किल्ले मुरुड जंजिऱ्यावरील भग्न राजवाडे व इमारती…!!!
१६७१ च्या सुमारास महाराजांनी परत जंजिऱ्याची मोहीम हाती घेतली. जंजिरा फत्ते करणाऱ्यास त्यांनी एक मण सोन्याचे बक्षीस देण्याचे ठरवले होते. जंजिऱ्या हून तीन कोसांवर महाराजांचा तळ होता. त्याच रात्री दंड्याचा ठाण्यावरती छुपा हल्ला करण्यास सिद्दी कासीम तयारी करत होता (१० फेब्रुवारी १६७१) . हे ठाणे म्हणजे किनाऱ्या वरील किल्ला होता. मराठी फौज किल्ल्यात तैनात होती. सिद्दी कासीम समुद्रामार्गे तर सिद्दी खैर्यत जमिनी मार्गे असा दुतर्फा हल्ला करण्याची कासीम याची योजना होती. होळीचा सण असल्याने गस्तीच्या सैनिकां शिवाय किल्ल्यातली फौज बेसावध होती. कासिमच्या नावा किल्ल्याच्या तटाला लागताक्षणी खैर्यत ने किल्ल्यावर हल्ला चढवला. साहजिकच किल्ल्याची ताकद हा हमला थोपवण्या साठी गेली व त्यामुळे समुद्राच्या दिशेने होणाऱ्या हमल्या कडे दुर्लक्ष झाले. तटाला शिड्या लावून कासीमची फौज किल्ल्या वर आली आणि एकच कल्लोळ माजला. गस्तीच्या सैनिकांनी शिकस्त केली पण ताकद विभागली गेली होती. दरम्यान किल्ल्या वरील दारूगोळा कोठारात भयंकर स्फोट झाला. प्रचंड धूर उसळला. सगळे जणू ह्या स्फोटाच्या धक्क्याने स्तब्ध भारावले होते. ह्या अतीव शांततेत कासीमची ललकारी गुंजली. परत लढाईला तोंड फुटले, पण मराठ्यांच्या प्रत्युत्तरातली हवाच जणू निघून गेली होती. कासीम आणि खैर्यतची फौज भारी पडत होती, ह्या रणकंदनात मराठी फौजेचा धुव्वा उडाला आणि दंडा राजपुरी स्वराज्यातून परत सिद्दी कडे गेली.