महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,09,373

पाटणदेवी – हिंदू व जैन लेणी

Views: 3719
3 Min Read

पाटणदेवी – हिंदू व जैन लेणी

आपल्या महाराष्ट्रात सर्वत्र लेण्यांचा समूह पाहण्यास मिळतात. जळगाव जिल्ह्यातही अशाच सुंदर लेण्या आहेत. या लेण्यांना पाटणदेवी च्या लेण्या म्हणून ओळखले जाते.

चाळीसगावपासून सतरा किलोमीटर अंतरावर पाटणादेवी परिसरात व कान्हेरे किल्ल्याच्या पश्चिमेला ब्राह्मणी व जैन लेण्यांचे समूह पाहण्यास मिळतात. ब्राह्मणी लेण्याला शृंगारचावडी लेणे म्हणतात. यालेण्यातील सभामंडप ५.७ मीटर लांब व ५.१ मीटर रुंद आहे. या लेण्यांच्या दरवाजाला दोन पायऱ्या असून द्वारशाखा उत्तम रीतीने सुशोभित करण्यात आलेल्या आहेत. या लेण्यांना दोन मीटर रुंदीचा व्हरांडा असून दोन्ही कोपऱ्यात पूर्ण स्तंभ व मध्ये भिंतीलगत अर्धस्तंभ अशी रचना केलेली आहे. हे लेणे अकराव्या शतकातील असावे असे जाणकारांचे मत आहे. येथील जैन लेण्यांच्या गटात दोन लेणी असून त्यांना नागार्जुन कोठडी व सीतेची नहाणी अशी नावे आहेत.

नागार्जुन गुहेचा व्हरांडा ५.४ मीटर लांब व १.५ मीटर रूंद आहे. लेण्यांच्या दर्शनी भागात दोन स्तंभ असून त्यातील एक चौकोनी व दुसरा षटकोनी आकाराचा आहे. व्हरांड्याच्या डाव्या बाजूस बाक असलेले शयनकक्ष आहे. तर सभा दालन सहा मीटर लांब व पाच मीटर रूंद असून मध्यभागी दोन स्तंभ आहेत. या लेण्यात अंबिकेची मूर्ती असून अंबिकेच्या मांडीवर लहान बाळ दाखवलेले आहे. तसेच झाडांच्या फांद्यातून विविध पक्षी, खारी, पाने व फुले कोरलेली पाहण्यास मिळतात. या लेण्याच्या पाठीमागच्या भिंतीवर कमलासनावर बसलेली पद्मासनातील भगवान महावीरांची मूर्ती आहे. महावीरांच्या मस्तकापाठीमागे प्रभामंडळ व मस्तकावर मोठे छत्र दाखवलेले आहे. महावीरांच्या चेहऱ्यावरील धीरगंभीर भाव वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

महावीरांचे मुख्य लक्षण म्हणजे केसांच्या बटा व कान लांब आहेत. महावीरांच्या आसनांच्या पाठीमागच्या भागात हत्तीच्या मस्तकाची सजावट केलेली दिसते. बाजूला पद्मासनातील आदिनाथ व पार्श्वनाथ यांच्या मूर्ती व सभोवती मालाधारी गंणसेवक दिसून येतात. जैन तीर्थकरांच्या बाजूला चरवीधर असून डोक्यावर त्रिछत्रधारी व आजूबाजूला विद्याधरादी मूर्ती आहेत. तर दक्षिणेकडच्या भिंतीवर गोमटेश्वराची पूर्ण आकाराची उभी मूर्ती पाहण्यास मिळते. या मूर्तीच्या मस्तकापाठीमागे प्रभामंडळ व त्रिछत्र असूनखांद्या लगत तीर्थकरांच्या चार लहान मूर्ती कोरलेल्या आहेत. या लेण्याच्या दरवाज्यांच्या कपाळ पट्टीवर मध्यभागी चौकटीत तीर्थकारांची मूर्ती आहे. तर पायर्‍यांच्या बाजूला हत्तींची मस्तके दाखवण्यात आलेली आहेत.

जाणकारांच्या मते ही लेणी अंकाई-टंकाई च्या समकालीन म्हणजेच दहाव्या ते अकराव्या शतकातील असावीत असे वाटते. लेण्यांच्या प्रांगणात डाव्या बाजूला अपूर्ण अवस्थेतील सुंदर किर्तिस्तंभ पाहण्यास मिळतो. या व्यतिरिक्त अजूनही बरेच काही पाहण्याजोगे आहेत.

संदर्भ
लेणी महाराष्ट्राची

शब्दांकन
श्री दयानंद म. पिंगळे

धन्यवाद.
इतिहासाचे साक्षीदार.

Leave a Comment