पंचगंगा घाट –
प्रत्यक्षात पंचगंगा घाटावरील मंदिरे देवदेवतांची नसून त्या छत्रपती घराण्यातील व्यक्तिंच्या समाध्या आहेत. त्यासंदर्भातील लेखी संदर्भ कोल्हापूरच्या पुराभिलेखागार कार्यालयात उपलब्ध आहेत. पंचगंगा घाटावरील या मंदिरांमध्ये शिवलिंग, बाहेर नंदी आणि परिसरात गाळात रूतलेल्या अनेक मूर्ती असल्याने ही मंदिरे महादेवाची असल्याचा लोकांचा समज झाला.पंचगंगा घाट.
पंचगंगा घाट हा खूप प्राचीन नाही. याच घाटावर राजर्षी शाहू महाराजांच्यासंदर्भातील वेदोक्त प्रकरण घडले. या घाटावरील मंदिरे तसेच पुलाकडील आणि पेरूच्या बागेतील समाधी मंदिरांच्या लेखी नोंदी आढळतात. त्यानुसार या घाटावरील पहिले मंदिर हे करवीरकर शंभू छत्रपतीचे आहे. त्यांचा मृत्यू १७६० मध्ये टोप-संभापूर येथे झाला. त्यांचे दहन घाट परिसरातील स्मशानभूमीत झाल्यानंतर करवीरकर जिजाबाईंनी त्यांचे समाधी मंदिर उभे केले. त्यानंतर त्याला संस्थान शिवसागर असे संबोधले जाऊ लागले. जिजाबाईंच्या मृत्यूनंतर याच मंदिरात जिजाबाईंची मूर्ती ठेवण्यात आली. या परिसरात दुसरे शिवाजी महाराज, त्यांच्या पत्नी दऱ्या आईसाहेब यांच्यासह अन्य आठ ते नऊ समाधीमंदिरे आहेत.
‘छत्रपतींकडील देवळांची माहिती’ या नोंदीमध्ये छत्रपती स्मारकाजवळील असलेले महादेव मंदिर, सीतालिंग आणि मातुलिंग (विहिण-विहिण मंदिर), नदीकडील बाणलिंग आणि तारकेश्वर आणि तीनलिंग मंदिर अशी मंदिरे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आठ पत्नींची मंदिरेही ‘आठलिंग’ या नावाने नदीपात्रात असल्याचा उल्लेख आहे. या परिसरात समाधी मंदिराखेरीज देवदेवतांची काही मंदिरे आहेत. काही मंदिरांवर शिलालेखही आढळतात. यातील काही शिलालेख मराठीत आहेत.
घाट परिसरात छत्रपती घराण्याची स्मशानभूमी आहे. तेथे दहन केलेल्या व्यक्तींची ही समाधी मंदिरे आहेत. तशी कागदपत्रे उपलब्ध आहेत. परिसरात असलेले ब्रह्मदेव मंदिर हे एकमेव नाही. जिल्ह्यात तशी आणखीही मंदिरे आहेत.
Nitin Kemse