पिलीवचा किल्ला
सातारा – पंढरपूर मार्गावर सातार्यापासून १०६ किमी व पंढरपूर पासून ४० किमी वर पिलीवगाव आहे. तर दहिवडी पासून पिलीव ४८ किमी वर आहे. पिलीव गावातील सुभाष चौकातून डाव्या हाताचा रस्ता एका टेकडीवर जातो. या टेकडीवरच पिलीवचा किल्ला आहे.
याला एक गढी पण म्हणता येईल. सध्या किल्ल्यात वस्ती आहे. चारी कोपऱ्यावर भक्कम असे ४ बुरुज आणि त्याच्या मध्ये लहान सहान धरून एकूण १० बुरुज अशी किल्ल्याची रचना. किल्ला संपूर्ण अभ्यासाला की लक्षात येत किल्ल्याचे काम काही ठिकाणी अर्धवट आहे किंवा गडबडीत केले आहे. दर्शनी भागावरील एक बुरुजावर लहान तोफ आहे.बुरुज आणि तटबंदी दोन्हीत जंग्यांचे जंगी नियोजन आहे. किल्ल्याच्या बाहेर दोन चुन्याच्या घाण्या आहेत. एका बुरुजाला सज्जा काढलेला आहे.
सध्या किल्ल्यात रणजितसिंह जहागीरदार राहतात जे या राजेभोसले घराण्याचे वंशज आहेत. हा माणूस खूप दिलदार आहे.
पिलिवचा किल्ला:- मुघलांनी उत्तरेत परत जाताना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू यांना आपल्या कैदेतून सोडले. शाहू मुघलांच्या कैदेतून सुटले आणि त्यांनी स्वराज्यावर हक्क सांगितला. इकडे ताराबाई नी खूप मेहनतीने स्वराज्य जोपासले आणि सांभाळले होते. शाहू सुटले तसे सरदार त्यांना येऊन मिळू लागले. पण शिवणी परगण्यातील पारद या गावचा पाटील शहाजी लोखंडे ताराबाईंचा समर्थक होता. शाहूंना त्याने अडवले आणि त्या लढाईत तो मारला गेला. शहाजीच्या पत्नीने आपला मुलगा राणोजी याला शाहूंच्या पायावर घातले आणि त्याचा सांभाळ करण्याची विनंती केली. शाहूंनी त्याला आपल्या बरोबर साताऱ्याला आणले त्याच्या शिक्षणाची सोय लावली.
पहिल्याच लढाईत फत्ते झाली आणि ते लहान मुल आपल्या पदरी आले म्हणून त्या मुलाचे नाव फत्तेसिंह ठेवले आणि त्याला राजेभोसले आडनाव दिले. त्याचा पराक्रम पाहून शाहूंनी त्याला अक्कलकोट संस्थानचा संस्थानिक बनवले.
याच संस्थानात पुढे वाद होऊन २ नवीन जहागिरी निर्माण झाल्या त्या म्हणजे सातारा जिल्ह्यातील कुर्ले आणि दुसरे म्हणजे पिलीव.
ओंकार खंडोजी तोडकर