महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,13,114

पानिपत | पराजयातला असामान्य विजय

By Discover Maharashtra Views: 2540 16 Min Read

पानिपत | पराजयातला असामान्य विजय –

पानिपत….जे नाव नुसत वाचलं/ऐकल तरी कित्येक मराठ्यांच्या(हिंदवी स्वराज्याचे सेवक मग ते कोणत्याही जाती चे असो) काळजात कुठे ना कुठे एक ठोका चुकतोच अन अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. इतकंच काय तर पानिपतचे नाव जरी उच्चारले तरी प्रत्येक मराठी माणसाच अंतर्मन अक्षरशः गदगदून येते. पानिपतच्या रणसंग्रामाची ‘सल’आज ही मराठी हृदयात लामणदिव्यासारखं मंद चिरकाल तेवत आहे. पानिपतमध्ये झालेला पराभव इतका दारुण होता व त्यामुळे झालेले नुकसान इतके भयंकर होते की त्या पराभवाची आठवण वा उच्चारनेसुद्धा काळजाचा थरकाप उडतो. ‘पानिपत होणे’ हा शब्दप्रयोग मराठी भाषेत सर्वनाश या अर्थाने रूढ झाला आहे. म्हणजेच या युद्धाची हानी आणि या पराभवाचे गांभीर्य काय आणि किती होते हे वेगळे सांगायची गरज नसावी. पानिपतचा पराभव ही मराठा आणि भारताच्या इतिहासातील खूप मोठ्ठी शोकांतिकाच होती.

पानिपतची लढाई म्हणजे भारताच्या आणि मराठ्यांच्या इतिहासातील अशी मोक्याची किंवा निर्णायक घटना होती की ती जिंकली असती तर मराठा साम्राज्याची सत्ता एक महासत्ता म्हणून उदयास आली असती. फक्त भारतीयच नव्हे तर परदेशी इतिहासकारांच्या मते हे युद्ध जर मराठ्यांनी जिंकले असते, तर त्यांनी हिंदुस्थानावर असा एकछत्री अंमल प्रस्थापित केला असता तोही इतका की की, ब्रिटिशांचं भारतातील आक्रमण देखील मराठ्यांनी सहजच उलथवून लावलं असतं. दुर्दैवाने हे युद्ध मराठ्यांना जिंकता आले नाही व त्यांच्या पराभवाची अंतिम परिणती हिंदुस्थानवर ब्रिटिशांचा अंमल प्रस्थापित होण्यात झाली. पानिपतचे युद्ध मराठे हरले असले तरी त्यांनी अहमद शाह अब्दालीचा ज्या प्रकारे प्रतिकार केला त्यातून धडा घेऊन अब्दाली ज्याने मराठ्यांना हरवून देखील भारतात परत आलाच नाही किंवा वायव्येकडील एकही आक्रमक त्यानंतर भारतावर हल्ला करू शकला नाही. हा मराठ्यांमुळे झालेला भारताचा एक महत्त्वाचा लाभ होय. दुसरे असे की पानिपतच्या रणभूमीवर एवढा जबरदस्त मार खाऊनदेखील मराठे परत उभे राहिले. अगदी १८५७ च्या उठावाच्या वेळीदेखील ब्रिटिशांना शेवटपर्यंत अडवून ठेवणारे नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे या मराठा लढवय्यांना हरवूनच भारतावर सत्ता प्रस्थापित केली.

इ.स. १७५८ मध्ये मराठ्यांनी दिल्लीवर कब्जा मिळवला व मुघलांना नाममात्र राज्यकर्ते बनवले. याच वेळेस अब्दालीचा मुलगा तिमूर शाह दुराणीला हाकलून लावले. मुस्लिम धर्मगुरुंनी याला आपल्या धर्मावरचे मोठे संकट मानले व मराठ्यांना प्रत्युतर देण्यासाठी आघाडी उघडण्याचे आव्हान केले. अफगाण सेनानी अब्दालीने याला होकार दिला. त्याने १७५९ मध्ये बलुच, पश्तुन व अफगाणी लोकांची फौज उभारली व उत्तर भारतातील छोट्या छोट्या चौक्यांवर हल्ले करण्यास सुरुवात केली व मराठ्यांशी उघड उघड वैर पत्करले. हर हर महादेव ची गगनभेदी गर्जना करत मराठी सैन्य शत्रूला भिडले. रणांगणावर तलवारीच्या खणाखनीने, घोड्यांच्या खिकाळ्यानी आणि वीरांच्या घोषणांनी नुसता हाहाकार माजवला. एका प्रहारापुर्वी निपचित पडलेल्या घाटाचे रूप पार पालटून गेले.

