उपेक्षित पाणपोई, पोईचा घाट ?
सुपा गावातून पाटसकडे जाणा-या रस्त्याने सुमारे पाच किलोमीटर अंतर गेल्यावर पोईचा घाट उतार सुरू होतो, तेथेच उजव्या बाजूला ही उत्तराभिमुखी वास्तू आपले गतकाळचे वैभव सांभाळत नेटाने उभी आहे. ह्या घाटाला ‘पोईचा घाट’ किंवा ‘ ५६ मिरीचा घाट ‘ या नावाने ओळखले जाते. सामाजिक वनीकरणच्या निर्रोपयोगी वनस्पतींची गराड्यात असल्यामुळे चटकन लक्षात येत नाही.
संपूर्ण दगडी बांधकामातील चार पाच फूट उंचीच्या जोत्यावर शुष्कबांधा पद्धतीने चौदा नक्षीदार स्तंभावर ही वास्तू उभी आहे. इमारतीचे हे स्तंभ तळाशी खाचेच्या घडीव दगडावर सुमारे चारपाच फूट उंचीच्या कलात्मक स्तंभावर, गोलाकार व शेवटी चार बाजूनां विस्तारीत होणाऱ्या दगडांवर दगडी छत आच्छादलेले आहे. छत व स्तंभा दरम्यान असलेल्या दगडावर उलट्या सुबक नाग प्रतिमा कोरलेल्या आहेत. तीनहि बांजूच्या दगडी भितींना कोठेहि गवाक्ष किंवा दरवाजा नाही, इमारतीच्या डाव्या भिंतीत चौकोनी आकाराची जागा निर्माण केलेली आहे तर डाव्या बाजूच्या कोपऱ्यात जमिनीत पुरलेला भव्य दगडी रांजण आहे. आतील तळाशी असलेल्या दगडींचे खोदकाम झालेले दिसून येते.
सुमारे हजार वर्षापेक्षा जास्त कालखंडापूर्वीची ही वास्तू असावी. ही निव्वळ पाणपोई म्हणणे संयुक्तिक होणार नाही कारण येथे कधीकाळी व्यापारी/प्रवासी रात्रीचा मुक्काम करीत असले पाहिजेत. या वास्तूचा निर्माता किंवा कालखंड उजेडात आल्यास ऐतिहासिक ‘सुपा परगणा’ बाबतीत नवीन इतिहास उपलब्ध होईल असे वाटते. या वास्तूचा निर्माता किंवा कालखंड उजेडात आल्यास ऐतिहासिक ‘सुपा परगणा’ बाबतीत नवीन इतिहास उपलब्ध होईल असे वाटते.
© सुरेश नारायण शिंदे, भोर