महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,25,338

पितळखोरे लेणी, कन्नड, औरंगाबाद

By Discover Maharashtra Views: 2194 12 Min Read

पितळखोरे लेणी, कन्नड, औरंगाबाद –

“राकट देशा कणखर देशा, दगडांच्या देशा…!”

या ओळी खर्या अर्थाने महराष्ट्राला भूषावहच आहेत असे म्हणण्यास हरकत नाही.आपल्या सह्याद्रीतील माणसे जशी वरुन काटक कणखर तेवढीच मनाने मायाळू,त्याच प्रमाणे सह्याद्रीतील दगडही वरुन कणखर पण आतून तितकाच मृदू. आपल्या सह्याद्रीचा गाभा हा कणखर व विशेष म्हणजे एकसंधी आहे.त्यामुळे छन्नी व हातोड्यांनी खोदकाम करण्यास अनुकूल आहे.भारतामध्ये लेणी खोदण्याची प्रथा सुरु झाली त्या काळात व जो पर्यंत हि प्रथा आपल्याकडे सुरु होती तो पर्यंत अनेक सत्ता या ठिकाणी आपले राज्य गाजवून गेल्या.मात्र जोपर्यंत लेण्या खोदल्या जात होत्या त्या काळांत या सत्ता खर्या अर्थाने प्रबळ होत्या,त्यांच्या स्वातंत्र्यलक्ष्मी अबादीत होती,त्यांच्या राज्यात आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक संपन्नता नांदत होती.हे लेण्या जो पर्यंत खोदल्या जात होत्या तो पर्यंत वरील सर्व बाबी राज्यात होत्या याचे ‘लेण्या’ हे सर्वात मोठे व जिते जागते उदाहरण होय.लेण्यांमुळे सुबत्ता होती असे नव्हे मात्र हे असे खोदकाम एका स्थिरस्थावर व ऐश्वर्यसंपन्न राज्याचे धोतक होय.(पितळखोरे लेणी)

सातवाहन,वाकाटक चालुक्य,राष्ट्रकूट या राजसत्तांनी येथे आपले राज्य ज्या पद्धतीने चालविले त्याचे अनेक धडधाकट पुरावे आपल्याला या लेण्यांतील शिलालेखांमुळे मिळतात.याच कालखंडात भारताचा इतर राज्यांशी चालू असलेला व्यापार व त्यातून मिळणारे उत्पन्न,व्यापारविषयक अनेक चांगली धोरणे,परदेशांशी असेलेले आपले सबंध हे सर्व सर्व या लेण्या अगदी आपल्याशी आजही  बोलतात जणू….!

कार्ल्याच्या लेण्याचे उदाहरण घेतलं तर लक्षात येत की,वैजयन्तीचा व्यापारी भूतपाल याने हे कार्ल्याचे लेणे उभारले असा निर्देश तेथील शिलालेखात मिळतो अर्थात हे कार्य काही अगदीच एकट्याचे नव्हे, लेण्याजवळील समाजाचेही देणे तेथे आहेच.प्राचीन काळात व्यापार हा संघाच्या मार्फत चालत होता त्या संघांनी या सांस्कृतिक कार्यासाठी देणग्या दिल्याचे, त्याचप्रमाणे धनाढ्य व्यापारीच काय पण परिसरातील सामान्य लोकांनीही या विधायक कार्यासाठी देणग्या दिल्याचे उल्लेख अनेक लेण्यांतून आपल्याला अढळतात.धार्मिक बाबतीत सलोख्याची भावना हि आपल्याकडे काही जुनी नाही ती पुर्वापार चालत आलेली आहे.सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर जशी अनेक संग्राम झालेली धारातिर्थे आहेत तशी अनेक धर्मक्षेत्रे सुद्धा आहेत.ती अनेक पंथांची आहेत, धर्मांची आहेत हा या मातीचाच जणू गुण आहे.पण,हि सहिष्णुता व धार्मिक सलोख्याची भावना कोठपर्यंत? जोपर्यंत त्यात दगाभटक्याची व स्वातंत्र्यलक्ष्मीला धोका पोहोचण्याचा संभव नाही तोपर्यंतच.मात्र यांत काही दगाफटका व आक्रमणाचा संभव असेल मग मात्र आपणा सर्वांना ठावूकच आहे…!

