महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,60,875

परचुरे वाडा | अन्नछत्र वाडा

By Discover Maharashtra Views: 3834 5 Min Read

परचुरे वाडा (अन्नछत्र वाडा) – छत्र खामगाव, पुणे

पुणे जिल्ह्यात वेल्हे तालुक्यातील #छत्र_खांबगाव हे गाव पुणे-पानशेत रस्त्यावरील खानापूर या गावापासून वेल्हे या ठिकाणी जाणाऱ्या पाबे घाटात आहे. येथे परचुरे यांचा सुमारे २३० वर्षापूर्वीचा एक पंधराखणी चौसोपी परचुरे वाडा आहे. एकूण १२० खणांची सागवानी तुळया, खांबांबर उभी राहिलेली, सुस्थितीत असलेली ही प्रचंड इमारत पाहिल्यावर मन थक्क होते. एकूण १२० खणांच्या इमारतीचे क्षेत्र साधारणपणे मागील पडीक वाडा धरून एक-दीड एकरांचे असावे. चौकोनी विटा व घडीव दगड यांनी बांधलेला हा वाडा आज दिमाखदारपणे घट्ट उभा आहे.

वाड्याचे जोते घडीव दगडाचे असून, कोठेही दगडास कसलीही इजा पोहोचलेली नाही. दरवाजा आजही अगदी नवा असल्यासारखा दिसतो. दरवाजातून आत गेल्यावर मध्ये एक चौक आणि चार ती बाजूंस असलेले दुघई
सोपे पाहिल्यावर हे बांधकाम आणि लाकूडकाम इतकी वर्षे कसे तग धरून राहिले याचे आश्चर्य वाटते. समोरच्या सोप्यातून बाजूस स्वयंपाकघर आणि देवघर पाहावयास मिळते. वाड्यात शिरल्यावर दिसणारा छोटा दिवाणखाना, बैठकीत सोपा आणि तळघर पाहून वाड्याचे वैशिष्ट्य लक्षात येते. मागच्या दाराच्या पडवीच्या बाहेर गेल्यावर एक रेखीव असे तुळशीवृंदावन नजरेत भरते. आज घरी वाड्यावर बंगलोरी कौले दिसत असली तरी पूर्वी त्यावर साधी भाजकी कौले होती. त्या कौलांचा नमुना म्हणून काही कौले अजूनही परचुरे यांनी जपून ठेवली आहेत. आतील भिंतींना असलेला मातीचा गिलावा कोठेही भंग पावलेला दिसत नाही. आखीवरेखीव पद्धतीच्या अशा या वाड्याने हजारो लोकांची वर्दळ अनुभवली आहे.

हा वाडा म्हणजे अन्नछत्र, उत्तर पेशवाई मधील परचुरे घराण्यातील #त्र्यंबक_भाऊ_नारायण_परचुरे (त्र्यंबक नारो) हे एक प्रसिद्ध पुरुष होते. भोरच्या पंत सचिवांच्या हद्दीत मौजे पुरंदरेश्वर येथे त्यांनी एक जागा खरेदी केली व तेथे असलेल्या पुरंदरेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. तेथे धर्मशाळा, विहीर इत्यादी बांधले. श्रावण मासात कोकणातून मढे घाटातून काही ब्राह्मण मंडळी दक्षिणेसाठी पुण्यात येत असत, तसेच इतर लोकही कोकणातून येत असत. त्यांना रस्त्यात अन्न मिळावे माणून त्र्यंबक नारो यांनी खांबगाब येथे इ.स. १७८९ मध्ये आपल्या वाड्यात अन्नछत्र सुरू केले. पुढे ५० वर्षे है अन्नछत्र त्यांनी स्वखर्चाने चालवले. खर्चाची व्यवस्था सरकारातून व्हावी यासाठी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांकडे त्यांनी विनंती केली. असनोली तालुका शहापूर, जि. ठाणे, साकुर्ली, नेरळ, मौजे गोऱ्हे (सिंहगडजवळ) या गावातून काही इनाम मिळविले. पुढे काशी क्षेत्री जाऊन त्यांनी तेथे एक वाड़ा, एक बाग आणि एक घाट बांधला.