मराठ्यांकडे बंदुका नव्हत्याच. त्यात अब्दालीचे सैन्य म्हणजे ताज्या दमाचे अफगाण पठाण. त्यांच्या बंदुकीच्या माऱ्यापुढे तलवारीने लढणारे मराठे किती काल तग धरणार? एक एक मराठा सैनिक बंदुकीच्या गोळ्यांनी जायबंदी होऊ लागला. मराठ्यांच्या प्रेतांचा नुसता खच घाटात पसरलेला दिसू लागला. पण दत्ताजीला तर फक्त समोर येणारा अफगाण आणि त्याची मुंडी दिसत होती. त्याची तलवार विजेसारखी चालत होती. या संघर्षामध्येच मराठ्यांचा मुख्य सेनापती दत्ताजी शिंदे याची नजीबने अत्यंत क्रूर हत्या केली. साहजिकच मराठ्यांना याचे उत्तर देणे गरजेचे होते तसेच अब्दालीला हुसकावणे गरजेचे होते. नाहीतर उत्तर भारतात काही दशकात मिळवलेले वर्चस्व गमावण्याची भीती होती. म्हणून मराठ्यांनी पण १ लाखाहून मोठी फौज उभारली व पानिपतकडे कूच केले. सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांची मोहिम चालू झाली. अनंत अडचणींना तोंड देत सेना उत्तरेत पोहोचली. वाटेत होळकर, शिंदे, गायकवाड, बुंदेले यांच्या तुकड्या येउन मिळाल्या सैन्याला बळकटी मिळाली. राजपुतांचे सूरजमल व भरतपूरचे जाट देखिल मिळाले. या एकत्रित सैन्याने दिल्लीवर हल्ला केला व काबीज केली.

विश्वासरावला दिल्लीच्या गादीवर बसवायचा भाउंचा मनसुबा होता. भाउंनी रसदेअभावी दिल्लीलुटायचा आदेश दिला. परंतु शिखांनी व जाटांनी त्याला विरोध केला व ते युतीच्या बाहेर पडले. अब्दाली व मराठ्याच्या यांमध्ये नियमितपणे चकमकी घडू लागल्या कर्नाल व कुंजपुरा येथे दोन्ही फौजा भिडल्या. कुंजपुराच्या चकमकीत मराठ्यांनी अब्दालीची संपूर्ण तुकडी कापून काढली व कित्येकांना बंदी बनवले. नाजीब्चा गुरु कुतुबशहा ह्याला जनकोजी ने जमादाडा ने कापून काढले. ह्याच कुतुबशहा ने दत्ताजी शिंदेचा वध केला होता. सरहिंदचा सुभेदार अबुस समदखान, मोमीनखान आणि नजीबचा सख्खा चुलतभाऊ नाजाबतखान ह्यांना समाधी दिली. पाउस पडत असल्याने यमुना नदी पलीकडून अब्दालीला आपल्या सैन्याची काहीच मदत करता आली नाही. चिडून जाउन अब्दालीने आपल्या सैन्याला भर पुरात यमुना ओलांडायला सांगितले. गुलाबसिंग गुजर ह्याने अब्दाली ला सांगितले की गौरीपूरला गचका उतार आहे. अब्दालीने दक्षिणेकडे आपल्या फौजेची वाटचाल केली व बाघपत येथे यमुना ओलांडली. अब्दालीला रोकण्यात सखरोजी पाटील सातशे स्वारांच्या पथका समवेत शहीद झाला. यमुना ओलांडल्याचे मराठ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पानिपत जवळ तळ टाकला व बचाव भक्कम करण्यावर जोर दिला.

२६ ऑक्टोबर रोजी अब्दाली पानिपत व सोनपत मधील संबलका येथे पोहोचला. पुढे चालणार्‍या अब्दालीच्या आघाडीच्या सेनेची मराठ्याशी येथे जोरदार चकमक झाली व मराठे पूर्ण चाल करणार इतक्यात अब्दालीची कुमक पोहोचली व मराठ्यांचे जोरदार आक्रमणाचे मनसुबे थंडावले. दोन्ही बाजुनी मोठ्या प्रमाणावर सैन्य मारले गेले. मराठ्यांना व अब्दालीलाही या चकमकीमुळे मागे हटावे लागले व एकमेकांच्या सामर्थ्याचा अंदाज आला. युद्ध झालेच तर ते भीषणच होइल व प्रचंड जिवीतहानी होइल हे निश्चित झाले. अजून एका चकमकीमध्ये गोविंदपंत बुंदेलेंच्या सैन्य-तुकडीवर अब्दालीच्या सेनेने तुफानी हल्ला चढवला. ही तुकडी मुख्य सेनेसाठी रसद व घोडदळीची कुमक आणत होते. मराठ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले पण त्याही पेक्षा मोठे नुकसान म्हणजे, रसदेचा पुरवठा अब्दालीने पूर्णपणे तोडून टाकला.

