परांजपे दत्त मंदिर, सोमवार पेठ, पुणे –
सोमवार पेठेत असणाऱ्या जुन्या बेलबागेतल्या काळा राम मंदिरासमोरच्या छोट्या रस्त्याने पुढे गेले कि, उजव्या हाताला एक लाकडी चौकटीचा दरवाजा दिसतो त्यावर श्री दत्त मंदिर अशी लाल अक्षरामधली पाटी आहे. त्या मंदिराचे पूर्ण नाव आहे, परांजपे दत्त मंदिर.
सरदार रास्ते यांच्याकडे कारभारी म्हणून असलेल्या परांजपे यांना स्वप्नात दृष्टांत झाला आणि त्या दृष्टांताप्रमाणे त्यांनी साधारण २००/२५० वर्षांपूर्वी हे छोटेसे टुमदार मंदिर बांधले. लाकडी दरवाजातून आत गेल्यावर छोट्या बोळासारखा भाग लागतो. तिथेच पुढे उजव्या हाताला मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर समोर ऐसपैस सभामंडप लागतो आणि प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताला मंदिराचा गाभारा आहे.
गाभाऱ्याच्या बाहेरच्या भिंतींवर कोनाड्यामध्ये उजव्या हाताला शेंदूरचर्चित गणपती आणि डाव्या हाताला काळ्या पाषाणाची महिषासुरमर्दिनीची मूर्ती आहे. वरच्या भिंतीवर जय-विजय यांची सुरेख चित्र रेखाटलेली आहे. गाभाऱ्याच्या दरवाज्यावर गणेशपट्टी कोरलेली आहे. मुख्य गाभाऱ्यामध्ये खाली पादुका, मध्ये सिंहासन आणि वरती एकमुखी दत्ताचा मुखवटा आहे. मंदिराची व्यवस्था परांजपे कुटुंबीय पाहतात.
पत्ता : https://goo.gl/maps/y5Zt8VQp4jVTZ6d67
आठवणी_इतिहासाच्या