महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,24,404

पळशी

By Discover Maharashtra Views: 4139 3 Min Read

पळशी…

पारनेर, अहमदनगर मधील पळशी हे गाव. पळशीचा गढीवजा भुईकोट किल्ला, होळकरांचे दिवाण राहिलेल्या पळशीकरांचा सुंदर लाकडी वाडा, ‘राही-रखुमाई’ नावाचे विठ्ठलाचे देखणे मंदिर.  गावात इतिहासाचा संपन्न वारसादेखील वास्तूंमधून पाहावयास मिळतो. त्यामुळेच या गावात भटकंतीची सारी रूपे याचि देही याचि डोळा पाहायला मिळतात.

पळशीला पोहोचण्यासाठी तुम्ही शहरापासून ४० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या टाकळीढोकेश्वर ची पांडवलेणी करून टाकळी गावातून २० किलोमीटर अंतर पुढे पळशी गाठू शकता.

गावात पोहोचायच्या अगोदरच दुरूनच पळशीचा भक्कम असा भुईकोट किल्ला तुमचे लक्ष वेधून घेतो. चहुबाजूंनी तटबंदीने वेढलेले हे टुमदार गाव या भुईकोटातच वसले आहे.

होळकरांचे दिवाण रामजी यादव-कांबळे पळशीकर यांचे त्यांच्या मुलाने म्हणजेच आनंदराव पळशीकर याने पानिपतच्या रणसंग्रामात मोठा पराक्रम गाजवला. त्यामुळे त्यांना हे गाव इनाम मिळालं. मग पळशीकरांनी येथे भुईकोट, वाडा आणि मंदिराची उभारणी केली. या भुईकोटामध्ये येण्यासाठी दोन दिशांना दोन भक्कम प्रवेशद्वारे आहेत. यातला मुख्य दरवाजा हा उत्तर दिशेला असून त्या दरवाजाला भक्कम असे दोन बुरूजदेखील दिसतात. याच प्रवेशद्वारावरचे दोन शिलालेख आहेत.

या भुईकोटाचे काम १७०९ ते १७१९ मध्ये पूर्ण झाल्याची माहिती मिळते. किल्ल्याचे बांधकाम रामराव अप्पाजी कांबळे – कुलकर्णी या जहागीरदारांनी केल्याचे समजून येते. दोन्हीही शिलालेख अगदी सुस्पष्ट आहेत. फक्त यावर गावकऱ्यांनी रंगरंगोटी केलेली दिसते.

महादेवाचे मंदिर.. संपूर्ण दगडात बांधलेल्या या मंदिराचा गोलाकार छत असलेल्या या मंडपात एकही खांब नाही. गाभाऱ्यात सुरेख शिविपडी आहे. मंदिराच्या भिंतीतील खिडक्याही आकर्षक मांडणीच्या आहेत. हे मंदिर बहुधा पेशवाईच्याच काळात बांधले गेले असावे.

पळशीकरांच्या लाकडी वाडा म्हणजे काष्ठशिल्पाच अद्भुत सौंदर्य आहे. हा वाडा पूर्वी चार मजले होता, पण सध्या येथे तीनच मजले दिसतात. उल्लेख करावी लागतील अशी शिल्पे म्हणजे अननसाच्या पानासारखी खांबावर असणारी नक्षी, अंबारीसह हत्ती देवदेवतांच्या मूर्ती, यामधली फुलांची परडी, वाडय़ाच्या वरच्या मजल्यावर जाण्यासाठी जिनेही आहेत. वाडय़ाचे मालक पळशीकर सध्या इंदूरला वास्तव्यास असतात असे कळते.

राही रखुमाई आणि विठ्ठल मंदिर मात्र भुईकोटाच्या बाहेर म्हणजेच दक्षिण दरवाजाच्या जवळच आहे. सुरेख प्रवेशद्वार आणि त्यावर नगारखानाही आहे. तसेच मंदिराला चहुबाजूंनी तटबंदीसदृश बांधकामही आहे. मंदिराची रचना सभामंडप आणि गाभारा अशी आहे. सभामंडप हा १८ दगडी आणि नक्षीदार खांबांनी तोलून धरलेला दिसतो. हे खांब गोलाकार असून यावरचे नक्षीकामही पाहण्यासारखे आहे. गाभाऱ्यातील विठ्ठलाची मूर्ती काळ्या पाषाणात घडवलेली दिसते. ही मूर्ती कृष्णरूपातील विठ्ठलाची आहे असे अभ्यासकांचे मत आहे. कारण या मूर्तीच्या तळपट्टीवर गायीची शिल्पे कोरलेली दिसतात. तसेच विठुरायाच्या दोन्ही बाजूंना राही आणि रखुमाईच्या संगमरवरी मूर्ती बसवलेल्या दिसतात. मंदिराच्या बाहेर छोटीशी पुष्कर्णीही आहे. बंधाऱ्याच्या पलीकडे राजघराण्यातील व्यक्तींच्या समाधी आणि मंदिरे आहेत. तिथे जाण्यासाठी पुष्करणीशेजारून वाट आहे.

Nagar Trekkers
Leave a Comment