याच धार्मिक सलोख्याचे उदाहरण म्हणजे सह्याद्रीत असलेली बौद्ध, जैन व ब्राम्हणी लेणी होय.

लेणी हा खोदकामाचा प्रकार बहुतांशी पणे महाराष्ट्राशी जोडलेला आहे.कारण,लेणी हा सुद्धा अस्सल मराठीच शब्द होय.खोदणे व कोरणे हे सुद्धा दोन अस्सल मराठी धातूच होत.त्यामुळे, मराठ्यांचा फार पुर्वीपासून या खोदकामांशी सबंध असल्याचे अनेक इतिहासकार सांगतात मान्य करतात.सह्याद्रीत हि आज आडवाटेला असणारी म्हणजे खर तर वाटणारी बरं का…!

एके काळी येथूनही व्यापाराचे आजच्या प्रमाणेच सामान वाहतूकीचे भरदार रहदारी असणारे मार्ग होते.या मार्गांवरील लेण्या हि आपल्याकडील आपल्याला ज्ञात असलेली सर्वात जूनी धर्मक्षेत्रे आहेत.आपल्या पुराणांत व धर्मग्रथांत अशा प्रकारच्या धर्मक्षेत्रांचा उल्लेख आपल्याला अढळतो फक्त थोडाफार नावाचाच काय तो इकडे तिकडे फरक होय.

आपल्याकडे सर्वात प्राचीन धर्मक्षेत्रांत नाशिक व औरंगाबाद हा परिसर या बाबतीत सर्वात महत्वाचा परिसर होय.महाराष्ट्राचा प्राचीन ते मध्ययूगीन अभ्यास केल्यावर लक्षात येते की,तात्कालीन काळातील राजसत्तांच्या राजधान्या या यांच परिसरात होत्या.शकांसोबत त्याच प्रमाणे क्षत्रप व अभिरांशी सातवाहनांचे जे संघर्ष झाले ते याच परिसरांत झाले.

शुर्पारक(नालासोपारा), कल्याण व चौल ही त्याकाळची पश्चिम समुद्र किनार्यांवरील बंदरे व मथुरा वाराणसी व पाटलीपुत्र यांसारखी उत्तरेकडील ऐश्वर्यसंपन्न शहरे यांना जोडणारे महत्वाचे मार्ग म्हणजे पैठण व तगर या महाराष्ट्रांच्या अंतर्भागातून जात होते.याच मार्गांच्या काठांवर जागोजाग अनेक लेणी खोदलेली आपल्याला अढळतात पैकीच एक सर्वात प्राचीन असलेली हि “पितळखोरे’ लेणी होय.प्राचीन व मध्ययुगीन कालखंडात जसे भारताने सोबत महाराष्ट्राने अनेक सत्तांतरे पाहीली याही लेणीने अनेक सत्तांतरे पाहीली.लेण्यांचे मुख्य दोन प्रकार पडतात ऐहिक लेणी व धार्मिक लेणी यांत ऐहिक लेणी महाराष्ट्रात एकच आहे ती म्हणजे नाणे घाटातील सातवाहनांची लेणी.या लेण्यांत त्यांच्या पुर्वजांच्या प्रतिमांची किर्ती या लेण्यांतील शिलालेखांत वर्णिलेली आहे, थोडक्यात हे देवकूल किंवा किर्तीमंदिर होय.लेण्यांचा दुसरा प्रकार म्हणजे धार्मिक लेणी याचे तिन उपप्रकार पडतात.

बौद्ध,जैन व ब्राम्हणी लेणी.

पैकी महाराष्ट्रात बौद्ध लेण्यांची संख्या सर्वात जास्त आहे तर,महाराष्ट्रात मुख्य जैन लेणी ‘वेरुळ’ येथील होय.तर ब्राम्हणी प्रकारातील मुख्य लेणी एक म्हणजे घारापुरी(एलिफंटा) दुसरी म्हणजे वेरुळ येथे.

बौद्ध लेण्यांचेही कालानुरुप प्रकार  पडतात.

१)ख्रिस्तपूर्व दुसर्या शतकापासून ते ख्रिस्तोत्तर दुसर्या शतकापर्यंत.

