महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,47,416

पंडित राम मंदिर

By Discover Maharashtra Views: 145 4 Min Read

पंडित राम मंदिर | Pandit Ram Mandir –

टिळक रस्त्यावरील टिळक स्मारक मंदिर माहित नाही, असा पुणेकर सापडणे विरळाच. सध्या जरी त्या जागेवर अद्ययावत नाट्यगृह असलेली इ‌मारत असली तरी तिथे पूर्वी एक छोटेखानी गढी होती. या गढीचा ऐतिहासिक कागदपत्रांतून विशेष उल्लेख आढळत नाही. असे असले तरीही ही गढी आपले अवशेष सांभाळून आजही राहती आहे. वाड्यात आजही पंडित घराण्याचे वास्तव्य आहे. हि गढी महाराज पंडितांची गढी या नावाने ओळखली जात असे.

पंडितांचे घराणे ऐतिहासिक आहे. श्री सिद्धेश्वर महाराज हे घराण्याचे मूळ पुरुष. कोल्हापूरकर छत्रपतींनी त्यांना राजगुरू नेमले, तसेच त्यांना ‘महाराज’ आणि ‘पंडित’ अशा पदव्या दिल्या. त्यांचे चिरंजीव भाऊमहाराज पंडित. पुण्यातील एक आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून ते ओळखले जात. तुळशीबागेसमोरच्या बोळात त्यांचा वाडा होता. आजही या रस्त्याला भाऊमहाराज बोळ या नावाने ओळखले जाते.
सदर गढी नक्की कोणी बांधली याबद्दल सध्या माहिती उपलब्ध नाही. छ. शाहू महाराजांनी कोणालाही गढ्या बांधायला परवानगी दिली नव्हती. त्यांच्या मृत्यूनंतर नानासाहेब पेशव्यांनी शनिवार वाड्याभोवती बुरूज बांधले. त्यामुळे पंडितांच्या गढीचे बांधकाम इ.स. १७५२ नंतरच्या काळातच झाले असायची शक्यता आहे. चार कोपऱ्यांवर चार अष्टकोनी बुरूज, सुमारे १५ फूट उंचीचा विटांच्या कमानी बांधकामाचा तट आणि पूर्वेला मोठे प्रवेशद्वार असे गढीचे स्वरूप होते. पेशवाई संपल्यावर पेशव्यांच्या ताब्यातील सर्वच मालमत्ता इंग्रजांच्या ताब्यात आल्या. त्यात ही गढीही होती. इ.स. १८१९ मध्ये भाऊमहाराजांच्या अन्य इनामी जमिनींना पुनर्मान्यता देताना एल्फिन्स्टनसाहेबांनी ही गढी त्यांना इनाम म्हणून सुपूर्त केली. भाऊमहाराजांनी या बांधकामाची उत्तम डागडुजी करून मध्यभागी आपला वाडा बांधला. वाड्यासमोर सुंदर दगडी बांधकामाची पुष्करणी बांधून त्यात शोभिवंत कारंजी उभारली. महाराज पंडितांचे वास्तव्य असल्याने त्या उजाड जागेलाही प्रतिष्ठा लाभली. आजूबाजूच्या हिरव्यागार प्रदेशात ही महाराज पंडितांची गढी शोभून दिसू लागली. गढीच्या आजूबाजूची सुमारे २५ – ३० एकर जागाही पंडितांच्या मालकीची होती.

भाऊमहाराजांच्या निर्वाणानंतर गढीतच वाड्याच्या मागील बाजूस पुष्करणीपलीकडे भाऊमहाराजांची समाधी असलेले छोटेखानी श्रीराम मंदिर उभारले गेले. सदर मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराचा गाभारा दगडी आहे. नक्षीदार दगडी चौथऱ्यावर रामाची संगमरवरी मूर्ती आहे. शेजारी सीता व लक्ष्मणाच्या मूर्ती आहेत. गाभाऱ्यात रामासमोर भाऊ महाराजांच्या पादुका आहेत. मूळ पुरुष सिद्धेश्वर महाराजांची तसबीर आणि जगन्नाथ महाराजांच्या खडावा आहेत. रामासमोर एका छोट्या देवळामध्ये मारुतीची संगमरवरी मूर्ती आहे. मंदिराला प्रदक्षिणा मार्ग आहे.
भाऊमहाराजांचे वारस बाबामहाराज पंडितांनी एक मुलगा दत्तक घेतला. तो अल्पवयीन असल्याने त्याच्या पालकत्वाची जबाबदारी त्यांनी लो. टिळकांवर सोपवली. हा मुलगा म्हणजे जगन्नाथमहाराज पंडित. टिळकांच्या प्रयत्नांनी ही गढी जगन्नाथमहाराजांच्या ताब्यात आली. या प्रकरणात टिळकांना भरपूर मनस्ताप झाला.

इ.स. १९२० मध्ये लो. टिळकांचे निधन झाल्यावर जगन्नाथ महाराज पंडितांनी, लोकमान्यांविषयी वाटणाऱ्या कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून, गढीतले घर टिळकांचे स्मारक व्हावे म्हणून दान केले आणि गढीतच शेजारी आपले नवे घर बांधून त्यात वास्तव्य केले. तेव्हापासून पंडितांची गढी टिळक स्मारक मंदिर म्हणून ओळखली जाऊ लागली. आपल्या ताब्यात असलेली गढीशेजारची २५ एकर मोकळी जागा, त्यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता शिक्षण प्रसारक मंडळींना महाविद्यालयासाठी दान दिली. त्या जागेवर सर परशुराम भाऊ महाविद्यालय बांधण्यात आले. कॉलेजच्या आवारात कृतज्ञता म्हणून जगन्नाथमहाराजांचा पुतळा उभारला आहे.
इ.स. १९२२ मध्ये पुणे नगरपालिकेने आखलेल्या लकडी पूल ते स्वारगेट या थेट रस्त्यासाठी गढीचा एक कोपरा पाडून आणि तटाला अगदी खेटून रस्त्याची आखणी केली आणि त्या रस्त्याला लो. टिळकांचे नाव दिले. इ.स. १९७३ मध्ये टिळक स्मारक मंदिराची, अद्ययावत नाट्यगृह असलेली इ‌मारत गढीतल्या स्मारकाच्या जागी उभी राहिली. भाऊमहाराजांच्या समाधीचे मंदिर एका कोपऱ्यात गेले. सुंदर पुष्करणी पाडली गेली. या अद्ययावत इमारतीशेजारीच महाराज पंडितांचा वाडा आहे. जगन्नाथमहाराज पंडितांचे सुपुत्र म्हणजेच प्रसिद्ध क्रिकेट-समीक्षक श्री. बाळ पंडित. त्यांचे वास्तव्य या वाड्यात होते. आजही पंडित कुटुंबाचे वास्तव्य या गढीतल्या वाड्यात आहे.

सदर जागा खासगी असल्यामुळे इथे प्रवेश निषिद्ध आहे. मंदिर बहुतेक वेळा बंद असते. राम नवमी, भाऊ महाराज पंडितांची पुण्यतिथी आणि सिद्धेश्वर महाराजांचा उत्सव हे कार्यक्रम मंदिरात होतात.

संदर्भ:
हरवलेलं पुणे – डॉ. अविनाश सोवनी
पुणे शहरातील मंदिरे – डॉ. शां. ग. महाजन
पुणे शहराचा ज्ञानकोश – डॉ. शां. ग. महाजन

पत्ता : https://maps.app.goo.gl/atvsYN2rJi5Sx1k2A

आठवणी इतिहासाच्या

Leave a Comment