पानीपत भाग १
अखंड हिंदुस्थानाच्या इतिहासाचं एक अजरामर पान…
आदरणीय शिवभुषण निनादरावजी बेडेकर आपल्या एका व्याख्यानावेळी सांगत होते की पानीपताची सुरुवात हि औरंग्याच्या मृत्यु पासून झाली.ते बरोबरंच आहे.कारण औरंगजेब ह्याला मराठ्यांनी ह्याच मातीत गाडला,पुढे मराठ्यांची वाढती ताकत व दिनदुबळे होत चाललेले मुघल.शाहु छत्रपती व बाजीराव पेशवे यांच्यावेळी सुरु झालेली घोडदौड नानासाहेब पेशवे ह्यांच्या कारकिर्दीत वेगळ्या ऊंचाईवर होती.अटकेपार भगवे फडकले,मराठ्यांचे घोडे चिनाब, झेलम नदीचे पाणी प्यायले.लाहोर, पेशावर, अटक आता मराठ्यांचे घर अंगन झाले होते.मराठ्यांच्या ह्याच ताकतीमुळे त्यांणा दिल्लीपती बादशाह ने अनेक नजराने, चौथाई, किताब व दिल्ली रक्षणाची जबाबदारी दिली होती.(पानीपत भाग १)
दि १२ जानेवारी १७५६ रोजी अब्दालीची चौथी स्वारी हिंदुस्थानावर होती.त्यावेळी त्याने अडीच महिने दिल्लीत धुमाकुळ घातला व एकूण २४ कोटिची लुट सोबत नेली.. त्यावेळी उत्तरेत मराठ्यांचे अंताजी मानकेश्वर हे एकच मोठे सरदार होते म्हणून फौजे अभावी मराठ्यांनी फारशी काही हालचाल केली नाही. अब्दाली आणि नजीब दोन नाहीत हे अंताजी माणकेश्वरांनी अचुक ओळखलं अब्दाली नजीबमुळेच हिंदुस्थानात आलाय हे ते जाणून होते.दि ३ जुलै १७५७ रोजी अंताजीराव सदाशिवरावभाऊंना अब्दालीबद्दल पत्र लिहून कळवतात की,शुजा आणि वजीर शहावलीखानाच्या संयुक्त फौजांशी आमची लढाई झाली आणि आम्ही त्यांना हरवलं.. पुढे रघुनाथराव ह्यांचा नेतृत्वात मोहिम आखली गेली ज्यात मानाजी पायगुडे, मल्हारराव होळकर व अनेक मोठी मंडळी होती.त्यावेळी दिल्ली,लाहोर, पेशावर, अटक घेऊन मराठे पार खैबरखिंडी पर्यंत गेले.व अब्दालीचा मुलगा तैमूरशाह ह्याला खैबरखिंडी पर्यंत खेदडले..त्यावेळी राघोबादादांनी नानासाहेब ह्यांना पुणे येथे पत्र पाठवले की आज्ञा असल्यास काबुल कंधार वर आक्रमण करतो..पण त्याला अनुमती भेटली नाही.
