पिंपळेश्वर, गोसावी पिंपळगांव –
सेलू तालुक्यातील वालूर नजिक गोसावी पिंपळगांव या खेड्यात १२व्या शतकाच्या उत्तरार्धातील यादवकालिन प्रशस्त स्वरुपाचे मंदिर आहे. त्याच्या प्राचिनत्वाची साक्ष म्हणून पिंपळेश्वर मंदिर परिसरात विखुरलेले भग्न शिल्प व इतर खाणाखुणा आपली ओळख पटविण्यासाठी ईतिहास संशोधकांच्या प्रतिक्षेत आहेत.
वालूर नजिक अतिशय आडरस्त्याला असलेलं पिंपळगांव निजामी राजवटीत गोसावी समाजाला मिळालेली जहागीर.एकेकाळची तंत्रविद्येची पाठशाळा.आज मात्र गावात गोसाव्यांचे एकही घर पहायला मिळत नाही.गावाच्या एका टोकाला मंदिर असून त्या भोवती संरक्षीत भिंत आहे. या शिवमंदिराला पिंपळेश्वर नावाने ओळखल्या जाते.तंत्रविद्येचे माहेरघर असणा-या औंढा येथील मंदिराशी येथील मंदिराचे धागेदोरे जुळतात असा अभ्यासकांचा कयास आहे.
त्रिदल पध्दतीचे मंदिर रस्त्यापासून उंच जोत्यावर बांधलेले आहे. मुखमंडप,सभामंडप,मुख्यगर्भगृह व दक्षीण उत्तरदिशेला उपगर्भगृह आहेत.उत्तरेकडील पडल्यामुळे तिथे लोखंडी ग्रील बसविलेली दिसते.सभामंडपात रंगशिळेवर चौकी आहे. खांबावर पशुपक्षाची शिल्प कोरलेली आहेत.चार पाय-या उतरून मुख्य गर्भगृहात प्रवेश होतो.आत शिवाची पिंड आहे.गाभा-यातील देवकोष्टात शंकराची पंचधातूची मुर्ती आहे.अंतराळद्वाराशी आणखी दोन मुर्तीवीना देवकोष्टाचा वापर पुजासामग्री ठेवण्यासाठी केला जातो.रूपस्तंभावरील द्वारपालाचे शिल्प रंगरंगोटी मुळे ओळखणे शक्य नाही.
मंदिर परीसरातील देखण्या बारवेची पुनर्बाधनी करतांना त्याचा चक्क आड (छोटी विहिरी)करून टाकला आहे.बारवेत सापडलेले शेषशायी विष्णूचे भग्नावस्थेतील चबुत-यावर ठेवलेले शिल्प दुर्मिळ यासाठी आहे की त्यावर दशावतारा ऐवजी समुद्र मंथनाचा देखावा अंकित केलेला आहे.या शिल्पावरील लक्ष्मीची मुर्ती पुर्णत:तुटलेली आहे.वराह अवताराचे शिल्प भंगलेले आहे.मंदिर परिसरातील वृक्षाखाली शैव संप्रदायातील तांत्रिक आचार्यांचे ध्यानमुद्रेतील शिल्प उघड्यावर आहेत. पिंपळेश्वर मंदीरालगत पुरातन बळीचे मंदिर आहे,परंतू ते सिमेंट,वीटाने बांधताना रंगरंगोटी करताना त्याचे सौंदर्य घालविले आहे. कलावैभवाचा समृध्द वारसा लाभलेल्या मराठवाडयात परभणी जिल्हयातही देखणी मंदिरं असून ती दुर्लक्षून चालणार नाहीत.
मल्हारिकांत देशमुख, परभणी