महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,97,328

पद्मपाल यक्ष | आमची ओळख आम्हाला द्या

Views: 1309
3 Min Read

पद्मपाल यक्ष | आमची ओळख आम्हाला द्या –

भारतीय वास्तू वैभवातची साक्ष देणारा अजिंठा येथील लेणी समूह आहे.  या ठिकाणी एकूण 30 बौद्धधर्मीय लेणी आहेत. बौद्ध धर्माचा वारसा जतन करणारी व प्रदीर्घ ऐतिहासिक कालखंडाची पार्श्वभूमी लाभलेली अजिंठा लेणी या भारताच्या जागतिक आंतरराष्ट्रीय  पर्यटनासाठी ठळक ओळख करून देणाऱ्या महत्त्वाच्या लेणी आहेत .अजिंठा लेण्यात तथागत गौतम बुद्धांच्या विविध भावमुद्रा तसेच तत्त्वज्ञानाला अनुरूप चित्रे व शिल्पे आहेत .या लेणी समूहाततील प्रत्येक लेणी ही बौद्ध तत्वज्ञानाचे प्रतिनिधित्व करते. या लेण्यांमधील लेणी क्रमांक १९ ही चैत्य लेणी म्हणून ओळखली जाते. ही लेणी अत्यंत सुबक कलाकुसरयुक्त असून ती चैत्य या प्रकारात मोडते. या लेणीत बुद्ध, यशोधरा ,राहुल यांची चित्रे आहेत.(पद्मपाल यक्ष)

त्याच्या उजवीकडे बुद्धांची ध्यान मुद्रेतील मूर्ती, नागराजाची मूर्ती, नागराज व राणी यांच्या मूर्ती इत्यादी मूर्ती अंकित केलेल्या आहेत. येथील स्तूप चिनी पॅगोडा प्रमाणे आहेत. स्तूपाच्या खालच्या भागावर विविध आकृत्या कोरलेल्या आहेत. समोर तथागत गौतम बुद्धांची अभयमुद्रेतील मूर्ती असून ती तोरणात खोदलेली आहे. याच लेणीच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वर दोन्ही बाजूस दोन यक्ष अंकित केलेले आहेत.

बौद्ध मूर्तिकलेत यक्ष मूर्तीस विशेष महत्त्व आहे. यक्षांचे देखील वेगवेगळे प्रकार आहेत. त्या पैकीच द्वारपालाच्या स्वरूपात कोरलेले हे दोन पक्ष म्हणजे पद्मपाल आणि शंकू पाल यक्ष होय.

या दोन पक्षांपैकी सर्वप्रथम आपण पद्मपाल यक्षाची लक्षणे पाहणार आहोत. चैत्याच्या प्रवेशद्वाराच्या उजवीकडील वरच्या बाजूस पद्मपाल हा पक्ष अंकित केलेला आहे. हा  द्विभूज असून अर्ध संमपाद अवस्थेत स्थित आहे. उंचीने ठेंगणा  असून शरीर लठ्ठ आहे. डोक्यावर असणारा रत्नजडित मुकुट त्याच्या श्रीमंतीची साक्ष देतो. मुकुटाच्या आतून त्यांची वैशिष्ट्यपूर्ण केशरचना त्याच्या उजव्या खांद्यापर्यंत कलात्मकरित्या दाखविलेली आहे. कानात चक्राकार कुंडल, गळ्यात ग्रीवा, हारसूत्र, स्तनसूत्र, उदरबंध, स्कंदमाला, केयुर, कटकवलय इत्यादी अलंकार त्याने परिधान केलेले आहेत. गळ्यात ठसठशीत पुष्पमाला अंकित केलेली आहे.

नेसूचे वस्त्र गुडघ्यापर्यंत आहे. पद्मपालाचा चेहरा शांत असून चेहऱ्यावर दिव्यत्वाचा भाव आणि स्मितहास्य स्पष्ट दिसते. मान किंचीतशी उजवीकडे झुकलेली आहे. डोळे पूर्णतः मिटलेले आहेत. नाक, डोळे,ओठ,भुवया इत्यादी अवयव अगदी स्पष्ट आणि उठावदार असून डोक्यामागे प्रभावलय आहे. द्विभुज असणाऱ्या या पद्मपालाच्या उजव्या हातात पणती किंशा शिंपली सदृश्य वस्तू आणि डाव्या हातात कमरेवर धरलेली धनाची थैली आहे. यावरून ती धनाची देवता आहे हे स्पष्ट होते. शेजारी त्याचा सेवक अंकित केलेला दिसतो. अशा पद्धतीने हा  पाषाणरुपी बोलका पद्मपाल यक्ष द्वारपालाच्या रूपात अंकित केलेला दिसून येतो.तो आजहि येणार्‍या जाणार्‍यास शांतीचा संदेश देत उभा आहे.

डाॅ.धम्मपाल माशाळकर,
मूर्तीअभ्यासक,मोडी लिपी व धम्मलिपी तज्ञ,सोलापूर

Leave a Comment