महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,09,574

पेशवाईतील तोतया

Views: 2896
6 Min Read

पेशवाईतील तोतया –

एखादी कर्तुत्ववान व्यक्ति विशेषतः राजघराणे , सरदार घराणे यातील व्यक्ति अचानक बेपत्ता झाली किंवा संधीक्तरित्या मृत्यू पावली की त्या व्यक्तीच्या शाररीक व रुप साम्यतेचा आधार घेऊन त्या कर्तुत्ववान व्यक्तीचा पैसा , राजकीय पद , सामाजिक मानमरातब यावर हक्क सांगण्यासाठी त्या मूळ व्यक्तीच्या पश्चात काही ढोंगी व्यक्ती लोकांसमोर प्रकट होत व रुप आणि शाररीक साम्यतेच्या आधारे मयत किंवा बेपत्ता व्यक्ती ही मीच आहे असे प्रतिपादन करून मयत किंवा बेपत्ता व्यक्तीच्या संपत्ती किंवा पदावर हक्क प्रस्थापित करण्याचा कुटिल प्रयत्न करीत असत त्या व्यक्तीस “ तोतया “ असे संबोधले जाई.(पेशवाईतील तोतया)

तोतयागीरीचा फायदा क्षणिक काळासाठी त्या व्यक्तीस होत देखील असे. परंतु त्याचे बिंग फुटताच त्याला जबर शिक्षेस सामोरे जावे लागे. पेशवाईत तोतयागिरी करणे हा अपराध मानला जाई व अपराधी व्यक्तीस व त्यास मदत करणार्‍या व्यक्तीस आर्थिक दंड ,चाबकाचे फटके , आजन्म कारावास , शररिक व्यंग करणे तसेच मृत्यू दंडाची शिक्षा देखील देण्यात येत असे.

पेशवाईत अनेक व्यक्तींचे तोतये नावारूपाला आले तसेच एकाच व्यक्तीचे अनेक तोतये एकाचवेळि वेगवेगळ्या ठिकाणी प्रकट झाले. स्त्रीयांच्या तोतया व्यक्तिदेखील देखील प्रकट झाल्या. काही तोतये हे उदयास आले परंतु त्यांची दखल तत्कालीन समाजाने किंवा राज्यकर्त्यांनी न घेतल्याने त्यांचा अस्त देखील आपोआप झाला. इंग्रज राजवटीत देखील तोतया व्यक्ति प्रकट झाल्याचे आढळून येतात.

पेशवाईतील काही तोतयांवीषयीची संक्षीप्त माहिती या लेखात घेऊ

पेशव्यांचे गुरु ब्रहेंद्रस्वामी यांचा तोतया :- ब्रहेंद्रस्वामी यांनी २६.०७.१७४५ रोजी धावडशी गावी समाधी घेतली. पेशवे घराण्याच्या गुरूचा मान व अफाट संपत्ती याच्या मोहापाई ब्रहेंद्रस्वामी यांचा तोतया प्रकट झाला.

नानासाहेब पेशव्यांनी या तोतयाचे खरे स्वरूप आपल्या हेरखात्यामार्फत शोधून काढले. तोतया शिंपी समाजातील अद्व्यतेंद्र गोसावी असल्याचे निष्पन्न होताच त्यास १०० फटक्यांची व आजन्म कारावासाची शिक्षा ठोठवण्यात आली.

जनकोजी शिंदे :- जनकोजी शिंदे यांना पानीपतमध्ये वीरमरण आले. परंतु सरदारकीच्या मोहापाई त्यांचा तोतया उत्तरेत प्रकट झाला. केदारजी शिंदे , मानाजी शिंदे व महादजि शिंदे यांच्यापुढे त्या तोतयाचा निभाव न लागल्याने तोतयाचे रूप उघड पडले

जनकोजी शिंदेचा दूसरा तोतया :- गिरमाजिपंत बोकिल यांनी रघुजी थोरात यास जनकोजी शिंदे यांचा तोतया म्हणून पेशवे दरबारात उभा केला . परंतु थोरले माधववराव पेशव्यांनसमोर त्या तोतयाच्या आई ,पत्नी व भावाने त्यास ओळखले व त्याचे बिंग फटले. तोतयाचे नाक, कान कापून त्यास हद्पार करण्यात आले. झालेल्या अपमानामुळे व व्यंगत्वामुळे तोतयाने आत्महत्या केली. गिरमाजिपंत बोकिल यांना तोतयास मदत केल्यामुळे दंड ठोठवण्यात आला.

बापुजी बल्हाळ फडके :- बापुजी फडके पानीपतमध्ये बेपत्ता झाले. त्यांच्या मृत्यूविषयी कोणतीही माहिती उपलब्ध झाली नाही . त्यामुळे त्यांच्या फडणीशी पदावर दावा सांगण्यासाठी एक तोतया पुण्यात प्रकट झाला परंतु थोरले माधववराव पेशव्यांनी मोरोबादादा भानू यांना फडणीशी दिल्याने हा तोतया फरार झाला.