या अन्नछत्रासंबंधीची पेशवे दफ्तरातील काही कागदपत्रे प्रसिद्ध झाली आहेत. त्यातील अन्नछत्राच्या हिशोबासंबंधीचा सालवारीने मिळालेला ताळेबंद पाहिल्यावर प्रतिवर्षी किती माणसे जेवत असत, किती माणसांना शिधा दिला, एकूण किती खर्च झाला हे पाहिल्यावर आश्चर्य वाटते. उदा. इ.स. १७९८-२३ हजार ११५ माणसे जेवली, ७ हजार ३१८ लोकांना शिधा दिला. एकूण खर्च ४ हजार ४७ आला. १८१३ साली २८ हजार ९१८ माणसे जेवली, २९५ लोकांना केवळ शिधा दिला, १ हजार ७७४ रुपये साडेसहा आणे खर्च झाला.

वाड्याशेजारी परचुरे यांचे पुरंदरेश्वर महादेवाचे अतिशय सुस्थितीतील मंदिर आपले लक्ष वेधते. प्रतिवर्षी महाशिवरात्रीस तेथे उत्सव असतो. मंदिरातील महादेवाची पिंड ही घोटी पाषाणाची असून, पिंडीवर सतत अभिषेक चालू अस त्यासाठी आजही परचुरे यांनी एक पुजारी नेमला आहे. अन्नछत्रामुळे या गावास छत्रखांबगाव असे नाव पडले आहे. या गावाचे जनाई हे ग्रामदैवत आहे. गावात आणखी काही घराणी असून, हे लहान गाव गुण्यागोविंदाने नांदत आहे. या गावातून पेटाऱ्याचा डोंगर, गुरटुंगीचा डोंगर आणि हनुमानाचा माळ पाहावयास मिळतो,

२२५ वर्षापूर्वी सुरू केलेले हे अन्नछत्र म्हणजे त्या काळातील परचुरे घराण्यातील दिलदारपणा दिव्य दर्शनच होय. संस्थापक त्र्यंबक नारो यांच्या पुण्याईचे फळ म्हणून आजही परचुरे घराण्यातील काही मंडळी पुण्यात विद्वतमान्य झाली आहेत. डॉ.चिं. ना. परचुरे ऊर्फ बंडोपंत हे इतिहास संशोधक ग.ह. खरे यांचे शिष्य आहे, त्यांचे बंधू सुरेशराव परचुरे यांनी अन्नछत्राच्या या वाड्याची उत्तम प्रकारे देखभाल ठेवली असून, हा अमोलिक ऐतिहासिक ठेवा दिमाखाने छत्रखांबगाव गाव येथे उभा आहे.

पूर्वी कोकणातून येणारा वाटसरु बाहेर ओसरीवरुन आत आवाज देई. अन्नशिदोरी व अन्नछत्रातील अन्न ग्रहन करी थोडी वामकुक्षी घेऊन पुढील प्रवासाला जाई. आता मुख्य रस्ता व वाडा यात अंतर पडले आहे . रायगडाजवळही एक अन्नछत्र होते या वाड्यानंतरचा विश्राम पुढे तेथेच लोक घेत. या वाड्याला आज पुर्णावस्थेत पाहता येते. गांधीहत्येत वाड्याचं रक्षण साक्षात पुरंदरेश्वरानं केलं. छातीठोकपणे या वाड्याचं रक्षण करण्यात आले. गावातील इतक्याच दिमाखात उभं असणाऱ्या दोन वाड्यांचं संरक्षण मात्र होऊ शकलं नाही ही मोठी दुर्दैवाची बाब आहे. पुण्याहून राजगड, तोरणा किल्ल्याकडे जाणारे भटके या पाबे घाटातच खामगाव-मावळ असणाऱ्या #हिरोजी, #कोंडाजी_फर्जंद यांच्या ऐतिहासिक वाड्यादेखील भेट देऊ शकतात.

विकास चौधरी

संदर्भ –
१) परचुरे घराण्याचे अन्नछत्र मौजे खांबगाव- डाॕ. मधुकर रामचंद्र कुलकर्णी, अन्नछत्र आणि इतर कागदपत्रे.

 
राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला

Leave a Comment