सरदार अंभोरकर देशमुखांचा वाडा
निजामशाही राजवटीत उदयास आलेल्या अंभोर दऱ्याचे म्हस्के देशमुखांचा तीन शतके टिकून असलेला सरदार अंभोरकर देशमुखांचा वाडा हे संगमनेरच्या ऐतिहासिक स्थळाचे वैभव म्हणून ओळखला जातो.
संगमनेर येथील घासबाजारात हा वाडा आहे. वाड्यासमोर उभे राहिल्यावर त्याचा भव्य दरवाजा, उत्तम सज्जा वाड्याची जणू गर्दनच अशा पद्धतीने आपले चित्त वेधून घेतो. पल्लेदार स्वरुप पाहता वाड्याच्या आतील चौक आणि सोप्यांची विशालता सहज लक्षात येते. वाड्याचा आजपावेतो केलेला डागडुजीचा खर्च, सोपे, जिना, बैठक, पाण्याची योजना, भुयार, प्रशस्त तावदाने या गोष्टी वाड्याचे वैशिष्ट्य दाखवतात. विशेष बाब म्हणजे अंभोरकर देशमुखांनी आजपर्यंत काळजीपुर्वक जपून ठेवलेला त्यांचा दप्तरखाना. फारसी आणि मोडी कागदपत्रे अतिशय काळजीपूर्वक त्यांनी एका स्वतंत्र अलमारीत ठेवली आहे. त्यात त्यांच्या इनामाच्या सनदा आहेत. अजून सर्व दप्तरांचे वाचन झालेले नाही त्यामुळे इतिहाससंशोधकांना त्याचा निश्चितपणे उपयोग होईल. आज तेथे वाड्याचे वारसदार एकत्र कुटुंबात आनंदाने राहतात.
ऐतिहासिक वास्तुरंग
या वास्तूला ऐतिहासिक रंग निश्चितपणे आहे. आधी सांगितलेल्या माहितीप्रमाणे येथील दस्तऐवज संशोधनाचा विषय असून इतिहासअभ्यासकांना या वास्तूच्या इतिहासाबाबत अधिक माहिती मिळू शकते. याचे वाचन अजूनही गुलदस्त्यात आहे. निजामशाहीत उदयास आलेल्या या घराण्याकडे ६०० गावांचा इनाम होता. ‘संगमनेर’ येथे कायम परकीय शाही राजवट होती. त्यामुळे तेथील, इनामदार, जहागीरदार हे त्यांचेच सेवक असावेत. अंभोरकर म्हस्के देशमुख हे त्यांपैकीच असावेत. राज्यकर्त्यांकडे निष्ठेने सेवा केल्यामुळे अर्थातच त्यांचे उर्जित त्या राज्यकर्त्यांकडून झाले.
या घराण्याचे सोयरसंबंध महाराष्ट्रातील सर्व राजघराण्याशी आहेत. महादजी शिंदे यांच्या पत्नी भवानीबाई त्यांचेच हे माहेरघर.
सरदार अंभोरकर देशमुखांचा वाडा – घासबाजार, संगमनेर
विकास चौधरी
घास बाजार मध्ये कुठे आहे