पिग्गी बँक म्हणजे छोटी बचत बँक | Piggy Bank
गेल्या २० / २५ वर्षांपर्यंत मध्यमवर्गीय घरात मासिक उत्पन्न खूप कमी असल्याने, पैशांची बचत करणे खूप कठीण जात असे. पण बचतीची गरज मात्र खूपच असे. मग प्रामुख्याने जमेल तशी त्रिस्तरीय बचत केली जात असे. संपूर्ण घरातील खर्चानंतर जर काही पैसे वाचले तर ते बँकेतील बचत खात्यात जमा केले जात असत. बँकांनीं अशा बचतीला- स्मॉल सेव्हिंग , होम सेव्हिंग, अशी नावे दिली होती. दुसरी सर्वात महत्वाची आणि गुप्त बचत म्हणजे घरातील गृहिणींनी, महिन्याच्या खर्चासाठी दिलेल्या मासिक बजेटमधून काटकसर करून, पैसे वाचवून केलेली गुप्त बचत ! हे पैसे पुरुष मंडळींना सहसा माहिती नसायचे. ते धान्याचे डबे – बरण्या , देवांच्या पोथ्या, वैयक्तिक दागिन्यांचे डबे अशामधून लपवून ठेवले जात असत. घरची गृहलक्ष्मी अत्यंत आणीबाणीच्या वेळी हे पैसे घरातील कर्त्या पुरुषापुढे आणून ठेवत असे. त्यातून एखादे गंभीर आर्थिक संकट सोडविले जाई . त्यावेळी कर्त्या पुरुषाच्या चेहेऱ्यावरचे भाव फार पाहण्यासारखे असत.
” मला फसवून इतके पैसे जमा कसे काय केले ‘ हा अहंकार आणि असे वाचवलेले पैसे हिने गुपचूप खर्च न करता, आज घराची आणि माझी अब्रू राखली ” हे समाधान असे भाव त्याच्या चेहेऱ्यावर असत. हातात थोडे अधिक पैसे असलेल्या घराची तिसरी बचत म्हणजे ” पिग्गी बँक ” ! मुलांना खाऊसाठी दिलेल्या पैशातून केलेली बचत, एखाद्या पत्र्याच्या डब्यात किंवा मातीच्या बंद भांड्यात ठेवली कात असे. यासाठी त्या भांड्याला एक चीर असे. पूर्ण जमा रक्कम काढण्यासाठी डब्याला खाली झाकण असे. कधी त्याला एखादी साधी चावीही असे. पण मातीचे भांडे मात्र फोडून त्यातील पैसे काढले जात असत. पण याचा एक संकेत होता. मातीचा घट फोडणे ही क्रिया अंतिम संस्कार, घटस्फोट, तोडफोड – हानी यामध्ये केली जात असे. त्यामुळे मातीचे भांडे जरी पैशांनी भरलेले असेल तरी ते अकारण फोडले जात नसे. जर खरंच कांही आर्थिक संकट आले तरच त्यावेळी ते भांडे फोडून पैसे वापरले जात असत. त्यामुळे संकटाचे नक्कीच निवारण होई अशी श्रद्धा होती. आपल्याकडे जुन्या चित्रांमध्ये लक्ष्मी, कुबेर यांच्या पायाशी पॆशांनी — नाण्यांनी भरून ओसंडणारे मातीचे घट पाहायला मिळतात. जमिनीत गाडलेले धन हे बहुतांशी मातीच्या घटात सापडते.
आजही अनेक व्यापारी याला गल्ला किंवा तिजोरी म्हणतात. काही आस्थापनांच्या गल्ल्यावर अशी एखादी पेटी आढळते.त्यात गोरक्षा, कॅन्सर पीडितांना मदत, रुग्ण पशुसेवा इ. साठी पैसे जमा केले जातात. अनेक कुटुंबात वर्षानुवर्षे असे डबे जपून ठेवलेले आहेत.दर दिवाळीला लक्ष्मी पूजनाला त्यात काहींना काही भर घातली जाते. पूर्वी युद्ध, पूर, भूकंप, दुष्काळ इत्यादींसाठी निधी गोळा करायलाही असे पत्र्याचे पण कुलूपबंद डबे वापरत असत. पण नंतर नंतर असे काही डबे मध्येच गायब झाल्याच्या बातम्या यायला लागल्या आणि लोकांचा त्यावरचा विश्वास उडाला.
आमच्या लहानपणी पॉकेट मनी हा प्रकारच नव्हता. कपड्यांना पॉकेट्स भरपूर पण मनीचा पत्ता नसे. वडिलांकडेच ते पुरेसे नसत तर ते मुलांकडे कुठून येणार ? त्यामुळे अशा पिगी बँक जरा उच्च मध्यमवर्गाकडे असायच्या. कांही कंपन्या, बँका, शाळा यांनी मुलांना लहान वयातच बचतीची सवय लागावी ( आणि आपली जाहिरात व्हावी ) म्हणून असे आकर्षक डबे,वाटायला सुरूवात केली. जगभरात गेल्या शतकाच्या सुरुवातीपासून या पिगी बँका प्रसिद्ध होत्या. बचतीचे हे डबे बहुतांशी डुकराच्या आकाराचे असत. या डुकराच्या पाठीवर छोटीशी चीर असायची. त्यातून यात नाणी किंवा क्वचित नोट आत टाकली जात असे. पण मग डुक्करच का ?