मराठ्यांची उपासमार होऊ लागली. पुढील दोन महिने दोन्ही सेनांमध्ये सातत्याने चकमकी होत राहिल्या व एकमेकांवर कुरघोडी करणे चालू राहिले. अब्दालीला मराठ्यांच्या सामर्थ्याचा अंदाज आलेलाच होता व युद्ध फायद्यात नाही हे लक्षात आले होते. मराठ्यांच्या गोटातही उपासमार व बुणग्यांच्या ताणामुळे भाऊही संधीचाच मार्ग शोधत होता. मराठे पानिपतच्या उत्तरेकडे होते व त्यांचा मार्ग दक्षिणेकडे होता. त्यांचे मित्र पक्ष, त्यांचे रसद पुरवठादार, सैन्य कुमक हे सर्व दिल्लीच्या दक्षिणेकडे होते. तर अब्दाली पानिपतच्या दक्षिणेकडे होता. अशीच एकदम विरुद्ध स्थिती अब्दालीचीही होती. मराठ्यानी व अब्दालीने एकमेकांचा रस्ता आडवला होता एकमेकांचे वैर्य लक्षात घेता युद्ध किंवा संधी असे दोनच विकल्प होते. अब्दाली ने संधी करायचा प्रयत्न केला परंतु नजीबने तो होऊ दिला नाही, नजीबने इस्लामच्या नावावर युद्धाची शक्यता तेवत ठेवली. यामुळे मराठे अजून गोंधळात पडले. आज ना उद्या संधी होईल या आशेवर थांबले. दरम्यान धान्यसाठा संपत आलेला होता, यामुळे मराठ्यांना आजूबाजूच्या गावांमधून अन्न धान्य उचलण्याशिवाय पर्याय राहिला नाही. यामुळे स्थानिक नागरिकांचा मराठ्यांवरील रोष वाढला. याउलट अब्दालीला दक्षिणेकडील मित्र पक्षांकडून रसद पुरवठा होत राहिला. भाऊंनी सरतेशेवटी कोंडी मोडून काढण्याचा निर्णय घेतला. पहिल्या प्रथम तोफांनी अफगाण्यांना भाजून काढायचे व नंतर घोडदळाने आक्रमण करायचे व कोंडी मोडून जिथे रसद पुरवठा निश्चित होता त्या दिल्लीला पोहोचायचे, असे ठरले.

मराठ्यांतर्फे पहिले आक्रमण इब्राहिम खान तर्फे झाले जो आपले सामर्थ्य दाखवण्यास आतूर झालेला होता. मराठ्यांच्या तोफांची ताकद जरा जास्तच होती. तोफेचे गोळे अफगाण सेनेच्या डोक्यावरून गेले व अब्दालीचे फारसे नुकसान झाले नाही पण इब्राहिम खानने आपल्या कमानी रोहिल्यांवर भिडवल्या. मराठे गारदी, तिरंदाज व भालदारयांनी अफगाण व रोहिल्यांना मोठ्या प्रमाणावर कापून काढले. रोहिले मागे हटले, लढाईची सुरुवात इब्राहिमखानने गाजवली.परंतु दुपारी मराठी सैन्यच तोफखाण्या समोर आल्यामुळे तोफखाना बंद करावा लागला.यामुळेच युद्धाचे परिणाम बदलले,म्हणजेच युद्धाने पक्ष पात केला असे म्हणायाला हरकत नाही. दरम्यान भाऊंनी मध्यातून हल्लबोल केला व अफगाण्यांची कत्तल आरंभली अफगाण्यांच्या तकड्या पळ काढण्याच्या बेतापर्यंत भाऊने यश मिळवले शाह वली ने नवाब उद दौलाला मदत करण्यास बोलवले परंत नवाब आपल्या जागेवरुन हलला नाही. त्यामुळे काही काळ अफगाण्यांच्या गोटात गोंधळाचे वातावरण होते. अफगाणी कमानी पळ काढण्याच्या बेतात आहे हे पाहून मराठ्यांच्या घोडदळाला संयम आवरला नाही व आक्रमण केले परंतु उपाशी जनावरांनी ऍनयुद्धसमयी हाय खाल्ली, कित्येक घोडे रस्त्यातच कोसळले व घोडदळाच्या घावाचा दणका अफगाण सेनेला देता आला नाही. शिंद्यानी नजीब विरुद्ध आक्रमण केले, दत्ताजीच्या वधामुळे शिंद्याचे व नजीबचे वैर टोकाला पोहोचले होते. परंतु नजीबने शिंद्याच्या फौजेला यश मिळू दिले नाही. परंतु मराठ्यांचे रणांगणावर वर्चस्व अजूनही होते अफगाणी सेना वाकली होती परंतु अजून मोडली नव्हती.उजवी बाजू इब्राहिमखानने जवळपास कापून काढलीच होती. मध्य भागी भाऊंचा ताबा होता व अब्दालीच्या सेनेला दोन भागात विभागले होते व फक्त डाव्या बाजूला नजीबचा प्रतिकार अजूनही शाबूत होता.

