पिंपळेश्वर मंदिर, विरोळी –
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात पारनेरपासून १२ किलोमीटर अंतरावर निसर्ग समृद्धतेने नटलेलं विरोळी हे छोटंसं गावं. गावापासून अवघ्या पाचशे मीटर अंतरावर वृक्षवेलींच्या सानिध्यात, पिंपळ वृक्षांच्या छायेत पिंपळेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर उभे आहे. पिंपलेश्वर महादेवाचे हे जागृत देवस्थान असून ग्रामस्थांचे श्रध्दास्थान आहे. पिंपळ वृक्षाच्या सानिध्यात असल्याने येथील शिवलिंगाला पिंपळेश्वर म्हटले गेले असावे अशी प्राथमिक माहिती ग्रामस्थ सांगतात.(पिंपळेश्वर मंदिर, विरोळी)
सोबतच मंदिराविषयी आणखी एक आख्यायिका आपल्याला ऐकायला मिळते ती अशी की, दधिची ऋषी यांचे पुत्र असलेले पिंपलाद ऋषी हे परम शिवभक्त होते. ते काशीविश्वेश्वराची मनोभावे भक्ती व सेवा करीत. सेवा करीत असताना काशीविश्वेश्वराने त्यांना तीर्थाटन करण्याची आज्ञा केली. तीर्थाटन करीत असताना पिंपलाद ऋषी जुन्नर तालुक्यातील पिंपळवडी या ठिकाणी आले. निसर्गसौंदर्याने नटलेला हा परिसर त्यांना फार आवडला व ते इथेच ध्यानधारणा करू लागले. कालांतराने वृद्धत्वामुळे त्यांना काशीविश्वेश्वराची यात्रा करणे शक्य होईना. तेव्हा त्यांनी आपल्या योग सामर्थ्याने आपले शीर धडावेगळे केले. ते शीर या विरोळी गावातील पिंपळेश्वर मंदिराच्या परिसरात पडले व धड तिथेच राहिले. त्यांच्या या भक्तीने व त्यागाने प्रसन्न होऊन काशीविश्वेश्वर याच ठिकाणी लिंग रुपात प्रकट झाले व या शिवलिंगास पिंपळेश्वर या नावाने ओळखले जाऊ लागले.
मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला काही पायऱ्या खाली उतरून जावे लागते. खाली आल्यानंतर आपल्याला एका पिंपळ वृक्षाखाली पिंपलाद ऋषींचे शीर तसेच काळ्या पाषाणातील नंदी व शिवलिंग नजरेस पडते. जवळच गंगाकुंड असून हे बारा महिने प्रवाहित असते. यातील पाणी देखील पिण्यायोग्य आहे. पिंपळेश्वर महादेवाचे मंदिर पश्चिमाभिमुख असून मंदिरासमोर नंदीमंडपात नंदी विराजमान आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला दोन मोठ्या वीरगळ ऑइल पेंटने रंगवलेल्या आपल्या नजरेस पडतात. जवळच असणारा तलाव मंदिराची शोभा वाढवतो. निसर्गरम्य परिसर व मंदिरा सोबत जोडली गेलेली सुंदर आख्यायिका यामुळे पिंपलेश्वर मंदिराची भेट संस्मरणीय ठरते.
मंदिराचे गुगल लोकेशन – https://maps.app.goo.gl/J3S7DzAMGwSdznXQ7
©️ रोहन गाडेकर