२)पाचव्या शतकाच्या मध्यापासून ते सातव्या शतकाच्या मध्यापर्यंत.

३)सातव्या शतकाच्या मध्यापासून ते दहाव्या शतकाच्या अखेरी पर्यंत.

ख्रिस्तपूर्व तिसर्या शतकाच्या अखेर पर्यंत भारतात मौर्य सत्तेचा होत असलेला र्हास व सम्राट अशोकांच्या मृत्यूनंतर जणू बौद्धांचे धर्मकार्य थांबले होते.पण,पुढे सातवाहन काळात सातवाहनांची सत्ता महाराष्ट्रात प्रबळ असेपर्यंत लेण्यांसारखी धर्मकृत्ये झाली मात्र सातवाहनांच्या अस्तापासून ते चालुक्यांची सत्ता महाराष्ट्रात प्रबळ होई पर्यंत लेण्यांची फारशी निर्मिती अढळत नाही.याची अनेक कारणे आहेत जसे केंद्रीय सत्तांचा अभाव, राजकीय धमाधूमी या कारणामुळे व्यापाराला आलेली उदासिनता व परिणामी राज्यात आलेले आर्थिक दौर्बल्य.

यातील पहिल्या कालखंडात निर्माण झालेली लेणी हि ‘हीनयान’ पंथांची आहेत.कारण या लेण्यांत बौद्धांच्या मुर्ति अढळत नाही.कारण,या काळात गौतम बुद्धांना देवत्व प्राप्त झालेले नव्हते.भाजे, कोंडाणे,अजंठा(क्र.९ व १०),नाशिक व कार्ले या लेणी या सर्व ‘हीनयान’ पंथांची आहेत.त्याचप्रमाणे ‘पितळखोरेें’ ही लेणी देखील ‘हीनयान’पंथाची लेणी आहे.महायान पंथाच्या खोलात जात नाही पण सर्वसाधारणपणे ग्रिकांच्या आक्रमणानंतर त्यांच्या सोबत त्यांच्या धार्मिक कृत्यांना आपलेसे करत व मुर्तीपूजेला स्थान देत अनेक देवदेवतांचा स्विकार बौद्ध भिक्षुकांनीही केला, तसेच त्यात परावर्तनही केले.बौद्ध धर्माच्या पुनर्घटनेसाठी कनिष्कपूर येथे विख्यांत विद्वानांची एक सभा भरली येथ पासून पुढे ‘महायान’ पंथाचा प्रारंभ झाला.

(हि माहीती थोडक्या स्वरुपात आहे.)

पितळखोरे या लेण्यातील काही गुहा दुमजली आहेत व वर जाण्यास भुयारातून पायऱ्या खोदलेल्या आहेत.मुख्य लेणं म्हणजे एक मोठा चैत्य आहे.चैत्य या शब्दाच्या अनेक इतिहासकार संशोधकांनी वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत पैकी  एक निष्कर्ष म्हणजे,

”चैत्य ही संज्ञा पूजा प्रतिकाची धोतक आहे,मग ही वस्तु जडदेहाचा विषय असो किंवा पूज्य व्यक्तीच्या वापरातील काही वस्तू असो अगर अशा व्यक्तीची मुर्ती असो, अथवा धर्मचक्र वा त्रिरत्न यासारखे प्रतिक असो.”

चैत्यगृहात वरील संज्ञेतील एखादा अवशेषावर स्तूप उभारलेला अढळतो.यांतील स्तूपाचा आकार हा वर्तुळाकार का असतो याबाबत मात्र संशोधकांचे एकमत नाही.कदाचीत त्या काळी अशा प्रकारची घरे होती म्हणून असा आकार आहे असेही मत काही इतिहासकारांचे आहे.पण हे तितके प्रमाणबद्ध वाटत नाही.कारण,स्तूपाचा आकार हा पालथ्या भिक्षापात्रासारखा असावा असे बुद्धांचे वचन आहे.

जमिनीलगत वर्तुळाकार बैठक,त्यावर अंडाकृती घुमट, त्यावर चौकोनी हर्मिका आणि टोकावर छत्र अशी स्तूपाची उभारणी असते.

*स्तूपाची पूजा पुष्पे, धूप, दिप इत्यादींनी केली जात असे.या सर्वांत दिपाला विशेष महत्व होते.स्तूपासमोर सतत दिवा तेवत ठेवणे हे पुण्यप्रद मानले जाई.यासाठी काही विशेष दाने दिलेली अढळतात.

पितळखोरे लेणी या लेणीच्या मधील भागात ३५ स्तंभ असून  रंगात रंगवलेली बौद्ध भिक्षुकांची चित्रे आहेत.माझ्यामते हि चित्रे नंतरच्या काळातील असावीत.

चैत्य लेणे क्र.३ आणि विहार लेणे क्र. ४ यांच्या दर्शनीय भागात गन्धिक कुलातील मितदेव आणि पैठणच्या संघकपुत्र यांचे दानलेख आहेत. विहार लेणे क्र. ४ येथील गजथर(एका सरळ रेषेत उभे असलेल्या हत्तींचा समूह) चौथऱ्यावर दाखविलेला हा गजथर हा एक उत्तम शिल्पकलेचा नमुना आहे व असा गजथर हा आपल्या शिल्पकलेत एकमेवच बघायला मिळतो. हे हत्ती अलंकार युक्त असून त्यांच्या दोन्ही बाजूना घंटा लोंबताना दाखविल्या आहेत.हत्ती म्हणजे ऐश्वर्याचे प्रतिक,सोबत शक्तीचेही.या लेण्याचा संपुर्ण भार हा या हत्तींनी पेलला आहे असा याचा अर्थ आहे.या लेण्याच्या(क्रं४) प्रवेश द्वारावरील द्वारपाल अप्रतीम  आहेत.मात्र सर्वभक्षी कालाने या सुंदर द्वारावरील एक द्वारपालाची मुर्ती नष्ट झाली आहे.या द्वारावर सुंदर अर्धकमळ व त्रिरत्नांचे नक्षीकाम केलेले आहे.पुर्वी येथे द्वाराच्या वरच्या  बाजूचे एक शिल्प होते ते निखळून खाली पडले होते ते हल्ली मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्राहलयात आहे असे समजले.

या लेण्यांची हल्ली बर्यापैकी डागडूजी पुरातत्व विभागाकडून करण्यात आलेली आहे.OWEN C. KAIL यांच्या BUDDHIST CAVE TEMPLES OF INDIA   या पुस्तकातील पितळखोरे लेणी या लेणीची जुनी छायाचित्रे पाहिल्यास फारच वाईट अवस्थेत या लेणी होत्या.खुप ठिकाणी झालेली पडझड इतरस्त पसरलेले दगड,मातीचे साम्राज्य यातून निदान थोड्याफार प्रमाणात यातून या लेण्यांची सुटका झालेली आहे.

पितळखोरे लेणी तेथे असणारे पहारेकरी आपापल्या परीने ठिल्लार व वाचाळविरांना आवरण्याचे काम करताना अढळले हि देखील एक सुखद बाब आहे.नाहीतर आपल्याकडे भिंतींवर नावे कोरणार्या स्वयंघोषित प्रेमविरांची कमतरता नाहीच की…! सोबत विनाकारण अशा जुन्या वास्तूंची तोडफोड करणार्या बेजबाबदार पर्यटकांचीही कमी नाही.असो.

वरील माहीती अत्यंत थोड्या प्रमाणात आहे.संपुर्ण लेणी अभ्यासायची म्हटले तर प्रथम आपल्याला बौद्ध भिक्षुकांच्या व बौद्ध धर्माच्या खोलात जावे लागेल.त्यांचे आचार विचार विहार याचा खोलात जाऊन अभ्यास करावा लागेल.’चतुदिससंघ’, ‘उपोसथ विधी’, ‘प्रतीमोक्ष विद्या’ वगैरे संज्ञांचा अभ्यास करणे देखील गरजेचे आहे.

*चैत्यगृहांजवळ जी पाण्याची टाकी खोदली जातात त्यांना ‘पोढी’ ही संज्ञा आहे.

*चैत्य व विहार लेण्यांची व्यावस्था एक प्रमुख भिक्षूकडे असे त्याला ‘महास्वामी’ ही संज्ञा होती.

*भिक्षूंच्या राहण्याची, जेवणाची, औषध पाण्याची सोय व्हावी या करिता व्यापारी लोक व्यापारी पेढ्यांमध्ये कायम ठेवी ठेऊन करत असत.नाशिक येथील क्र. १० च्या लेण्यात याबाबत उल्लेख आहे.

या लेण्या, गडकिल्ले, प्राचीन मंदिरे यांचे निर्माण काही एका रात्रीत घडलेले नाही यांत कित्येक पिढ्या राबलेल्या आहेत.वर्षानुवर्षे छन्नी व हातोड्यांनी या मनमोहक कलाकृती साकारत आपल्या देशाच्या उदात्त संस्कृतिचा हा वारसा आपल्यासाठी आपल्या पुर्वजांनी तयार करुन ठेवलेला आहे.या कृत्यांमागे स्थानिक व केंद्रीय राजसत्तांचाही यात तेवढाच भरभक्कम सहभाग आहे.या धर्मकृत्यांसाठी लागणारा पैसा तो काही थोडाथिडका लागलेला नसणार यात शंकाच नाही यातून आपल्या मातीतील व जनमाणसांतील दानशूरता व धार्मिक सहिष्णूता या अंगच्या गुणांचा प्रकटपणा व्यक्त होताना आपल्याला दिसतो.लेणी हा असा प्रकार आहे जिथे चुकीला जरासुद्धा वाव नाही एखादे लेणे अगदी जरा जरी चुकले तरी ते लेणे तसेच सोडून जावे लागत असे,यातून पैशाचा, वेळेचा व श्रमाचा अपव्यय हे नुकसान काही थोडके नव्हते.किती प्रि प्लान व शांत चित्त व शांत डोक्याने राबलेल्या पाथरवट,कारागिर कलाकारांच्या एकाग्रतेचे दर्शन होते.

*अजिंठ्याच्या क्र. २६ च्या लेण्यात म्हटले आहे की,

“जो पर्यंत विहार चैत्यासारखे पुण्यकृत्य या जगात विद्यमान आहे तोपर्यंत ते करणारा मनुष्य स्वर्ग लोकात आनंदाने राहतो.म्हणून पर्वतांमध्ये यावद्च्चंद्रदिवाकरौ टिकणारी लेणी कोरवावी.”

कोठून आले हे लोक..? आपलेच तर होते येथीलच याच मातीतले…!

म्हणजे आपल्यापैकीच कुणाचे तरी पुर्वज.म्हणजे आम्ही तेव्हाही कमी नव्हतोच व आताही नाहीच फक्त पुढिल काळात परकीय सत्तांनी आपली मुस्कटदाबी केली हि मोठी शोकांतीका आहे व ती न भरुन येणारी ठसठसती जखम देखील आहे.पण,बरेच जण यांचे संवर्धन, संगोपन न करता.कुठे नाव कोरणे,चुन्याने नावे टाकणे, कुठे दगडच मारणे असे महाप्रताप करताना दिसतात.अशा सुंदर कलाकृती उभारणार्या हातांचा हा अपमान आहे पर्यायाने तो आपल्या उदात्त संस्कृतिचाही अपमान आहे याची काळजी आपण घ्यायला हवी.हळूहळू चित्र बदलत आहे सर्वसामान्यांचीही पाऊले आता या धर्मक्षेत्रांकडे वळू लागलेली आहेत.स्थानिक संघटनांच्या व पुरातत्व खात्याच्या सहभागाने लेण्या, गडकिल्ले यांचे संवर्धन होताना दिसते आहे ही देखील अत्यंत सुखद बाब आहे.

धन्यवाद..!

संदर्भ-
*सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास आणि कोरीव लेख
-वा. वि. मिराशी
*भारतीय मूर्तीशास्त्र-नि. पू. जोशी.
*सातवाहनकालीन महाराष्ट्र-वा. वी. मिराशी
*प्राचीन भारतीय कला-श्री. म. माटे
*भारतीय वास्तुशास्त्र-पू. र. कुलकर्णी
*सह्याद्री-स. आ. जोगळेकर

-नवनाथ आहेर

Leave a Comment