मराठ्यांनी आपल्या सेनेची वाताहत केलेली पाहून अब्दालीने आपली राखीव सेनेचा पत्ता काढला. त्याने १५००० कसलेले योद्धे त्यांच्या मागे बंदूकधारी घोडदळ व उंटावर लादलेल्या छोट्या तोफा बाहेर काढले व चाल केली. या उंटावर लादलेल्या छोट्या तोफा पानिपतच्या युद्धात निर्णायक ठरल्या, या तोफा घोडदळाविरुद्ध अतिशय परिणामकारक ठरल्या तसेच मराठ्यांचे घोडदळ अफगाणी बंदुकधार्‍यांपुढे टिकाव धरू शकले नाहीत. राखीव फौज परिणाम कारक होत आहे हे पाहून त्याने अजून राखीव फौज पाठवली. जखमी सैनिकांनापण त्याने लढायला सांगितले. उरली सुरली १०००० ची राखीव फौजही त्याने नजीबच्या मदतीस पाठवली. याच वेळेस दमलेल्या मराठे सैनिकांना ताज्या दमाच्या सैनिकांचा सामना करायला लागला व मराठे मागे हटू लागले. याच वेळेस मागून पण तोफांना आपल्या फौजांना संरक्षण देता आले नाही. समोरुन येणार्‍याअ उंटांवरील तोफांसारखा मराठी तोफखाना लवचीक नव्हता व युद्धाचे पारडे फिरले. भाऊंना आपली कमान विस्कळीत झाल्याचे लक्षात आले व याच वेळेस ताज्या दमाचे राखीव सैनिक पुढे न आणण्यात भाऊंची चूक झाली व हत्तीवरुन उतरले व स्वता: पुढे राहून प्रेरीत करणार होते. परंतु मराठ्यांना भाऊ आपल्या हत्तीवर दिसले नाहीत व भाऊ पडले असे मरठयांना वाटले व संपूर्ण मराठे सैनिकांनी एकच हाय खाल्ली. विश्वासराव दरम्यान गोळी लागून ठार झाले होते व सर्वत्र गोंधळाचे वातवरण झाले आपला पराभव झाला असे समजून मराठ्यांनी पळ काढला. अब्दालीने रणभूमीवर ताबा मिळवला. मराठे युद्ध हरले. अब्दाली जिंकला.

पानिपतावर मराठे जरी हिंदुस्थानच प्रतिनिधित्व करत असले तरी मराठे विरुद्ध अफगाणिस्तान असे युद्ध झाले. कारण, या युद्धात केवळ महाराष्ट्रातील रांगडे, शूर मराठेच लढले. त्यांच्या शौर्याने, हौतात्म्याने मराठ्यांच नाव जगाच्या इतिहासात अजरामर झाले. पानिपत च्या युध्द भूमीवर झालेल्या तीन युद्धांनी भारताचा सर्व इतिहासच बदलून टाकला कारण तिन्ही युध्दात भारताला पराभव स्वीकारावा लागला. पहिल्या महायुद्धाने हिंदुस्थानात मुघल राजवटीचा उदय झाला. दुसऱ्या युद्धात अकबराने हेमू या हिंदू राजाची हत्या करून मुघल बादशाही अधिक बळकट केली, तर तिसऱ्या आणि सर्वाधीक विध्वंसक ठरलेल्या तिसऱ्या युद्धाने महाराष्ट्रधर्माला, मराठाशाहीला जगाच्या इतिहासात मानाचे स्थान मिळवून दिले. कित्येक परदेशी इतिहासकार पानिपतावरील मराठा पराक्रमाचे गोडवे गात असताना दुर्दैवाने काही भारतीय लेखक आणि स्वयंघोषित इतिहासकार पानिपत हे मराठे आणि महाराष्ट्रावरील कलंक आणि अपयश असल्याचे मानतात.

