पंढरपुर…
पंढरपुरातील विठ्ठल मंदिरामुळे हे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. या मंदिराला आठ प्रवेशद्वारे आहेत. त्यातील पूर्वेकडील प्रवेशद्वाराला नामदेवांचे नाव देण्यात आले आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत येतात. क्षेत्रमाहात्म्यामुळे पंढरपुराला दक्षिण काशी व तसेच विठ्ठलाला महाराष्ट्राचेकुलदैवत म्हणतात..हे विठ्ठलमंदिर अवघ्या महाराष्ट्राचे एक चिरंतन स्फूर्तिस्थान आहे. गोरगरिबांचा देव म्हणून श्री विठ्ठलाची ओळख आहे.पंढरपूरच्या उत्तर दिशेला कैकाडी महाराज यांचा मठ आहे तिथे गुंफेत सर्व साधु संतांच्या मूर्ती आहेत.
पंढरपूर हे सोलापूरच्या पश्चिमेस ७१ किमी. वर, भीमा नदीच्या उजव्या तीरावर, समुद्रसपाटीपासून ४५० मीटर उंचीवर आहे. हे मिरज-कुर्डुवाडी रुंदमापी लोहमार्गावरील स्थानक असून येथून महाराष्ट्रात सगळीकडे जाणाऱ्या बस वाहतुकीची सोय आहे.
पंढरपूरमध्ये वर्षातून चार एकादश्यांना चार यात्रा भरतात – चैत्री, आषाढी, माघी व कार्तिकी. त्यातील आषाढी एकादशीला भरणाऱ्या यात्रेत १०-१५ लाख भाविक सहभागी होतात. पंढरपुराला मराठी संस्कृती घडविणाऱ्या थोर भागवतधर्मीय संतांनी नावारूपास आणलेले महाराष्ट्राचे आद्य व पवित्र तीर्थक्षेत्र मानतात.
चंद्रभागेच्या वाळवंटा(नदीकाठच्या छोट्याशा वाळूच्या मैदाना)पलीकडून उंच शिखरे, सपाट कौलारू छपरे, धर्मशाळा, झाडे व त्या सर्वावर उठून दिसणारी विठ्ठल, रखुमाई व पुंडलीक मंदिरांची उंच शिखरे व कलश हा सर्व देखावा फारच मनोहारी वाटतो. दगडी तटबंदीमागे हे विठ्ठलाचे देऊळ एका टेकडावर आहे. सुमारे ५२ मीटर रुंद व १०६ मीटर लांब अशी ही जागा असून सभोवार अरुंद फरसबंद रस्ते आहेत. पूर्वेकडे तीन, उत्तरेकडे तीन व दक्षिण व पश्चिमेकडे प्रत्येकी एक दार आहे. महाद्वार पूर्वेकडे असून, ज्या अकरा पायऱ्या चढून गेल्यावर ते लागते त्यांतील एका पायरीला `नामदेव पायरी’ म्हणतात. कोपऱ्यात देवळीमध्ये गणपती असून वरती नगारखाना आहे. महाद्वारावर सिंह, कमानी, वेलपट्टी वगैरे पुरातन चुनेगच्ची नक्षीकाम आहे .
मंदिराचे स्वरूप
मंडप १८ मीटर रुंद व ३७ मीटर लांब असून बाजूस असलेल्या ओवऱ्यांत सुंदर लाकडी कोरीवकाम दिसून येते. सुमारे १० मीटर उंचीच्या दोन दीपमाळा व जवळच विष्णुवाहन गरुड व हनुमान यांची मंदिरे आहेत. पुढील सोळा-खांबीत एका लहान सभामंडपातून जाता येते. येथील दाराचे बाजूस सुरेख जय-विजय व तीन पायऱ्या असून त्यापैकी एक पितळी पत्र्याने मढवली आहे. डाव्या बाजूस खजिन्याची खोली आहे. सोळा कोरीव दगडी खांब असून भाविकांच्या आशयाचा गरुडस्तंभ चांदीच्या पत्र्याने मढविला आहे. आत प्रवेश करताना उजव्या हातास संत एकनाथ महाराजांचे पणजोबा संत भानुदास महाराजांची समाधी आहे. सभामंडपाच्या उत्तरेकडे एक ओवरी असून त्यात काशीविश्वनाथ, राम-लक्ष्मण, काळभैरव, रामेश्वर, दत्तात्रेय आणि नरसोबा यांच्या देवळ्या आहेत.
