पांडव लेणी (नाशिक)
आतापर्यंत नाशिक भेटीमध्ये अनेक वेळा नाशिक-मुंबई महामार्गाला लागून मोठ्या टेकडीवर असलेल्या पांडव लेण्यांना अनेक वेळा भेट दिली आहे. पांडव लेणी लेण्यावरून नाशिक शहराचे विहंगम दृश्य दिसते. या टेकडीच्या पायथ्याशी दादासाहेब फाळके स्मारक आहे. पांडवलेणे येथे वर जाण्यासाठी पायऱ्यांची बांधलेली वाट आहे.
कोणत्याही ऐतिहासिक स्थळांना भेट देण्याआधी जर त्या स्थळांची माहिती जर आपण घेतली तर आपण एका वेगळ्या दुष्टीने त्या ठिकाणाकडे बघत असतो. यासाठीच नाशिक येथील आमचे मित्र श्री. रमेश पडवळ (उपसंपादक महाराष्ट्र टाइम्स, नाशिक आणि हेरिटेज वॉक चे मुख्य आधार स्तंभ) यांनी लिहिलेली माहिती खाली देत आहे.
“भारतात खडकांत कोरलेल्या सुमारे १,२०० लेणी आहेत. त्यांतील हजाराहून अधिक लेणी महाराष्ट्रात आढळतात. बेसाल्ट प्रकाराच्या दगड महाराष्ट्राच्या डोंगरामध्ये सर्वाधिक असल्याने येथे जास्त लेणी खोदल्याचे दिसते. नाशिकच्या पांडव लेणीही प्रसिध्द आहेत. नाशिकपासुन ६ कि.मी. अंतरावर एका मोठ्या टेकडीवर या लेण्या आहेत. पांडव लेणीचा सर्वसाधारण काळ इ.स.पूर्व पहिले शतक ते इ.स. आठवे शतक असा मानला जातो.
या दगडांतील गुफांना लेणी असे का म्हटले गेले, याचे श्रेयही नाशिकच्या पांडवलेणीलाच लाभले आहे. पांडवलेण्यातील शिलालेखात ‘लेण’ हा शब्द प्रथम आलेला दिसतो. ‘एतच लेण महादेवी महाराज मातामहाराज पतामही ददाति…’. ‘लेण’ हा शब्द संस्कृत ‘लयन’ म्हणजे ‘गृह’ या शब्दावरून आला आहे. त्यापासून पुढे ‘लेणी’ हा शब्द तयार झाला. पांडव लेण्यांचे स्वरूप भिक्खूंाना राहण्यासाठी विहार असे होते. म्हणजेच बौद्ध भिक्षुकांना राहण्यासाठी त्यावेळी या लेणींची निर्मिती झाली, हेही समजते.
पांडवलेणीतील शिलालेखांमधून महत्त्वाची आणि ऐतिहासिक माहिती समजते. यातून त्यावेळीच्या प्रातांची नावे, पर्वत, नद्या, शहरे, गावे व खेडी अशा इतिहासातील बऱ्याचशा भागांचा खुलासा होतो. शिलालेखात कण्ह अथवा कृष्ण, हकुसिरि अथवा हकुश्री, क्षहरात आणि नहपान, उषवदात, गौतमीपुत्र सातकर्णी, वासिष्टिपुत्र पुलुमायी, यज्ञश्री सातकर्णी, माधरीपुत्र शिवदत्त आणि ईश्वर या राजांची नावे व वर्णन आढळतात.
पांडवलेण्यात एकंदर २४ लेणी २९ शिलालेख (शिलालेख म्हणजे दगडावर अक्षरे कोरलेली आहेत. ही ब्राह्मी लिपीतील) आहेत. त्यात चैत्य, लयन आणि सत्र असे गुहांमध्ये तीन प्रकार दिसतात. लेणी क्रमांक १४ मधील शिलालेखात दोन हजार वर्षांपूर्वी नाशिकचे नाव ‘नासिक्य’ असल्याचे दिसते. तर नाशिक हा जिल्हा नसून, सध्याचे गंगापूररोडवरील गोवर्धन हे गाव मुख्य बाजारपेठेचे ठिकाण होते हेही पांडवलेणी सांगते. केंद्रीय पुरातत्त्व खात्याने प्रत्येक लेणीला क्रमांक दिल्याने पर्यटकांना या लेणी क्रमांकानुसार पाहता येतात. मात्र त्या क्रमाने लेणीची निर्मिती झालेली नाही.
प्रत्येक लेणीचा निर्मिती काळ वेगवेगळा आहे. ही लेणी पाहण्यासाठी सुटीत नक्की जा. बुद्धांच्या लहानमोठ्या मूर्ती, लेणींवरील नक्षीकाम, विविध मूर्तींतून दिसणारे त्यावेळच्या जीवनपद्धती व वेशभूषा, लिपी यांची तोंडओळख नक्कीच पांडवलेणीच्या भटकंतीतून होईल. जागोजागी लेणीची माहिती करून देणारे फलक लेणीची माहिती तर देतातच पण प्रत्येक लेणं आपला इतिहास आपल्याला सांगायला आतुर झालेला दिसतो.”
लेखक : रमेश पडवळ
माहिती साभार – माझी भटकंती फेसबुक पेज