नुसता इतिहास वाचलाय अश्या बहद्दरांना अपयश दिसेल पण ज्यांनी त्यावेळची राजकीय आणि भौगोलिक परिस्थिती समजली असेल त्यांना मात्र परभावमध्ये लपलेला मराठ्यांच्या कर्तृत्ववाचा आणि शौर्याचा मोठा विजय दिसून येईल. वास्तविक पाहता दिल्लीत मुसलमानी राजवट असताना शेकडो मैल दूर असलेल्या पुण्यावरून मराठा लष्कराला पानिपतावर जाण्याची मुळीच गरज नव्हती. खरे तर दिल्लीच्या रक्षणाची जबाबदारी मुघलांची हुजरेगिरी, गुलामगिरी करणारे, त्यांच्या बाजूने लढणारे तत्कालीन राजपूत, जाट, मुस्लिम संस्थानिक, राजेरजवाड्यांची होती. दिल्लीच्या इभ्रतीचे रक्षण करण्यासाठी आलेल्या मराठ्यांना मदत न करता बिळात लपून बसणाऱ्या वर उल्लेखित सर्वांसाठी पानिपत हे कलंक आहे. या भूमीचे अन्न खाल्लेला, तिच्यावर पोसला गेलेला रोहिलखंडचा नजीब खान, अवधचा नबाब शुजाउद्दोला यांनी मराठ्यांच्या राष्ट्रधर्माची बाजू न घेता आपल्या धर्माची तळी उचलून धरत देशाशी बेइमानी केली. त्यामुळे पानिपतचा कलंक हा मराठ्यांवर नव्हे, तर या सर्व बेइमानांवर आहे. पानिपतावर मराठे प्राणाची आहुती देत असताना महाराष्ट्र वगळता उर्वरित हिंदुस्थानातील तथाकथित ‘पराक्रमी’ राजे-महाराजे, संस्थानिक गंमत पाहत होते. धर्माने मुसलमान असलेल्या दिल्लीच्या बादशहाचे राज्य शाबूत ठेवण्यासाठी लाखभर मराठ्यांनी मैदानावर जिवाची जी होळी खेळली, त्याला देशाच्या इतिहासात तोड नाही.

अफगाणिस्तानचा शासक अहमदशहा अब्दाली, भारतातील बेइमान नजीबखान रोहिला आणि अवधचा नबाब शुजाउद्दोला यांनी हे युद्ध धर्मासाठी लढले. मोगल बादशहाची बहुसंख्य प्रजा हिंदूधर्मीय असली तरी मोगल दरबारात हिंदूंचे वर्चस्व कधीच नव्हते. मराठ्यांमुळे आता दिल्लीच्या पातशाहीच्या कारभारात हिंदूंचे वर्चस्व वाढत आहे अशा शंकेने व्याकूळ झालेल्या काही कट्टर मुसलमानांनी मराठ्यांनी नर्मदापार होऊन महाराष्ट्रात परतावे यासाठी अहमदशहा अब्दालीच्या धर्मभावनेस आवाहन करून हिंदुस्थानवर स्वारी करण्याची जणू official  सुपारी दिली. या कारस्थानात मुस्लीम विचारवंत व धर्मगुरू शहा वली उल्लाह हा प्रमुख असून रोहिल्यांपैकी नजीबखानाने त्याला राजकारणातील साथ दिली. अब्दालीला यात लूट तर मिळणार होतीच, परंतु धर्मरक्षणाचे पुण्यही मिळणार होते. परंतु, मराठ्यांनी देशासाठी युद्ध केले. कारण, मराठ्यांचे लष्कर हे अठरापगड जातींचे होते. त्यात मराठा, ब्राह्मण, मुस्लिम, हबशी यांच्यासह महाराष्ट्रातील बारा बलुतेदार शिपाई सहभागी झाले होते.

