महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,43,178

पिलीव कोट | Piliv Fort

By Discover Maharashtra Views: 3739 5 Min Read

पिलीव कोट | Piliv Fort

सातारा-पंढरपूर मार्गावर अकलूजपासुन ३२ कि.मी तर सोलापुर महामार्ग इंदापुरपासून ६० किमी वर पिलीव नावाचे छोटेसे गाव आहे. पिलीव गावातुन दिसणाऱ्या गावाच्या मागील लहानशा टेकडीवरच पिलीवचा किल्ला (Piliv Fort) आहे. किल्ला सुस्थितीत असुन किल्ल्याच्या आत आजही किल्लेदाराचे वंशज राहत आहेत. साधारण १.५ एकरात वसवलेला हा किल्ला दोन भागात विभागलेला असुन आयताकृती आकाराच्या पिलीव कोट या किल्ल्याचे प्रवेशद्वार पश्चिमाभिमुख आहे. गडात प्रवेश करण्यापुर्वी दरवाजाच्या डावीकडील तटबंदी समोरच चुना मळण्याची दोन घाणी दिसुन येतात तसेच डाव्या बाजूस बुरुजाच्या अलीकडे तटबंदीपासुन बाहेर काढलेला एक आयताकृती सज्जा दिसतो. त्याला खालील बाजुस झरोके आहेत. काळ्या-तांबूस पिवळसर दगडांनी बांधलेल्या तटबंदीत हा सज्जा उठुन दिसतो. बुरुजांवर व तटबंदीवर जागोजागी मारगीरीसाठी जंग्या ठेवलेल्या आहेत.

मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूच्या तटासमोर एक लहानशी कमरेइतक्या उंचीची भिंत आहे. येथे कधीकाळी एखादी खोली असावी. किल्ल्याच्या तटबंदीत एकुण दहा बुरूज असुन चार टोकाला चार भव्य बुरूज व उरलेले सहा मध्यम आकाराचे बुरूज तटबंदीत अशी याची रचना दिसुन येते. Piliv Fort किल्ल्याचे एकुण बांधकाम पहाता किल्ला बांधताना अर्धवट सोडुन दिल्याचे दिसुन येते. किल्ल्याचा एकुण आकार पहाता किल्ल्याचा मुख्य दरवाजा या बांधकामाशी विसंगत वाटतो शिवाय दरवाजाच्या उजवीकडील बुरूज अर्धवट बांधलेला वाटतो शिवाय येथील बांधकामात चुना भरण्याचे काम राहून गेले आहे. किल्ल्याच्या या दरवाजातून आत आल्यावर दोन्ही बाजूस पहारेकऱ्यासाठी असणाऱ्या देवड्या पहायला मिळतात. दरवाजासमोरच एक पडझड झालेली वास्तू आहे. या वास्तूच्या आत शिरुन उजव्या बाजुस गेल्यास आपण किल्ल्याच्या दुसऱ्या भागात पोहोचतो. या तटबंदीत असणाऱ्या बुरुजाखाली एक कोठार असुन त्याला आत हवा व प्रकाश येण्यासाठी दोन झरोके आहेत.

बुरुजाखालील या खोलीत रचना या भागातील टेहळणीसाठी असावी असे वाटते. हा बुरुज पाहून पुन्हा दरवाजाकडे येऊन डाव्या हाताला थोडेसे चालत गेल्यावर तटबंदीवर जाणाऱ्या पायऱ्या दिसतात. या पायऱ्यांनी तटबंदीवर फेरफटका मारून या भागातील तीनही बुरुजावर जाता येते. इथे मधल्या बुरुजावर एक ४ फुटी छोटी तोफ दिसुन येते. अगदी पुढे टोकाला दिसणाऱ्या बुरुजावर जाण्यासाठी एका लहानसा दरवाजा असुन वाकुन पायऱ्यांनी या बुरुजावर जाता येते. या बुरुजाचा घेर साधारण ३६ फुट असुन बुरुजावरील ५ फुट उंचींच्या तटबंदीत जागोजागी जंग्या व तोफांसाठी झरोके केलेले आहेत. या बुरुजापुढील तटबंदी कोसळली असल्याने आपल्याला येथुनच मागे फिरावे लागते. किल्ल्याच्या इतर तीन भव्य बुरुजांवर जाण्यासाठी असेच अरुंद दरवाजे असुन तटबंदीवर जाणाऱ्या पायऱ्या कोसळल्या असल्याने तेथे जाता येत नाही. या बुरूजावरून किल्ल्याचा संपुर्ण परीसर दिसुन येतो. Piliv Fort किल्ल्याच्या मध्यभागी एका प्रशस्त वाड्याचे चौथरे नजरेस पडतात. किल्ल्याच्या इतर भागात खाजगी मालमत्ता व वस्ती असल्यामुळे तिथे जाता येत नाही पण नव्या बांधकामात किल्ल्याचे मूळ अवशेष नष्ट झाले असावेत.