हा एक गंमतीदार प्रकार आहे. मध्य युगात मडकी आणि भांडी बनविण्यासाठी, पाश्चिमात्य मंडळी पिग्ग नावाची पिवळसर आणि स्वस्त माती वापरत असत. आपल्याकडे मुरूम नावाचा मऊ मातीचा असाच एक प्रकार आहे. याचा डुकराशी काहीच संबंध नाही. ( कदाचित ती माती डुकरांना लोळायला आवडत असावी ). पण कुणीतरी नावापुरता तो जोडून ही बचतीची भांडी Piggy Bank म्हणून बनवायला सुरुवात केली. त्याला डुकराचा आकारही द्यायला सुरुवात केली. मोठ्या कंपन्या आज देखील, बचतीची ओळख म्हणून डुकराच्या पिगी बँकेचे चित्र वापरतात.
इ.स. पूर्व दुसऱ्या शतकातील सर्वात जुनी पिगी बँक ही टर्की मधील प्रीन या ग्रीक वसाहतीत सापडली. ऱ्हाईन नदीच्या खोऱ्यातील उत्खननामध्ये विविध आकारांच्या पिगी बँक सापडल्या आहेत. इंडोनेशियातील ( पूर्व जावा मध्ये ) ट्रॉवुलन खेड्यात, १५ व्या शतकातील मजापहित राजवटीतील अनेक पिगी बँक ( डुकराच्या आकाराच्या ) सापडल्या आहेत.
माझ्या संग्रहातील एका निग्रोची पिगी बँक खूप आकर्षक आहे. याचे वजन एक किलोहून अधिक आहे. या निग्रोच्या तोंडाजवळील हातावर नाणे ठेवून त्याच्या खांद्याजवळील कळ दाबली की ते नाणे झटकन त्याच्या पोटात जाते. ते पोटात जातांना त्या निग्रोचे डोळे मिटले जातात. ( या सोबतची चित्रफीत जरूर पहा.) खरे तर पैसे खाणाऱ्या आपल्या कांही राजकीय पुढाऱ्यांचे हे बोधचिन्ह व्हायला हवे. पण हा निग्रो पैसे खात असला तरी खूप इमानदार आहे. त्या निग्रोचे पोट कधीतरी तरी भरते आणि मग त्याने खाल्लेले सर्व ( साठलेले ) पैसे आपल्याला काढून घेता येतात. दुसरी एक पिगी बँक जुन्या मोठ्या तिजोरीच्या आकाराची आहे. लहान मुलालासुद्धा आपण तिजोरीत पैसे ठेवतोय असे वाटले पाहिजे. लक्ष्मीचे वाहन असलेल्या हत्तीच्या आकाराची पिगी बँक वजनाला जड आहे.
सेंट्रल बँक ऑफ इंडियाने सुमारे ६० / ६५ वर्षांपूर्वी, छोट्या डायरीच्या आकाराची एक छान पिगी बँक काढली होती. खऱ्या डायरीला असते तसे याला चामड्याचे कव्हर होते. त्यावर मुंबईतील या बँकेच्या ऑफिसचे नाव व चित्र होते. याचे वैशिष्ठय म्हणजे याला पैसे आत टाकण्याची जेथे चीर होती, त्यावर एकमेकात अडकणाऱ्या हुक्सची रांग होती. त्यामुळे एकदा आत टाकलेले नाणे, हा डबा उलटसुलट केला तरी बाहेर येत नसे. ( कृपया छायाचित्रे पाहावी). बँकेच्या शाखेत जाऊन तेथे चावीने हा डबा उघडला जाई आणि त्यातील रक्कम मोजून खात्यात जमा होई.
मातीच्या घटाची पिगी बँक ही एकदाच वापरण्याची असते. फोडून पैसे वापरले की पुन्हा ती वापरता येत नाही. गरिबाला पण आता प्लॅस्टीकचा स्वस्त पिगी बँकेचा डबा उपलब्ध आहे ! पण मुळातच आता नाण्यांना कांही किंमतच उरलेली नाही. छोट्या किंमतीच्या नोटांना कुणी विचारत नाही. ऐपत नसलेल्या पालकांनाही आपल्या शाळेत जाणाऱ्या मुलाला १० / १५ हजारांचा मोबाईल फोन घेऊन द्यावा लागतो , पुढे त्याचे बिल भरावे लागते. खाऊ ही संस्कृती नाहीशी होऊन चॉकलेट्स,पिझ्झा, आईस्क्रीम, बर्गर आले. ‘ लोन पे सब कुछ ‘ ही जीवनशैली झाली आहे. छोटी बचत आता हास्यास्पद ठरत आहे. म्हणूनच कालबाह्य ठरत असलेल्या या पिगी बँक आता संग्रहालयातच पाहायला मिळणार !
माहिती साभार – Makarand Karandikar