किल्ले पिलीव –
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील पिलीव गावात छोट्याश्या टेकडीवर जहागिरदार लोखंडे घराण्याची गढी म्हणजे बळकट भुईकोट उभा आहे. पिलीव गाव अकलूजपासून ३५ कि.मी. अंतरावर आहे. गढीचे बुरूज, तटबंदी, प्रवेशद्वार आजही मजबूत स्थितीत अस्तित्वात आहेत. मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर आतमध्ये एक चौक लागतो व गढीत प्रवेश होतो. तटबंदी आणि बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. वरून टेहळणी करता येते व जंग्या आहेत. गढीमध्ये आत घरे आहेत. गढीच्या बाहेर एक चुन्याचा घाणा आहे.
लोखंडे सरदार हे मूळचे औरंगाबाद जिल्ह्यातील शिवणी जवळील पारद गावचे. बाबाजी लोखंडे यांच्या मृत्यूनंतर हे घराणे जहागीरदार म्हणून पिलीवला आले. सयाजी लोखंडे यांना तीन मुले होती त्यापैकी राणोजी हे छत्रपती शाहू महाराजांना दत्तक दिले तेच म्हणजे फत्तेसिंह भोसले. यांच्या तीन शाखा आहेत पिलीव, अक्कलकोट, राजाचे कुर्ले. यांच्या घराण्यातील पुरूषाने एका युद्धात पराक्रम गाजवला पण वीरमरण प्राप्त झाले. हे युद्ध दिवाळीदरम्यान घडले तेव्हापासून हे घराणे दिवाळी साजरी करत नाही. रणजीतसिंह जहागीर हे त्यांचे वंशज गढीत राहतात.
टीम-पुढची मोहीम