दि.३ जून १७५८ रोजी अंताजी माणकेश्वर रघुनाथरावांना सोनपतच्या मुक्कामाहून पत्र लिहून कळवतात की “स्वामींच्या आज्ञापत्रे वरचेवरी आली की हुजूर भेटीस येणे.त्याजवरून गुरुवारी दिल्लीहून निघालो ते आजी (शनिवारी)सोनपतास पावलो.पुढे दरकूच सेवेसी येतो.पर्जन्य मार्गी अतिशये लागला आहे.परंतु तैसेच येत आहो.वजीर फारच यावयाचा अतिशय करत होता.परंतु स्वामींची आज्ञा नव्हती यांजकरीता तूर्त राहावीला आहे” यावेळी राघोबादादा अटकेतुन पुन्हा माघारी हिंदुस्थानात यायला निघाले होते.हि सुरुवात होती पानीपताची कारण अब्दाली विचारात पडला होता. खैबरखिंडी पर्यंत येणारे मराठे आज ना उद्या थेट कंधार मधे येतील.ह्याच गोष्टिचा फायदा रोहिलखंडाच्या नवाबाने म्हणजे नजिबखान रोहिला किंवा नजीब उद्यदौला याने घेतला..मराठ्यांचा हाडाचा वैरी मराठे हिंदुस्थानात एकहाती अघोषित सत्ताधीश झाले होते व हे त्याला खपत नव्हते..अनेक गोष्टिमुळे मराठे व त्याचे खटके उडु लागले.एकदा तर मराठ्यांनी त्याला पकडले होते पन मल्हारराव होळकर यांच्या मुळे तो वाचला कारण त्यांचा तो धर्मपुत्र म्हणजेच मानसपुत्र होता.त्याने अफगाणिस्तानचा बादशाह अहमदशहा दुर्रानी ह्याला हिंदुस्थानात इस्लाम धोक्यात आहे.अस सांगून धर्माच्या नावावर हिंदुस्थानात पाचवी स्वारी करण्यास सांगितली.जी अब्दाली ने मान्य केली.व हिंदुस्थानावर येऊन लक्ष केलं दिल्ली.साहजिकच अहमदिया करारामुळे दिल्ली रक्षणाची जबाबदारी मराठ्यांची होती.(पानीपत भाग १)
अहमदीया करार नेमका काय ?
अब्दालीच्या चौथ्या स्वारीपूर्वी वजीर सफदरजंग याने अहमदशाह बादशहाला हे पटवून दिलं, की बादशाहीचं रक्षण करण्यासाठी केवळ मराठेच योग्य आहेत. त्यावरून बादशहाच्या वतीने वजीर तर नानासाहेबांच्या वतीने शिंदे-होळकरांनी कनौज येथे दि. २३ एप्रिल १७५२ रोजी करारावर सह्या केल्या.पण नेमकं याच दिवशी दिल्लीत बादशाहने अब्दालीचा वकील कलंदरखान याच्याशी तह केला. इकडे मराठे दिल्लीकडे येत आहेत हे पाहून अब्दालीने दिल्लीत शिरायचं धाडस केलं नाही.बादशाहाशी कनोज येथे झालेला हा करार म्हणजेच इतिहासात प्रसिद्ध असलेला “अहमदनामा” अथवा“अहमदिया करार”होय.
मराठ्यांचे मोहिम नियोजन सुरु झाले होते.रघुनाथराव ह्यांनी अगोदर हि त्याभागात स्वारी केली असल्याने त्यांणा अगोदर नेतृत्व देण्याचे ठरले पन त्यांनी तब्बल १ कोटि खजिना व ७० हजार फौजेची मागणी केली.जी अनेकांना न पटण्यासारखी होती.राघोबादादांचे मागील मोहिमेचे सुद्धा खुप कर्ज झाले होते . नुकताच झालेला उदगीर विजय यामुळे मराठे तर जोशात होते पन सदाशिवराव भाऊ ह्यांच्या कामगिरीवर हि सर्व खुश होते म्हणून ह्या मोहिमेच नेतृत्व त्यांणा देण्यात आले.. त्यांच्या सोबत विश्वासराव पेशवे, मल्हारराव होळकर, जनकोजी शिंदे,मानाजी पायगुडे, बळवंतराव मेहेंदळे ,समशेर बहाद्दर,दमाजी गायकवाड व इब्राहिमखान गार्दी अशी अनेक मोठमोठी मंडळी होती.