भगवा झेंड्याच्या रक्षणासाठी मुस्लिम असलेल्या इब्राहिम खान गारद्याने धर्मासाठी नव्हे, तर राष्ट्रकार्यासाठी प्राणाचे बलिदान दिले. सदाशिवराव भाऊने तर पानिपतावर अभिमन्यूप्रमाणे लढताना अतुलनीय पराक्रम गाजविला. त्यांच्या शौर्याला तोड नाही. अनेक सरदार त्यांना रणांगण सोडण्याचे सल्ले देत असताना भाऊने देशकार्यासाठी मरण पत्करण पसंत केले. शहाण्णवकुळी मराठ्यातील असे एकही घराणे नव्हते की, ज्याने पानिपतावर तलवार गाजविली नाही. शिंदे घराण्याच्या अख्ख्या एका पिढीनेच पानिपतावर हौतात्म्य पत्करले. या युद्धाचे  नेतृत्व अनुभवी दत्ताजी शिंदे अथवा मल्हारराव होळकर यांच्याकडे असते तर युद्धाचा निर्णय वेगळा लागला असता. आणि या धोरणावर फक्त सदाशिवराव आणि विश्वासराव यांच्या मुळे पराभव झाला एकेरी तर्क लावून जर इतिहास मांडत असू तर पेशव्यांच्यासहित मराठा, ब्राह्मण, धनगर, मुस्लिम, हबशी यांच्यासह महाराष्ट्रातील बारा बलुतेदार जाती जमातींचे शिपाई यांच्या बरोबर इब्राहिम खान गारदी यांच्या देशभक्तीला आणि पराक्रमाला गालबोट लावण्यासारखे आहे.

पानिपत च्या पराभवाची कारणं तुम्ही शोधाल तेवढी मिळतील पण शौर्य आणि पराक्रमाच कौतुक करताना हात का आखडता घ्यावा. अनेक लोकांच अस म्हणण आहे कि झाला तो इतिहास होता तो इतिहासातच ठेवा आजच काय ते बोला, पण मी म्हणतो मराठी शूरांनी त्या वेळी गाजविलेल्या मर्दुमकीचा ,त्यांच्या शौर्याचा जाज्वल्य इतिहास,त्यांचे बलिदान नव्या पिढीला कसे कळणार. त्यांचे हे कार्य विसरून कसे चालेल,ह्याचा अभिमान बाळगायला हवा,त्यांचा दुर्दम्य आत्मविश्वास, पराभवानंतरही खचून न जाता घेतलेली गरुडझेप ह्यापासून आपण काहीतरी स्फुर्ती,प्रेरणा घ्यायला हवी. मरणासन्न अवस्थेत असून देखील दत्तोजी शिंदे यांची नजर तलवारीच्या शोधतच होती.

नजीबाने दत्तोजी च्या मानेवर जमदाडा ठेवत खोचक पणे प्रश्न विचारला “क्यू पाटील, और लडोगे?” हे ऐकताच उरलेली ताकद ऐकवतात रणशूर दत्ताजीने वाघासारखी डरकाळी फोडली, “क्यो नही, बचेंगे तो और भी लडेंगे!” एवढा जबरदस्त confidence तोही ताज्या दमाच्या अफगाणी फौजांपुढे परमुलखात जाऊन मराठी फौजांनी अतुलनीय शोर्य गाजवले आणि मराठी माणसाच्या लढवय्या बाण्याचे दर्शन शत्रूला घडवले हे नाकारून चालणार नाही. वयाच्या अवघ्या अठ्ठाविसाव्या वर्षी अनंत अडचणींना तोंड देत,हिदुंस्थानासाठी मायभूमीपासून इतक्या दूर जाऊन अगदी धीरोदात्तपणे झुंझार लढा देवून वीरगती पत्करलेल्या तरीही त्याच्या मायभूमीने वेडा ठरवलेल्या,दुर्दैवाने एका मोठ्या शोकांतिकेचा धनी बनलेल्या, पानिपत च्या रणभूमीवर आजही एखाद्या कोपरयावर विचारमग्न होउन बसलेल्या भाऊच्या मनावरील भार आपल्याला थोडा कां होईना कमी करायचा आहे, म्हणूनच कित्येक इतिहासकारांनी पानिपतचे वर्णन “पराजयातला असामान्य विजय” असे केले आहे. काळ मागे पडत राहील, पण इतिहासात पाहिलं तर मराठी माणसाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दाखवलेलं असामान्य धैर्य नव्या पिढीला कायम प्रेरणा देत राहील.

लेखन व माहिती संकलन – विजयश श्रीकांत भोसले

Leave a Comment