महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,99,871

किल्ल्याचे विविध भाग

Views: 3254
4 Min Read

किल्ल्याचे विविध भाग

किल्ल्याचे भाग -Part of the fort : किल्ला बांधत असताना किंवा किल्ला बांधणीची जागा हेरत असताना विशेष काळजी घेतली जात असे, त्यानुसार किल्ला बांधलेल्या जागेचे चार भाग पडतात. घेरा, मेट, माची आणि बालेकिल्ला हे किल्ल्याचे मुख्य भाग आहेत. घेरा म्हणजे किल्ल्याच्या पायथ्याजवळ असलेले गाव, मेट म्हणजे किल्ला आणि गाडीतळाजवळील गाव यांच्यामध्ये असणारी मोक्याची तटबंदी रहित जागा, माची म्हणजे किल्ल्यावरील बालेकिल्ल्याखालील सपाट प्रदेश आणि शेवटी बालेकिल्ला म्हणजे किल्ल्यावरील सर्वात संरक्षित ठिकाण होय.

किल्ल्यांवरील ठिकाणांची नावे

किल्ल्यावर बांधण्यात आलेल्या प्रत्येक इमारतीस, प्रत्येक बांधकामास विशिष्ठ नावे देण्यात आलेली आहेत. काही किल्ल्यांना विशिष्ठ प्रकारे बांधण्यात आलेल्या माच्या, तटबंदी, प्रवेशद्वार असतात. त्यानुसार त्या किल्ल्यांचे महत्व बदलत जाते.

महादरवाजा : किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी बांधण्यात आलेल्या मुख्य प्रवेशद्वारास महादरवाजा असे म्हणतात. काही किल्ल्यांवर महादरवाज्याच्या संरक्षणासाठी बुरुजांची रचना केलेली असते. काही किल्ल्यांवर एकामागोमाग एक असे अनेक दरवाजे असतात. प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस पहारेकऱ्यांना बसण्यासाठीची जागा ठेवलेली असे, त्यास ‘देवडी’ असे म्हणतात.

नगारखाना : किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर नगारखाना असे. गडाची दारे उघडताना आणि बंद करत असताना तसेच महत्त्वाच्या प्रसंगी येथे नगारे वाजवले जात.

तटबंदी : किल्ल्याची माची आणि बालेकिल्ला या भागात दगडी बांधकामात बांधण्यात आलेल्या भिंती आहेत, या भिंतींना ‘तटबंदी’ असे म्हणतात. किल्ल्याच्या दिशेने तोफेच्या गोळ्याचा मारा झाला, तर किल्ल्यावर त्याचा परिणाम कमी व्हावा, याकरिता तटबंदीची भिंत नागमोडी बांधत असत.

बुरुज : तटबंदीमध्येच काही ठराविक अंतरावर तटबंदीपासून पुढे आलेले बुरुज बांधले जात असत. हे बुरुज काही किल्ल्यांवर अर्धगोलाकार, त्रिकोणी, षटकोणी तर काही किल्ल्यांवर कमळाच्या फुलाच्या आकारात बांधण्यात आलेले आहेत. या बुरुजांवर तोफा ठेवल्या जात असत.

ढालकाठी : ढालकाठी म्हणजे निशाण रोवण्यासाठी बांधलेला दगडी ओटा होय. ढालकाठी बहुधा एखाद्या बुरुजावर उभारण्यात येत असे.

जंग्या : तटबंदी आणि बुरुजावरून गोळीबार करण्यासाठी ठिकठिकाणी छिद्रे ठेवलेली असत, त्यांना जंग्या म्हणतात.

चऱ्या : किल्ल्याच्या तटबंदी आणि बुरुजावर घडीव किंवा पाकळ्यांच्या आकाराचे दगड ठेवलेले असत, त्यांना चऱ्या असे म्हणतात. या चऱ्यांच्या आड लपून किल्ल्यावरून गोळीबार करता येत असे.

किल्ल्यांवरील ठिकाणांची नावे

फांजी : किल्ल्याच्या तटबंदीवर पहारेकऱ्यांना गस्त घालण्यासाठी जागा ठेवलेली असे, त्यास ‘फांजी’ म्हणतात.

धान्य कोठार (अंबरखाना) : किल्ल्यावर धान्य साठवण्यासाठी बांधलेली इमारत म्हणजे धान्य कोठार (अंबरखाना)

दारू कोठार : किल्ल्यावरील दारूगोळा या कोठारामध्ये साठवला जात असे. हे दारू कोठार लोक वस्तीपासून दूर बांधले जात असे.

पागा : किल्ल्यावर घोडय़ांना बांधून ठेवण्यासाठी बांधण्यात आलेल्या जागेस पागा असे म्हणतात.

चोर दरवाजा : प्रत्येक किल्ल्यावर येण्यासाठी महादरवाजा सोडून इतरही एक ते तीन दरवाजे असत, छोट्या वाटेचे अथवा चढाईस कठीण असलेल्या अशा दरवाज्यांना चोर दरवाजा असे म्हणत असत. हे चोर दरवाजे तटबंदीमध्ये लपवलेले असत. छुप्या पद्धतीने केल्या जाणाऱ्या अनेक कामांसाठी या दरवाज्यांचा उपयोग होत असे.

पाण्याचे टाक/ तलाव/ विहीर : किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याचा साठा असावा या उद्देशाने ठिकठिकाणी टाक, तलाव आणि विहिरी बांधलेल्या असत. या पाण्याच्या साठ्यांची विशेष काळजी घेतली जात असे.

किल्ल्यांवरील ठिकाणांची नावे

राजवाडा अथवा इमारती : किल्ल्यावर राहणाऱ्या खास मंडळींसाठी राजवाडे, कचेरी, सदर इत्यादी इमारती बांधलेल्या असत. काही किल्ल्यांवर अशा काही विशिष्ठ इमारती आहेत, ज्यांना विशेष महत्व आहे.

शिलेखाना : शिलेखाना म्हणजे चिलखते आणि शस्त्रास्त्रे ठेवण्याची जागा होय. याठिकाणी अवजारांना धार लावणारे शिकलगार आणि लोहार नेमलेले असत.

कडेलोटाची जागा : गुन्हेगारास शिक्षा म्हणून, त्याला किल्ल्यावरून खाली ढकलून दिले जात असे, किल्ल्यावरील ज्या ठिकाणावरून खाली ढकलले जात असे, त्या जागेस कडेलोटाची जागा असे म्हणत.

किल्ला कसा पहावा याचं देखील एक तंत्र असतं, प्रत्येकाने किल्ल्याची वाट चालत असताना हे तंत्र पाळत आणि किल्ल्याचे सौंदर्य अनुभवत दुर्ग भ्रमंती करायला हवी. दुर्ग भ्रमंती करत असताना ज्या व्यक्तीचे त्या किल्ल्यासंबंधी काही वाचन आहे, ती व्यक्ती कल्पनाशक्तीच्या आधारे किल्ल्यांचे सौंदर्य आणि इतिहास अनुभवू शकते.

– नागेश कुलकर्णी

1 Comment