पराशर गुहा | नागझरी तीर्थ, पन्हाळगड –
पन्हाळ्यावर पराशर ऋषींचे वास्तव्य होते. महर्षी वशिष्ठ यांचे ते नातू आणि व्यास यांचे ते वडील. पराशर ऋषींच्या नावावर अनेक कार्य, अनेक कथा आहेत. विष्णुपुराण त्यांनी लिहिलं. पन्हाळा किल्ल्यावर पराशर ऋषींसंबंधित अनेक स्थळं आहेत. पन्हाळ्यावरून पावनगडाकडे जाताना पराशर ऋषींनी तपश्चर्या केली ती गुहा आहे. या गुहेत एकात एक पाच खोल्या आहेत. अठराव्या शतकातील सुप्रसिद्ध कविवर्य मोरोपंतांचा जन्म व सुरुवातीचे आयुष्य पन्हाळ्यावर गेले. त्यांनी याच पराशर गुहेत काव्यसाधना केली. या गुहेच्या खालच्या बाजूला पराशर आश्रम म्हणजेच हरिहरेश्वर मंदिर आहे.
पराशर ऋषींनी आपली पत्नी सत्यवतीसह हा आश्रम स्थापन केला. येथे कुष्ठ निवारण तीर्थ होते. वरच्या बाजूला पराशर गुहेच्या दिशेला पराशर ऋषींनी सिद्धकुंड तयार केले होते त्याला आज सिद्धबाव म्हणतात.
पराशर आश्रमाजवळच नागझरी तीर्थ आहे. पन्हाळगडावर नागजमातीच्या लोकांचेही वास्तव्य होते. अशी आख्यायिका आहे की पराशर ऋषींच्या तपश्चर्येमुळे संतप्त झालेल्या नाग लोकांनी पराशर ऋषी स्नानसंध्येसाठी वापरत ती पन्हाळ्यावरील सर्व पाण्याची ठिकाणे आटवून टाकली. पण नंतर पराशर ऋषी क्रोधीत होऊन शाप देतील या भीतीने त्यांनी पराशर ऋषींकडे क्षमा मागितली.
पराशर ऋषींनीही त्यांना शाप न देता अभय दिले. म्हणून नाग लोकांनी पाताळगंगा नदीचा एक झरा पराशर ऋषींना दान आणून दिला ते हे नागझरी तीर्थ. या कुंडाच्या पश्चिम भिंतीवर एक फारसी शिलालेख आहे तो पहिल्या इब्राहिम आदिलशहाने हिजरी ९५५ म्हणजे १५४८ सालचा आहे. जोपर्यंत हे जग नष्ट होणार नाही तोपर्यंत हा ईश्वरीय झरा अखंड वाहत राहणार आहे असा या काव्यमय शिलालेखाचा आशय आहे. या नागझरी तीर्थातून बारमाही सर्वकाळ पाणी वाहत असते. ते खाली साधोबा तलावात नेण्यात आले आहे. नागझरी तीर्थातले पाणी लोहयुक्त आहे. हा परिसर फार सुंदर, रमणीय आहे.
– प्रणव कुलकर्णी.
खूप छान माहिती दिलीत , मी त्या ठिकाणास जाऊन आलो आहे, पन्हाळ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सगळ्या स्मृती बाबत महिती उपलब्ध आहे.
पण या नागझरी/ गुहा /त्या ठिकाणची प्राचीन मंदिरे /आश्रम / दुर्लक्षित का आहेत?/ त्यांची मालकी कोणाकडे आहे? असे अनेक प्रश्न आहेत