाधी दिसली नसेल.?? शंभुराजांचा करारी आवाज आठवला नसेल.??

खरतर आजही रोज तो शौर्याचा बुलंद पाषाण त्या फितुर पोटल्याच्या डोंगराला या सगळ्या गोष्टींचा जाब विचारत असेल. पण तो पोटल्याचा डोंगर उत्तराअभावी मान खाली घालून गप्प बसत असेल. आसवं ढाळत. त्या दुर्दैवी फितुरीचे प्रायश्चित्त करत… आभाळाकडे बघून महाराजांची क्षमा मागत..😥

“श्रीमद रायगिरौ”

संदर्भ-

१.रायगडाची जीवनकथा-शांताराम आवळसकर
२.कुलाबा गॅझेट
३.ब्लॅकरचे लेखन

माहिती साभार – सोनू बालगुडे पाटील

Leave a Comment