पाटील आडनावाची व्युत्पत्ती –
शहाजी राजांवर ‘राधामाधवविलासचंपू’ नावाचं एक काव्य जयराम पिंड्ये या शहाजी राजांच्या दरबारी कवीने केलेलं आहे. या काव्याची एक जुनी प्रत इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांना श्री. विष्णुपंत रबडे यांच्या चिंचवडच्या घरात सापडली. या काव्याला प्रकाशित करताना इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी सुमारे २०० पानांची प्रस्तावना लिहिलेली आहे. त्यात हा उल्लेख सापडला. याशिवाय ‘पाटील’ या आडनावाच्या अजून काही व्युत्पत्ती असू शकतात.(पाटील आडनावाची व्युत्पत्ती
राजवाडे म्हणतात सम्राट अशोकाच्या काळापासून कापसाचे विणलेले पट्टे लिहिण्याकरिता वापरले जात असत. या पट्टांवर जमिनीच्या मालकीची नोंद होत असे. त्यानंतर हे पट्ट कीलकांत म्हणजे वेळूच्या पोकळ कांडात घालून सुरक्षित ठेवले जात. ज्या वेळूच्या पोकळ कांडात हे पट्ट ठेवले जात त्याला ‘पट्टकील’ म्हटलं जाई. हे पट्टकील गावच्या ज्या गृहस्थाच्या ताब्यात असत त्याला ‘पट्टकीलक’ म्हटलं जाई. या पट्टकीलक शब्दाचा अपभ्रंश पट्टकील असा झाला आणि या पट्टकील शब्दाचा मराठी अपभ्रंश पाटैलू, पाटेल आणि सरतेशेवटी पाटील असा झाला. पुढे तांब्याच्या पत्र्यांवर जमिनीच्या मालकीची नोंद करण्याची कला निघाल्यावर, ही ताम्रपत्रदेखिल या पाटलांकडे संग्रहार्थ रहात.
ही व्युत्पत्ती राजवाड्यांनी सांगितलेली आहे. याशिवाय अन्य व्युत्पत्ती असू शकतात. तुम्हाला ससंदर्भ माहित असल्यास त्या जरूर शेअर कराव्यात. धन्यवाद.
संदर्भ: राधामाधवविलासचंपू: प्रस्तावना (वि. का. राजवाडे)
Suyog Shembekar