चौखांबीच्या दरवाजास चांदीचे नक्षीदार पत्रे लावले आहेत. पूर्वेकडे शेजघर असून एका लहान अंतराळानंतर दोन मीटर चौरस गाभारा लागतो. रुक्मिणी मंदिरासारखी इतर लहान मंदिरे परिसरात आहेत. विठ्ठलाचेच परमभक्त पुंडलीक याची समाधी महाद्वार घाटावर आहे.
देवळास समांतर पूर्वेकडे जाणाऱ्या गल्ल्या घाटाकडे जातात. सर्व बाराही घाटांचा वापर वारकरी करतात. त्यातील उद्धव, चंद्रभागा, दत्ता व अमळनेरकर घाटांचा वापर प्रामुख्याने होतो. महाद्वार घाट हा उत्सवासाठी महत्त्वाचा आहे. नदीला पाणी कमी असताना नदीच्या पात्राजवळची जागा वारकरी उतरण्यास तसेच भजनकीर्तनास वापरतात. मठ, देवळे, आखाडे, धर्मशाळा, फड वगैरेमधून अनेक भक्तांची व वारकऱ्यांची सोय होते. सर्व पंढरपुरातच भाविकांची वर्दळ असते.
नदीकाठी चौदा घाट बांधलेले आहेत. मात्र ते सलग नाहीत. पुंडलिकाच्या देवळाच्या दक्षिणेस सुमारे १.२ किमी. वर विष्णुपद-वेणुनाद हे स्थान आहे. गावाच्या दक्षिणेस सुमारे १.६ किमी. वर गोपाळपूर येथे गोपालकृष्णाचे देऊळ आहे.
यांशिवाय पंचमुखी मारुती, भुलेश्वर, पद्मावती (देऊळ आणि तळे), व्यास, अंबाबाई, लखूबाई, यमाई, जोतिबा, नगरेश्वर, सरकारवाडा महादेव, त्र्यंबकेश्वर, ताकपिठ्या विठोबा, कोटेश्वर, गोंदवलेकर राम, खाजगीवाले वाड्यातील विठ्ठल, रुक्मिणी व राधा यांच्या सोन्याच्या मूर्ती, नामदेवमंदिर, शाकंभरी (बनशंकरी), मल्लिकार्जुन, तांबडा मारुती, मुरलीधर, गारेचा महादेव, चंद्रभागा, दत्त, वटेश्वर महादेव, बेरीचा महादेव, काळा मारुती, चोफाला (विष्णुपंचायतन), पारावरील दत्त, बाभळ्याचा महादेव, अमृतेश्वर ही व इतरही काही मंदिरे पंढरपुरात आहेत. अलीकडे काही नवीन मंदिरेही झाली असून येथील कैकाडी महाराजांचा मठ प्रेक्षणीय आहे.
१९४६ मध्ये साने गुरुजींनी महात्मा गांधींचा विरोध डावलून, हरिजनांना पंढरपूरच्या विठ्ठलमंदिरात प्रवेश मिळावा म्हणून उपवास केला, तेव्हा हरिजनांना मंदिर खुले झाले. चंद्रभागेच्या वाळवंटात तुकाराम महाराजांचे वंशज भाऊसाहेब देहूकर यांची व गोविंदबुवा अंमळनेरकर, गोविंदबुवा चोपडेकर, भानुदास महाराज वेळापूरकर यांच्या समाध्या आहेत. यात्रेच्या वेळी हजारो यात्रेकरू वाळवंटातच मुक्काम ठोकतात. त्रैलोक्यनाम भवन, तनपुरे मंडप वगैरे इतर महत्त्वाच्या वास्तू पंढरपुरात आहेत.
Credit – Wikipedia