सदाशिवरावभाऊ पेशवे :- पानीपत युद्धात सदाशिवरावभाऊ धारातीर्थी पडले की बेपत्ता झाले याविषयी संधिक्ता होती त्यामुळे त्यांचे तीन तोतये एकाचवेळी निर्माण झाले.

पहिलं तोतया १७६२ साली काशी ,वाराणसी येथे प्रकट झाला. थोरले माधववराव पेशव्यांनच्या आज्ञणेने शिंद्यांचे दिवाण जीवबादादा बक्षी यांनी त्याच्या चौकशीअंती तोतया ठरवून कैद केले. त्यास कोठडीत डांबण्यात आले व तेथेच त्याचा मृत्यू झाला

दूसरा तोतया झाशीमधील नरवर गावी १७६१ साली प्रकट झाला. हा तोतया बुंडेलखंडातील कनोज गावातील कनोज ब्राम्हण सुखालाल रामानंद होता. १६ वर्ष त्यांनी पेशव्यांना भंडावून सोडले. सन १७७६ साली अपराधी ठरवून मृत्यू दंडाची शिक्षा देण्यात आली.

तिसरा तोतया सन १७६९ साली कर्नाटकात उदयास आला. नाना फडणीसांनी हेरांमार्फत तो बाजीगोविंद असून तो सोनार असल्याचे उघड झाले. सरदार पटवर्धन यांच्या साह्याने त्यास कैद करून मृत्यू दंडाची शिक्षा देण्यात आली.

अमृतराव पेशवे :- रघुनाथराव दादा यांचे दत्तक पुत्र अमृतराव यांचा तोतया वर्हाडात उदयास आला. त्यास मुधोजी भोसले यांनी पाठिंबा दिला. रघुनाथराव दत्तक पुत्र अमृतराव याच्यासह सूरत येथे वास्तवव्यास असल्याची माहिती असल्याने त्याची कोणी दखल घेतली नाही व ह्या तोतयाचा अस्त आपोआप झाला.

अमृतराव पेशवे यांचे ०६.०९.१८४२ मध्ये वाराणसी येथे निधन झाले. अमृतराव पेशव्यांना वार्षिक ८ लाख रुपये तनख्वा इंग्रजसरकारकडून मिळत होता . त्या तनख्याच्या लालसेने त्यांचा तोतया काशीत प्रकट झाला. अमृतराव पेशवे यांचे दत्तकपुत्र विनायकराव यांनी तोतयाला कैद करून त्याची चौकशी केली व इंग्रज्यांच्या स्वाधीन केले.

यशोदाबाई पेशवे :- सवाई माधावराव पेशवे यांची द्वितीय पत्नी यशोदाबाई रायगडावर शेवटच्या बाजीरावच्या कैदेत असताना १४.०१.१८११ रोजी निधन पावल्या . सन १८२२ मध्ये सुमारे ११ वर्षानी यशोदाबाईंची तोतया स्त्री बऱ्हाणपूर येथे प्रकट झाली. पुणे मुकामी वास्थाव्यास आल्यावर तिने आपण सवाई माधावराव पेशवे यांच्या द्वितीय पत्नी यशोदाबाई पेशवे असल्याचे जाहीर केले.

रायगडवरून स्वत:च्या सुटकेची हकीकत तसेच पेशवे घराणे , शनिवारवाडा , सवाई माधावराव पेशवे, स्वत:चे कोकणातील माहेर याबाबत पुण्यातील जनतेस तसेच इंग्रज अधिकार्‍यांना तपशीलवार माहिती दिली. इंग्रज सरकारकडे स्वत:ची बाजू मांडण्यासाठी आपला वकील गणपतराव श्रीवर्धनकर याची नेमणूक केली . इंग्रजाणी सदर वकिलास सन १८२३ मध्ये कैद केले. परंतु एखाद्या मुत्सद्दी राजकारण्याप्रमाणे रामचंद्र नावाच्या मुलास दत्तक घेऊन इंग्रज्यांनकडे तनख्याची मागणी केली. इंग्रज तनख्वा देण्याचे आश्वासन देऊन चालढकल करत. इंग्रज्यांनकडे ४४ वर्ष तनख्यासाठी तगादा करणारी ही तोतया स्त्री १८६६ मध्ये मृत्यू पावली

तोतयांचे प्रकटीकरण म्हणजे तत्कालीन समाजाचा भोळसटपणा व तोतयांची ऐतखाऊ आणि स्वार्थीवृती यांचा मिलाफ होय.पेशवाईतील तोतया.

संदर्भ :- पेशवे – श्रीराम साठे.

श्री. नागेश सावंत

Leave a Comment