१० जानेवारी १७६० रोजी बुराडी घाट येथे नजिबखान व त्याचा धर्मगुरु कुतुबशाह यांच्या सोबत झालेल्या चकमकित मराठ्यांचे सरदार दत्ताजी शिंदे धारातीर्थ पडले..”बचेंगे तो और भी लडेंगे” हे त्यांचे उद्गार प्रसिद्ध आहेत. इकडे फौज जमवत मराठे निघाले ते थेट दिल्लीत त्यावेळी दिल्ली अब्दालीच्या ताब्यात होती व तिथ याकुबखान नावाचा त्याचा सरदार होता..मराठ्यांनी दिल्ली घेतली.पैसे अभावी दिल्लीतली सदरेवरील चांदी खाडून बादशाहच्या नावाने नाणी पाडली व काही काळ खर्च भागवला.पुढे मराठे कुंजपुऱ्याच्या किल्यावर गेले तिथ त्यांना अब्दालीच्या परतीच्या प्रवासाचे धान्य, जनावर व पैसे सापडले.व कुतुबशाह हि जीवंत भेटला त्याला पकडून ज्यावेळी हत्ती वरुन आणले तेव्हा भाऊसाहेब चवताळले व त्याला खाली खेचुन विचारले की दत्ताजींचा शिरच्छेद तुच केला ना ? त्यावर तो बोलला की मी माझा धर्म केला हे ऐकताच भाऊसाहेबांनी त्याचा शिरच्छेद केला व त्याचे मुंडके भाल्यावर लटकवून फौजेत फिरवले. मधे अनेक छोटे -मोठे प्रसंग झाले ते आता वर्णावे काय.आणि अखेर दोन्ही फौजा पानीपत भुमीवर आल्या व एकमेकांचा परतीचा मार्ग अडवून बसल्या .
१३ जानेवारी १७६१ ला अब्दाली ने प्रथम तहाची बोलनी केली पण त्याने दिल्लीचा वजीर नजीबास करण्याचे सांगितले .व त्याला भाऊ अनुकुल नाही झाले.नजिबखानाच्या खेळी मुळे बोलनी फिस्कटली. व १४ जानेवारी १७६१ ला पहाटे ४ वाजता मराठ्यांच्या फौजा तयार झाल्या पहिले आक्रमण मराठ्यांनी केले.इब्राहिमखान गार्दीच्या तोफ खान्यापुढे दुर्रानी फौज तक धरेना.दुपार पर्यंत मराठे विजयी चिन्ह दिसत होती.सकाळभर मराठ्यांच्या फौजांनी अब्दालीच्या फौजांना मधल्या आणि उजव्या फळ्यांमधून मागे रेटले. पण मराठ्यांच्या समस्या दिसू लागल्या. पायदळ आणि घोडदळाचा मेळ जमेना. पायदळ शिस्तीत पुढे चालले होते; पण मराठ्यांचे घोडदळ अब्दालीच्या घोडदळाला जमेल तसे भिडले. लढाईत आज्ञा देण्यात एकवाक्यता नव्हती. प्रत्येक सेनानी आपापले डावपेच चालवत होता. तोफखाना पूर्णत: निरुपयोगी ठरला. तोफा निश्चल झाल्या होत्या, संथ गतीने मारा करत होत्या आणि निशाणा साधण्यात चुकत होत्या. अब्दालीच्या हलक्या, चक्राकार फिरू शकणाऱ्या तोफा अधिक प्रभावी ठरत होत्या. दुपारी उशिरा एका अतिशय महत्त्वाच्या क्षणी अब्दालीचे ५००० चे ताजेतवाने, राखून ठेवलेले घोडदळ चालून आले आणि त्याने मराठ्यांच्या मधल्या फळीत खिंडार पाडले.(पानीपत भाग १)
