पळसनाथ मंदिर, पळसदेव –
पुणे-सोलापूर महामार्गावर हडपसर पासून १२० कि.मी. अंतरावर पळसदेव गाव आहे. पळसदेव गावच्या प्रवेशकमानीतून आतमध्ये २-३ कि.मी. गेल्यावर आपण उजनी धरणाच्या जलाशयात जाऊन पोहोचतो. भिगवण वरून थोडे पुढे आलो की हायवेच्या पुलावरूनच डाव्या बाजूला उजनीच्या जलाशयात पळसनाथ मंदिर चा कळस आपल्याला दिसतो आणि आपली उत्सुकता वाढू लागते.
पळसदेव गावातून पुढे धरणपात्रात गाडी लावल्यावर मासेमारी करणाऱ्या स्थानिकांच्या होडीने १० मिनिटांत मंदिरात जाता येते. मंदिराचा परिसर देखणा आणि सुंदर असून मंदिराला चारही बाजूंनी तटबंदी(ओवऱ्या) आहेत, पण फक्त मंदिऱ्याच्या समोरील तटबंदी(ओवरी) आज चांगल्या स्थितीत आहे, बाकी ३ बाजूंच्या तटबंदी(ओवऱ्या) पाण्याच्या प्रवाहामुळे ढासळलेल्या आहेत. उन्हाळ्याच्या शेवटी पाणी कमी झाल्यामुळे बरीच मंदिरे पाण्याबाहेर आली होती, तिथे एकूण ५ मंदिरे आहेत. त्यातील काही मंदिरे आपल्याला पाहता येतात.
१९६९ साली उजनी धरणाचं बांधकाम सुरू झालं आणि १९८० च्या सुमारास ते बांधून पुर्ण झाले, त्यानंतर पाण्याची पातळी वाढल्याने पळसनाथाचं मंदिर पाण्यात गेले. पण त्यानंतर गावकऱ्यांनी पळसनाथ महादेवाचे मुख्य शिवलिंग तिथून गावात आणले व गावात नवीन मंदिर बांधून त्यात त्या शिवलिंगाची स्थापना केली. उन्हाळ्याच्या शेवटी जेव्हा पाण्याची पातळी कमी होते, तेव्हा मंदीर हळू हळू पाण्याबाहेर येते. परंतू धरण झाल्यापासून आजपर्यंत फक्त २००३ आणि २०१७ मध्ये मंदीर पूर्णपणे पाण्याबाहेर आले होते. इतर वर्षी मंदीराच्या सभामंडपात ६ फूटांपर्यंत पाणी होते. याही वर्षी ६-७ फूट पाणी मंदीराच्या सभामंडपात होते आणि गाभाऱ्यात तर १० फूट पाणी होते. पण आम्ही ठरवलं होतं की काही करून हे मंदिर पूर्णपणे पहायचं. त्यामुळे सभामंडप व गाभाऱ्याच्या त्या ७-१० फूट पाण्यात आम्ही उतरून आतील मंदिराची पाहणी केली.
पळसनाथाच्या शेजारीच अजून एक मंदिर आहे, हे मंदिर बळीराजाचं किंवा सरडेश्वराचं आहे, अशी माहिती मिळाली. या मंदिरात एक शिलालेख आहे, अभ्यासकांच्या मते त्या दोन्ही मंदिराचे बांधकाम अंदाजे चालुक्य काळातील म्हणजेच जवळपास १००० वर्षांपूर्वीचे असावे. पळसनाथाचा सभामंडप अतिशय सुंदर व कोरीव आहे. छपराला सुंदर नक्षीकाम आहे. मंदिराचे खांबही अतिसुंदर व कोरीव आहेत. त्याची लक्षवेधक कलाकुसर बघण्यासारखी आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूनेही छान कोरीवकाम आहे. त्यात अनेक मूर्ती, हत्ती, कमळं कोरलेली आढळतात. मंदिराच्या समोरच वीरगळ व सतीशिळा किंवा सतीचे दगड आहेत, ते आत्ता पाण्यात होते. या वीरगळीवर तत्कालीन वीरांची शौर्यगाथा कोरलेली आहे.
पळसनाथाच्या मंदिराच्या मागच्या बाजूस चढावर, पाण्याच्या पलीकडे अजून एक मंदिर आहे, त्या मंदिराची प्रचंड पडझड झाली आहे. या मंदिराची खासीयत म्हणजे या मंदिराच्या बाहेरील भिंतीवर चारही बाजूंनी रामायणातील प्रसंगांचे भरपूर शिल्प कोरलेले आहेत. परंतु या मंदिराची दुरावस्था इतकी झाली आहे, कि ते कोरीव शिल्प, मूर्ती इकडे तिकडे पडल्या आहेत.
या मंदिराच्या खाली धरण पात्रात आणखी २ मंदिरे आहेत असे स्थानिकांनी सांगितले पण ती मंदिरे पुर्णपणे पाण्यात होती.
एकंदरीत १००० वर्षे जुने असलेले हे पळसनाथ मंदिर आजही तत्कालीन स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे. उन्हाळ्यात जेव्हा पाण्याची पातळी पूर्ण खाली जाते तेव्हा नक्की एकदा या मंदिराला भेट द्या..
Google Location:-
https://goo.gl/maps/wNbw96cvtorcvu9R9
© गणेश खुटवड(पाटील)