पिलीव कोट किल्ल्याचा हा भाग पाहुन झाल्यावर पुन्हा मूळ वाटेवर येऊन थोडे पुढे गेल्यावर वाटेच्या डाव्या बाजूने खाली उतरल्यास तटबंदीला लागुनच खाली उतरणाऱ्या पायऱ्या आहेत.या पायऱ्यांच्या शेवटी असणाऱ्या लहानशा दरवाजातून किल्ल्याच्या दुसऱ्या भागात जाता येते. किल्ल्याचा हा भाग मूळ किल्ल्यापासून पुर्णपणे अलिप्त असुन संपुर्णपणे तटबंदीने वेढलेला आहे. या भागात असलेल्या तटबंदीवर जाणाऱ्या पायऱ्या असुन मध्यभागी एक सुंदर दगडी बांधकाम असलेली अष्टकोनी बारव आहे. या विहीरीत उतरण्यासाठी पायऱ्या असुन पायऱ्यांच्या शेवटी एक सुंदर कमान आहे. किल्ल्याच्या या भागातील कोपऱ्यात असणाऱ्या बुरुजावरून किल्ल्याबाहेर पडता येते. येथे किल्ल्याच्या बाहेरील बाजुस दोन बुरुजांच्या मधील भागात म्हसोबाची घुमटी असुन ते किल्ल्याची क्षेत्रदेवता आहे. येथे आपली गडफेरी पूर्ण होते.

संपुर्ण गड फिरण्यास एक तास पुरेसा होतो. या किल्ल्यात फिरताना आमची भेट किल्ल्याचे मुळ मालक व जहागिरदारांचे वंशज श्री.पेरसिंग जयसिंगराव जहागीरदार यांच्याशी झाली व त्यांच्याकडे असलेली मराठा काळातील तलवार,भाला,दांडपट्टा यासारखी शस्त्रास्त्रे आम्हाला पहायला मिळाली इतकेच नव्हे तर त्यांनी आम्हाला फलाहार करवुन आमचा पाहुणचार केला व जातीने आम्हाला संपुर्ण किल्ला फिरवला. जहागीरदार यांचे मूळ नाव भोसले असुन ते थेट अक्कलकोट भोसले घराण्याशी संबधित आहेत. त्यांनी सांगितलेल्या इतिहासानुसार जहागीरदार घराण्याच्या मुळपुरुषाने छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात हा किल्ला बांधला. हि गढी नसून एक भक्कम भुईकोट किल्ला आहे. स्वराज्यातील सातारा कोल्हापूर भागावर मोगल सैन्याचे विजापूर-सोलापूर मार्गे होणारे आक्रमण थोपवण्यासाठी हा Piliv Fort किल्ला बांधला गेला.

सदर किल्ला हा सध्या त्यांच्या जहागीरदारांच्या वंशजांच्याच अखत्यारीत आहे. किल्ला बांधून पुरा होत असतानाच कुठल्याशा लढाईत जहागीरदार यांच्या घराण्यातील मूळपुरुषाने प्रचंड पराक्रम गाजवला परंतु दिवाळी दरम्यान झालेल्या या लढाईत त्यांना वीरमरण आले व त्यामुळे किल्ला काही प्रमाणात बांधायचा राहून गेला. तेंव्हापासून या जहागिरदारांच्या वाड्यात दिवाळी साजरी केली जात नाही व दिवाळीला रोषणाई केली जात नाही. गडाचा यापेक्षा अधिक इतिहास उपलब्ध नाही.

माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Leave a Comment