पानिपतच्या रणभूमीवर १४ जानेवारी १७६१ रोजी सदाशिवराव भाऊ मराठी सैन्याच्या मध्यभागी प्रथम हत्तीवर बसून लढत होते. सकाळी लढाई सुरू झाली. त्यावेळी विश्वासराव हत्तीवरून लढत होते. दुपारी हत्तीवरून उतरून ते दिलपाक नावाच्या घोड्यावर बसून लढाई करू लागले. मात्र याचवेळी तिसऱ्या प्रहरी गोळी लागून ते धारातीर्थी पडले. त्यावेळी सदाशिवराव भाऊ जवळच लढत होते. त्यांनी विश्वासरावांचे पार्थिव हत्तीवरील अंबारीत ठेवले. बापूजी हिंगणे ते पार्थिव धरून बसले. विश्वासराव पडताच मराठी सैन्याचा धीर खचला. सैन्यात पळापळ सुरू झाली. सदाशिवराव भाऊ विश्वासरावांच्या मृत्यूने आवेशाने शत्रूसेनेत घुसले . विश्वासराव पडताच रणभूमीवर अंबारीत बसलेल्या पार्वतीबाई यांनी टाहो फोडाला. नाना फडणवीस यांच्या मातोश्रीही त्या अंबारीत होत्या. त्या पार्वतीबाईस समजावू लागल्या. या अशा युद्धांमध्ये एखाद्या मुख्य सेनानीचा मृत्यू किंवा त्याचे पकडले जाणे फार निर्णायक ठरते आणि त्या सेनानीची फौज शिस्तबद्ध माघार न घेता सैरावैरा पळू लागते. मराठ्यांची सेना अशीच पळू लागली. अफगाण फौजेने रात्रभर त्यांचा पाठलाग केला.अंदाजांमध्ये बराच फरक असला, तरी किमान ५०००० सैनिक आणि इतर लोक मारले गेले.
अब्दालीच्या सेनेने हजारो घोडे, बैल पकडले, बाजारातून लुटता येईल तेवढे लुटले. पानिपतच्या रणभूमीवर विश्वासराव पेशवे यांचा मृतदेह ज्या हत्तीवर ठेवण्यात आला होता, तो हत्ती अफगाण सैन्याच्या हाती लागला आणि बापूजी हिंगणेही कैद झाले. ही बातमी शुजादौल्लास लागल्यावर त्याने ते पार्थिव ताब्यात घेतले. अब्दालीने स्वार पाठवून ते पार्थिव पाहण्यासाठी आपल्या छावणीत आणले. अठरा वर्षांच्या मिशीही न फुटलेल्या सुंदर तरुणाचे प्रेत पाहून सर्वांना हळहळ वाटली. दुराणी शिपायांनी ते पार्थिव पाहून अहमदशहा अब्दाली यास एक विनंती केली की, मराठ्यांच्या राज्याचे हे प्रेत आम्हास द्या, आम्ही त्यात पेंढा भरून ते काबूलास विजयचिन्ह म्हणून नेतो. पण तसे काही न होता गणेश वेदांती व काशीराजा वगैरे मुत्सद्दी लोकांनी एक लाख रुपये भरून अब्दालीकडून विश्वासरावांचे प्रेत सोडवून घेतले. शुजाच्या विनंतीवरून ते त्याच्या छावणीत परत आणून त्याचे शास्त्रोक्तपणे दहन करण्यात आले.
संदर्भ सुची –
१)राजवाडे खंड १, ले. १;
२)शिंदेशाही इतिहासाची साधने ३, ले. २०४
३)पेशवे दप्तर.२१.ले १६०
४)पेशव्यांची बखर – का.ना.साने
५)भाऊसाहेबांची कैफियत – र.वि. हेरवाकर
६)श्रीमंत नानासाहेब पेशवे – रियासतकार देसाई
७)द मराठाज (देशमुख-वतनदार-छत्रपती-पेशवा) – डॉ.स्टुअर्ट गॉर्डन
८)सकलराजकार्यधुरंधर सदाशिवरावभाऊ – कौस्तुभ कस्तुरे
९)पेशवाई – कौस्तुभ कस्तुरे
१०)अंताजी माणकेश्वर गंधे – कौस्तुभ कस्तुरे
लेखन – प्रसाद पाठक ,नंदुरबार
इतिहास अभ्यासक मंडळ