पिंगळेश्वर मंदिर | यादवकालिन बारव, पिंगळी –
परभणी शहरापासून अवघ्या ११ कि.मी.अंतरावर असलेल्या पिंगळी या गांवी असलेली यादवकालिन कलात्मक बारव स्थापत्याचा आदर्श नमूना होय .मराठवाड्यातील पुरातन बारवांच्या क्रमवारीत पहिल्या पाचमध्ये तिचा अंतर्भाव होतो.परभणी जिल्ह्याचा विचार करता चारठाणा येथील बारवेच्या खालोखाल हिची भव्यता व देखणेपणं नजरेत भरते. या पुरातन वैभवाला उतरती कळा येत असून बारवेचा दक्षीणेकडील बाजू खचली असून उत्तरेकडील जमिनीवरील बांधकाम एका बाजूला झुकत चालले आहे. पुरातत्त्व खात्याने वेळीच लक्ष पुरविणे गरजेचे आहे.चारठाणा व पिंगळी येथील बारवेत बरेच साम्य आढळते. चारठाणा येथील बारव बंदिस्त स्वरुपाची आहे.वरच्या भागातील प्रशस्त ओव-या ,स्तंभावरील कोरीवकांम पिंगळीपेक्षा सरस मानले जाते. पिंगळी च्या तुलनेत चारठाणा बारवेची अधिकची पडझड झालेली आहे.(पिंगळेश्वर मंदिर | यादवकालिन बारव, पिंगळी)
पिंगळी येथील बारवेत चारही बाजूंनी उतरण्यासाठी पाय-या सुस्थितीत असून अंतरा अंतरावर एक अशी पाच ऐसपैस विश्रामस्थानं आहेत.चारही दिशेला कोप-यात दोन दोन अशी आठ मंदीरवजा देवकोष्ट (देवळ्या)आहेत.त्यांना आष्टमासिध्दीची मंदिरं म्हटल्या जाते. या पैकी एक देवकोष्ट पुर्णत:भंगलेले आहे.या छोटेखानी देवकोष्टरूपी मंदिरात गणेश,नृसिंह,नाग,दुर्गा,चामुण्डा देवतांच्या भग्नावस्थेतील मुर्ती आहेत.बारवेलगत उंच चौथ-यावर पिंगळेश्वराचं पुर्वाभिमुख हेमाडपंथी मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे सुर्योदय झाला की पहिल्या सोनेरीम किरणांचा अभिषेक गाभा-यातल्या मुर्तीवर होतो.
त्रिदल पध्दतीच्या मंदिरात मुखमंडपातून प्रवेश केला जातो.दोन्ही बाजूंना कक्षासनं आहेत. नक्षीकाम केलेल्या १६खांबी सभामंडपात रंगशिळेवर चार खांबांची चौकी आहे.मुख्य गर्भगृहात शीवलिंग असून त्याला पिंगळेश्वर असे नांव आहे.त्यालगत मुर्तीपीठ असून या ठिकाणची मुर्ती मात्र उपलब्ध नाही.पंचशाखीय गर्भगृहाच्या द्वारशाखेवरील वैष्णव द्वारपाल व गणेशपट्टीवरील गरुडाचे शिल्प पाहता हे देखील मंदिर विष्णूचं असलं पाहिजे असा अनुमान काढता येतो.मंदिराबाहेर झाडाखाली ऐकल्यावर विष्णूदेवतेची भग्नावस्थेतील मुर्ती दिसते.या भग्न मुर्तीच्या पायातले सौंदर्य ,अलंकरण पाहता अभंगमुर्ती किती सुंदर असेल याचा अंदाज बांधता येवून ‘खुबसुरती पैरोंसे झलकती है!’ यातले रहस्य मनाला पटते.मंदिरात एक शिलालेख आहे परंतू त्यावर रंगरंगोटी करण्यात आली आहे.
या गांवी दोनशे वर्षा खालील गोकुळनाथाचे मंदिर आहे.तेथे परमहंस नावाच्या योगी सत्पुरुषाची समाधी आहे. स्वामींच्या नावे दरवर्षी यातल्या भरते. मुख्यतः मंदिर व बारवेच्या संरक्षणासाठी परिसरात नव्याने भिंत बांधन गट्टू बसविण्यात आले आहेत.संपुर्ण गावात सिमेंट रोड झालेत,”स्वच्छ भारत,समृध्द भारत”चे फलक झळकत असले तरी मंदिराच्या पाठीशी असणारी हागणदारी हटलेली नाही हे दुर्दैव.
Malharikant Deshmukh