पांडव लेणी, नाशिक | Pandava Caves, Nashik –
नाशिक हे गोदावरी नदीच्या काठी वसलेलं एक प्राचीन शहर आहे. या शहरात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. त्यापैकी एक विशेष ऐतिहासिक स्थळ म्हणजे प्राचीन पांडव लेणी होय. खरं तर या लेण्यांची ‘त्रिरश्मी’ नावानं ओळख असल्याचं अनेक अभ्यासक सांगतात. मात्र पुर्वापार चालत आलेल्या समजुतीमुळे या पांडव लेणी (Pandava Caves Nashik) म्हणूनच ओळखले जातात.
पांडव लेणी नाशिक शहरापासून पश्चिमेला सुमारे ५ किमी. अंतरावर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गालगत आहेत. येथे तीन टेकड्या असून त्यांपैकी त्रिकोणी आकाराच्या ‘त्रिरश्मी’ टेकडीवर लेणी खोदल्या आहेत. या ठिकाणी एकूण २४ लेणी आहेत. लेणी-समूहात एक चैत्यगृह असून बाकीचे सर्व विहार आहेत. साधारणपणे येथील विहारांची ओसरी, मंडप व सभोवताली खोल्या अशी स्थापत्य-रचना आढळून येते. काही लेण्यांमधील मूर्ती अजुनही चांगल्या स्वरुपात आहेत. तर काही खंडीत स्वरुपात शिल्लक आहेत
लेण्यांमध्ये ब्राम्ही लिपीत कोरले गेलेले गौतमीपुत्र सातकर्णीची महती सांगणारे शिलालेख आहेत. ज्यांचा महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाच्या शिलालेखांमध्ये समावेश होतो. सातवाहन राजांनी ही लेणी खोदण्यासाठी वेळोवेळी दान दिले, असा उल्लेख येथील शिलालेखांत आढळून येतो. तसेच नासिकचा उल्लेख असणारा सर्वात जुना ज्ञात शिलालेख देखील येथे आहे. हा शिलालेख १४ व्या क्रमांकाच्या लेणीत असून जवळजवळ २२०० वर्ष जुना असलेला हा शिलालेख नासिकचे प्राचीनत्व सिद्ध करतो. येथील २४ लेण्यांमध्ये एकूण २७ शिलालेख कोरले असून त्यातून सातवाहन व पश्चिमी क्षत्रप यांच्या इतिहासाविषयी उपयुक्त माहिती मिळते.
रोहन गाडेकर