परांडा किल्ला –
उस्मानाबाद म्हणजेच धाराशीव जिल्ह्यात परांडा या तालुक्याच्या गावी एक भव्य असा भुईकोट परांडा किल्ला उभा आहे. ह्याला ऐतिहासिक महत्त्व खूप आहे. परांडा हे गाव पुणे सोलापूर महामार्गावरील टेंभुर्णीपासून ५० कि.मी अंतरावर आहे. परांडा किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याभोवती असणारा खंदक. खंदकावरून किल्ल्यात येण्यासाठी पुलाची सोय आहे. किल्ल्याचे प्रवेशद्वार भव्य आहे आणि आतमध्ये परत एक प्रवेशद्वार आहे ज्याच्यावर शरभशिल्प कोरलेले आहे.
किल्ल्याला एकूण २६ बुरूज आहेत. आतमध्ये भव्य खोलीत असंख्य तोफा आणि तोफगोळे आहेत. पायऱ्या असलेली उत्कृष्ट स्थापत्य कलेचा नमुना असलेली बारव म्हणजे विहीर आहे. इमारती आहेत, हमामखाना आहे त्याच्याजवळ एक कारंज्यासाठीचा तलाव आहे ज्याला दगडी पाईपलाईनद्वारे पाणी आणल्याची सोय आहे ते पहाता येते. बुरूजावर भव्य तोफ आहे.
परांडा किल्ल्याचा उल्लेख पाकीयांडा, प्रत्यंडका असा होन्नती येथील शिलालेखात इ.स. ११२४मध्ये आलेला आहे. कल्याणींच्या चालुक्यांच्या ताम्रपटात पण आहे. किल्ल्याची उभारणी बहामनी सुलतानांचा वजीर महमूद गवान याने तो बांधला. केव्हा बांधला याची नोंद नाही. किल्ला सुमारे १५ व्या शतकाच्या उत्तरार्धात बांधला असावा असा अंदाज आहे. इ.स. १५९९ मध्ये मुघल सैन्याने अहमदनगरच्या निजामशहाला पराभूत केले.
मुघल जिंकले तरी निजामशाहीच्या सरदारांनी मुर्तुजा निजामशहाच्या नावाने राज्य चालविण्याचा निर्णय घेतला. नवीन राजधानी म्हणून परांडा किल्ल्याची निवड केली. इ.स. १६३० च्या सुमारास हा किल्ला शहाजीराजांच्या ताब्यात होता. नंतर पुन्हा तो मुघलांकडे गेला आणि नंतर हैद्राबादच्या निजामाकडे भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत परांडा किल्ला होता. इ.स. १६३० मध्ये तो विजापूरच्या आदिलशाकडे गेला. त्यांच्याच मुरारजगदेव नावाच्या सेनापतीने या किल्ल्यातील प्रसिद्ध मुलुखमैदान तोफ १६३२ साली विजापूर येथे नेली.
टीम – पुढची मोहीम