डफळे सरकार यांचा वाडा…
जतच्या दक्षिणेला कर्नाटक सीमेवर प्रतापराव गुजर यांच्या लढाईने प्रसिद्धीस आलेले उमराणी गाव आहे. प्राचीन इतिहास असलेल्या या गावाला अनेक राजसत्तांचा वैभवशाली इतिहास लाभला आहे. उमराणी येथील प्राचीन मंदिरात इ.स. ११ व १२ व्या शतकातील काही प्राचीन शिलालेख आढळून येतात. यात कलचुरी घराण्यातील राजा बिज्जलदेव याने या मंदिरांना दान दिल्याची नोंद येते. पण शिवकाळात उमराणी प्रसिद्धीस आले ते येथे घडलेल्या प्रतापराव गुजर यांच्या पराक्रमामुळे. डफळे सरकार यांचा वाडा.
इ.स. १६७३ साली राज्याभिषेकापूर्वी काही महिने महाराज पन्हाळगडावर असताना अदिलशाही सरदार अब्दुल करीम बहलोलखान हा बारा हजार स्वार घेऊन स्वराज्यावर चाल करुन आला. ही वार्ता समजताच महाराजांनी सरसेनापती प्रतापराव गुजर यांस खानावर रवाना केले. त्यांना आज्ञा दिली की “खान वलवल भारी करतो, त्यास मारोन फते करणे. महाराजांच्या आज्ञेनुसार प्रतापराव बहलोलखानावर चालून गेले. यावेळी बहलोलखानाचा मुक्काम कर्नाटक सीमेवर असलेल्या उमराणी गावाजवळील डोण नदीकिनारी होता. मराठ्यांनी सर्वप्रथम खानाचे पाणी तोडले व दुसऱ्या बाजूने त्यावर हल्ला केला. पाण्याशिवाय कासावीस झालेल्या खानाला शरण येण्याशिवाय पर्याय नव्हता.
बेहलोलखानाने प्रतापराव व मराठा सैन्यासमोर शरणागती पत्करली. प्रतापरावांनी त्याला माफी दिली. शरण आलेला बहलोलखान मराठ्यांसमोर पराजीत होऊन मागे निघून गेला. हि बातमी महाराजांना कळल्यावर ते चिडले. महाराजांच्या आज्ञेचे पालन करण्यात प्रतापराव चुकले होते. बहलोलखान पराभवाचा बदला घेण्यास परत येईल अशी शंका त्यांना होती. त्यांनी प्रतापरावांना खरमरीत पत्र लिहून “सला काय निमित्य केला? असा जाब विचारला व तुम्ही शिपाईगिरी केलीत, सेनापतीसारखे वागला नाहीत अशी प्रतापरावांची निर्भर्त्सना केली. या जाबाने प्रतापराव मनातून दुखावले गेले आणि यानंतरच नेसरी खिंडीत प्रतापराव यांचे बलीदान नाट्य घडले. याशिवाय उमराणी गावास असलेला इतिहास म्हणजे जत संस्थानाचे राजे डफळे सरदार यांचा इतिहास.
डफळापूरचे पाटील सटवाजी चव्हाण यांनी १६८० च्या सुमारास आदिलशाहीकडून जत, करजगी, बार्डोल आणि कणद यांची देशमुखी मिळवल्यावर डफळे राजघराणे व जत संस्थान उदयाला आले. संभाजीराजांच्या मृत्युनंतर सटवाजीराजे यांनी धनाजी जाधव व संताजी घोरपडे यांच्या बरोबरीने आपल्या १६००० सैन्यासह मुघल सेनेवर हल्ला केला. पेशवाईत आऊसाहेब डफळे (१७०१–५४) यांनी पेशव्यांची अधिसत्ता मान्य करत संस्थानाचे स्वतंत्र कायम ठेवले. दुसऱ्या बाजीरावाने काही काळ देशमुखी जप्त करून त्रिंबकजी डेंगळेकडे या संस्थानचा कारभार सोपविला होता. १८२० मध्ये इंग्रजांनी तह करून सातारच्या छत्रपतींची अधिसत्ता मान्य करविली. त्यानुसार १८४६ नंतर ३ वर्षे राजा अल्पवयीन असल्याने कारभार छत्रपतींचाच होता. सातारा खालसा झाल्यावर (१८४८) संस्थान ब्रिटिशांचे मांडलिक बनले.
उमराणी गाव सांगली शहरापासुन ८३ कि.मी.वर असुन जत या तालुक्याच्या शहरापासून २० कि.मी. अंतरावर आहे. जत संस्थाना अंतर्गत उमराणी हे एक महत्वाचे ठिकाण असल्याने डफळे घराण्याचे येथे अनेकदा वास्तव्य असे. उमराणी गावात आजही राजे डफळे यांची गढी असुन त्यांचे वंशज तेथे वास्तव्य करून आहेत. सटवाजीराजे चव्हाण यांच्या नंतरच्या काळात हि गढी बांधली गेली असावी. साधारण अर्धा एकर परिसरात पसरलेली हि गढी चौकोनी आकाराची असुन गढीच्या चार टोकाला चार बुरुज आहेत. सध्या या गढीचा वापर डफळे यांचे वंशज करत असुन त्यांनी या गढीला तिच्या मूळ स्वरुपात कायम ठेवले आहे.
गढीबाहेर दरवाजा शेजारी आपल्याला गजलक्ष्मी शिल्प पहायला मिळते. गढीची तटबंदी काही प्रमाणात ढासळली असुन या गढीच्या चार टोकाला असलेले चार बुरुज व गढीचा दरवाजा आजही पहायला मिळतो. गढीच्या आवारात दगडात बांधलेली खोल विहीर असुन डफळे यांचा चौसोपी वाडा आहे. गढीतील या वाड्याचे बांधकाम आजही मूळ स्थितीत बांधकामातील लाकडावर अतिशय सुंदर कोरीवकाम केले आहे. वाड्यात राजे डफळे यांचे वास्तव्य असल्याने मर्यादित भागात प्रवेश दिला जातो. गावात फेरी मारताना काही प्राचीन मंदिरे पहायला मिळतात. उमराणी गढी व आसपासचा परिसर पहाण्यास दोन तास पुरेसे होतात.
Adhikrao Sawant
ऐतिहासिक वाडे व गढी Group