महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,13,070

सरसेनापती पिलाजीराव जाधवराव यांचा ऐतिहासिक वाडा

By Discover Maharashtra Views: 3519 2 Min Read

सरसेनापती पिलाजीराव जाधवराव यांचा ऐतिहासिक वाडा –

सरसेनापती पिलाजीराव जाधवराव हे लखोजीराव जाधवराव (जिजाऊ साहेबांचे वडील) यांचे वंशज. इ.स. १७१७ मध्ये दामाजी थोराताने पेशवा बाळाजी विश्वनाथास हिंगणगावच्या गढीमध्ये बंदिस्त केले. त्यावेळी मोठ्या हिमतीने पिलाजींरावांनी हिंगणगावावर चाल करून ती गढी जमीनदोस्त केली आणि दमाजी थोरातास छत्रपती शाहू महाराजांपुढे आणले. त्याबद्दल शाहू महाराजांनी पिलाजीराव यांना पुणे प्रांती मौ. दिवे आणि मौ. नांदेड गाव इनाम म्हणून दिले. (जे आता नांदेड सिटी म्हणून ओळखले जाते.) त्या ठिकाणी त्यांनी एक वाडा बांधला.

श्री शाहू छत्रपतीनी पिलाजीरावांना सासवडजवळही जमीन दिली होती. तिथे त्यांनी जो वाडा बांधला, तो आता जाधवगढी म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच वाघोलीमध्ये असणाऱ्या श्री वाघेश्वर महादेव मंदिराजवळ पिलाजीराव जाधव यांची स्मरण छत्री आहे, ती सुद्धा बऱ्याच लोकांना माहिती आहे. पण त्यांचा नांदेड सिटी मधला हा वाडा मात्र तसा अपरिचित आहे.

सिंहगड रोडवर धायरी फाट्यावरचा उड्डाण पूल ओलांडून पुढे गेल्यावर रस्त्याच्या उजव्या बाजूला नांदेड सिटीचे प्रवेशद्वार लागते. त्या दरवाज्यातून आत गेल्यावर आपण नांदेड चौकात पोचतो. तिथे पिलाजीरावांच्या स्मरणार्थ एक देखणे समूह शिल्प उभारले आहे. त्या समूह शिल्पाला वळसा घालून डाव्या हाताच्या रस्त्याने थोडे पुढे गेल्यावर आपण सरसेनापती पिलाजीराव जाधवराव यांच्या भव्य वाड्यासमोर येतो.

वाड्याची तटबंदी, सुरेख महादरवाजा आणि तिथे डौलाने फडकणारा जरीपटका आपल्याला इतिहास काळात घेऊन जातात. महादरवाज्यातून आत गेल्यावर डाव्या बाजूच्या भिंतीवर असणारी राजे लखुजीराव जाधवराव, सरसेनापती पिलाजीराव जाधवराव आणि सरसेनापती धनाजीराव जाधवराव  यांची शिल्पे आणि पिलाजीराव जाधवराव यांची मुद्रा आपले लक्ष वेधून घेते. बाजूलाच असणाऱ्या दालनात जाधवराव घराण्यातील व्यक्तींची चित्रे, ऐतिहासिक शस्त्रास्त्रे, जाधवराव घराण्याची वंशावळ आणि इतर अनेक गोष्टी सुंदर रीत्या जपून मांडल्या आहेत. तिथे समोर असणाऱ्या डौलदार घरामध्ये मात्र आपल्याला जाता येत नाही. सध्या त्या वाड्यात राहणाऱ्या श्री. विक्रम सिह जाधवराव यांनी त्या वाड्याचे मूळ स्वरूप तसेच ठेऊन अप्रतिम वास्तू संवर्धन केले आहे.

पत्ता :
https://goo.gl/maps/NSBpSs674ZJhigzt5

संदर्भ:
पिलाजी जाधवराव यांची मराठेशाहीतील कामगिरी – डॉ. सुवर्णलता जाधवराव
इतिहासकर्ते मराठे – श्री. ग. ह. खरे
दर्याराज कान्होजी आंग्रे – श्री. सदाशिव शिवदे
मुठेकाठचे पुणे – श्री. प्र. के. घाणेकर.

 

Leave a Comment