श्री पार्वतीनंदन गणपती, गणेशखिंड –
पुण्यात सर्वात पहिले गणेश मंदिर कुठलं ? असं विचारल्यावर ‘कसबा गणपती’ हे नाव चटकन येतं. मात्र या गणेशाच्याही आधीपासून एक गणपती पुण्याच्या जरा लांब वास करुन आहे. हा श्री पार्वतीनंदन गणपती गणेश !
सेनापती बापट रस्त्याने सरळ गेलं की डावीकडे चतुःश्रृंगी देवीची टेकडी दिसते. याच्या थोडं पुढे रस्त्याचे दोन फाटे फुटतात. एक उजवीकडे जातो तर दुसरा सरळ जाऊन उजवीकडे वळतो. दुसर्या रस्त्याने थोडं पुढे गेलं की उजवीकडे उंच दिपमाळ आणि डावीकडे मंदिराचा कळस दिसायला लागते.
एका आख्यायिकेनुसार कसबा गणपती चे संस्थापक ठकार घराण्यातील एक पुरुष देवळात रोज येत असे. एके दिवशी गणेशाची आराधना करत असताना एक साक्षात्कार झाला. कसब्यात ओढ्याकाठी शमी वृक्षाच्या खाली गणेशमूर्ती असल्याचा साक्षात्कार झाला.
त्याने तीथे जाऊन पाहिले तर खरंच गणेशमूर्ती होती. काही वर्षांनी असाच साक्षात्कार राजमाता जिजाऊ यांना इथे झाला. या जरी आख्यायिका असल्या तरी श्री पार्वतीनंदन गणेशाचे स्थान कसबा गणपती च्या आगोदरचं आहे हे विधान चुकीचे नाही. अर्थात तेव्हा हा गणपती मुळ कसबे पुणे पासून बराच लांब असल्याने थोडा अपरिचित आणि उपेक्षित राहिला.
चतुःश्रृंगी डोंगराची सोंड या पार्वतीनंदन जवळ विसावते. मंदिराजवळ खिंड होती. या गणेशाच्या स्थानामुळे तिला गणेशखिंड नाव पडले. आता ती खिंड राहिली नाही. याच खिंडीजवळ वीर चापेकर बंधूंनी रॅण्ड चा वध केला. ही खबर गुप्त रितीने टिळकांनी सांगायची होती. तेव्हा ‘खिंडीतला गणपती पावला’ असा सांकेतिक भाषेत संदेश दिला. ही घटना सन १८९७ मधली.
दिपमाळांच्या समोरून घरांच्या दाटीवाटीत मंदिरात जायचा रस्ता आहे. प्रवेशद्वाराजवळ मारुतीची मूर्ती आहे. आत प्रवेश केल्यावर काही वर्षांपूर्वी अभ्यासपूर्ण जीर्णोद्धार केलेला सभामंडप आहे. मंडपातील मोदक हातात घेतलेला उंदीर लक्ष वेधून घेतो. गाभार्यात सुमारे ३ फुट उंचीची शेंदूरचर्चित प्रसन्न गणेशमूर्ती आहे.
मंदिराचा सभामंडप लाकडी तर गाभारा दगडात आहे. मंदिराचा कळस वैशिष्टयपूर्ण आहे. मात्र चहूबाजूंनी असलेल्या घरांमुळे मंदिर परिसराची रया गेली आहे. तरीपण आजही मोठ्या प्रमाणात भक्त या ‘पुण्याच्या आद्य गणेशाचे’ दर्शन घ्यायला आवर्जून येतात.
© वारसा प्रसारक मंडळी.