पारशिवनीची महालक्ष्मी –
महालक्ष्मी म्हणजे कोल्हापुर इतकेच आपल्याला माहित असते पण कोल्हापुरच्या मूर्ती सारखीच अप्रतिम मूर्ती नागपुरपासून उत्तरेला रामटेकच्या दिशेने पारशिवनी गावात स्थित आहे. एक मिटर उंचीची ही मूर्ती खोदकामात सापडली. मूर्तीच्या उजव्या हातात बीजपुरक आहे, वरच्या हातात गदा आहे. डाव्या वरच्या हातात खेटक म्हणजेच ढाल आहे तर डाव्या खालच्या हातात पानपात्र आहे. कोल्हापुरची महालक्ष्मी पण अगदी अशाच आयुधांनी युक्त आहे. हीला अंबाबाई असे पण संबोधतात. महालक्ष्मी असा शब्द आला की तीला विष्णुपत्नी असं मानण्याची प्रथा आहे. पण महालक्ष्मी ही केवळ विष्णुपत्नी नव्हे.(पारशिवनीची महालक्ष्मी) मुक्तेश्वरांनी (एकनाथांच्या मुलीचा मुलगा) महालक्ष्मीची जी आरती लिहीली आहे त्यातील एका कडव्यात
तारा सुगतागमी शिवभजका गौरी
सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी
गायत्री नीजबीज निगमागम सारी
प्रकटे पद्ममावती जीन धर्माचारी
असे वर्णन आले आहे. म्हणजे बौद्धांची तू तारा आहेस, शैवांची गौरी आहेस, सांख्यांसाठी तू प्रकृती आहेस, आगम पंथियांसाठी गायत्री आहे आणि जैनांसाठी पद्मावती आहेस. आरती म्हणताना आम्ही “तारा शक्ती अगम्य” अशी अगम्य भाषा करून बौद्धांचा संदर्भ उडवला. तर “नीज धर्माचारी” असा शब्द वापरून जीन धर्मियांचा म्हणजेच जैनांचा संदर्भ उडवला.
पारशिवनीची ही महालक्ष्मी अतिशय देखणी आहे. तिच्या मुकुटांत सयोनीलिंग आहे. पाठशिळेवर खाली सिंह, मग घोडा मग व्याल कोरलेले आहेत. पायाशी खाली चामरधारिणी आहेत. गळ्यात हार, कर्णभुषणे, मेखला असे अतिशय नजाकतीनै कोरलेले आहेत. पंचमहाभुतांचे प्रतिक म्हणून पाठशिळा पंचकोनात कोरलेली असते. तशी ती इथेही आहे.
फोटो व माहिती सौजन्य – प्रविण योगी, पोलीस अधिकारी हिंगोली.
-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद