पिवळी जोगेश्वरी मंदिर, पुणे –
पंचमुखी मारुती मंदिराशेजारच्या रस्त्याने शिवाजी रस्त्याकडे जाताना उजव्या हाताला एका बोळात पिवळी जोगेश्वरी चे देऊळ आहे. मंदिर कोणी व कधी बांधले याची माहिती उपलब्ध नाही. अंदाजे १००-१२५ वर्षांपूर्वीचे हे मंदिर असावे. मंदिर खासगी असून श्रीकांत रंगनाथ महाजन यांच्या मालकीचे आहे. त्यांच्या पूर्वजापैकी गीताबाई महाजन यांच्या माहेरून मंदिराची मालकी महाजन कुटुंबीयांकडे आली. मंदिराचा गाभारा दगडी असून, समोर सभा-मंडप आहे.
गाभाऱ्यात देवी अष्टभुजा महिषासुरमर्दिनीच्या रूपात आहे. दोन फूट उंचीची ही मूर्ती संगमरवरी आहे. देवीच्या प्रत्येक हातात एक शस्त्र आहे. मूर्ती अतिशय सोज्वळ आणि अपार तेजाची आहे. मूर्ती कोठून आणली, कोणी आणली व कोठे घडविली गेली, याविषयी कोणतीच माहिती उपलब्ध नाही म्हणून ती स्वयंभू आहे असे म्हणतात. लोकमान्य टिळकांनी या मंदिराला ज्यावेळी भेट दिली, तेव्हा त्यांनीच या आदिमातेचे पिवळी जोगेश्वरी असे नामकरण केले.
नवरात्राच्या उत्सवात, देवीला रोज निरनिराळ्या वाहनांवर बसविले जाते. त्यामध्ये हंस, मोर, बाघ, कमळ, झोपाळा, घोडा, गरुड इ. चा समावेश असतो.
संदर्भ:
असे होते पुणे – म. श्री. दीक्षित
पुणे शहरातील मंदिरे – डॉ. शां. ग. महाजन
पत्ता :
https://goo.gl/maps/3nKMMn19699VJT9v9
आठवणी इतिहासाच्या