महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,36,605

छत्रपती शिवाजी महाराज नावाच्या पोलादावर फुटली औरंगजेब नावाची काच !

By Discover Maharashtra Views: 2509 5 Min Read

छत्रपती शिवाजी महाराज नावाच्या पोलादावर फुटली औरंगजेब नावाची काच !

छत्रपती शिवाजी महाराज –

या जमिनीवर
या जमिनीवर असेल तेव्हा
प्रिय माझ्या त्या शककर्त्याचे
पडले पाउल
या भूमीच्या सुगंधसिंचित
धूलिकणांना
या भिंतीवर रुळझुळणार्यात
गर्भरेशमी आवरणांना
या मंचांतिल रत्नमण्यांच्या
चंचल गर्वोद्धत किरणांना
सह्याद्रीवर अवतरलेल्या
ऊर्जस्वल स्वातंत्र्य उषेची
इथे लागली
पहिली चाहुल.

याच ठिकाणी-

मावळखोर्यालमधले वादळ
इंद्रसीेवर या आदळले
कृष्णेचे बळ खडकांमधले
यमुनेच्या श्रीमंत तटावर
येथे वळले
इथे तमाच्या अधिराज्याला
तेजाचे बळ प्रथमच कळले.
येथ रुजाम्यावरी जरीच्या
असतिल कुजबुजल्या तलवारी
थरथरले शिरताच हिर्यांरचे
असतिल श्रवुनी ती ललकारी
संगमरवरी चिर्यां त झाले
असेल स्पंदन
शिवनेरीच्या वनराजाचे
होता दर्शन!

या स्तंभातुनि असेल घुमली
ती शिववाणी
या दगडांवर असेल थिजले
त्या शब्दांतिल अभिमानाचे
जळते पाणी
मखमाली गाद्यांवर सळसळ
संतापाची असेल उठली
माळ करांतिल या तख्तावर
असेल तुटली
काच बिलोरी ऐश्वर्याची
पोलादाच्या त्या तुकड्यावर
इथेंच फुटली.

-कुसुमाग्रज

(स्वगत, पृ. क्र दहा, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे)

आग्र्याच्या किल्ल्यात कुसुमाग्रज गेले असताना त्यांना ही कविता सुचली. वाचताना असे लक्षात येते की एखाद्या नाटकाच्या स्वगतासारखी ही कविता लिहीली गेली आहे. शब्दांची योजना, वाक्यांची रचना तशाच पल्लेदार पद्धतीनं केलेली आहे. एखादा नट आवेशात मंचावरून संवाद फेकतो आहे आणि अंधारात बसलेले हजारो प्रेक्षक प्राण कानात घेवून ते ऐकत आहेत. असेच वाटत राहते.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा मराठी माणसाला असलेला अभिमान या कवितेच्या शब्दांशब्दांत ओसंडून वाहतो आहे.  उत्तरेत मोगल कालखंडांतील प्रचंड मोठ्या नाजूक नक्षीकाम केलेल्या इमारती, त्यांच्यावरची बारीक कलाकुसर, लाल दगडात  पांढर्याल संगमरवरांत केलेली बांधकामे, त्यांची भव्यता पाहताना आपण हरखून जातो. परत महाराष्ट्रात येवून पाहतो तर महाराजांच्या आधीची वाकाटक राष्ट्रकुट चालूक्य यादवांच्या काळातील आणि महाराजांच्या नंतरच्या अहिल्याबाईंच्या काळातील काळ्या पाषाणांतील घडीव दगडी चिर्यांंमधील मंदिरे लेण्या किल्ले घाट बारवा आदिंचे अस्सल राकट सौंदर्य आपल्याला मोहवून टाकते.

या पार्श्वभूमीवर कुसुमाग्रजांची ही कविता आणि तिचे सौंदर्य उठून दिसते. मोडेन पण वाकणार नाही हा बाणा, काटक कणखर चिवट वृत्ती आणि सोबतच ‘भव्य हिमालय तुमचा आमचा केवळ माझा सह्यकडा, गौरी शंकर उभ्या जगाचे मनात पुजीन रायगडा’ ही बापटांनी वर्णन केलेली भावना मराठी माणसाच्या मनात असते.

या कवितेत शब्दकळेसोबतच मांडणीचेही वेगळेपण आहे. वृत्तांच्या बंधनांना जरासे मोकळे करत सुंदर यमकांचा अनुप्रासाचा वापर करत पण मुक्त रचना करण्याची ही एक वेगळीच शैली त्यांनी विकसित केली आहे. असा वापर  इंदिरा संतांनी पण त्यांच्या कवितेत केला आहे. अलिकडच्या काळात अनुराधा पाटील यांच्याही कवितांत असा मुक्त यमकांचा शैलीदार वापर आढळून येतो.

यमुना ही बारामाही वाहणारी मोठी नदी. तिचे विस्तीर्ण पात्र. त्याच्याशी तुलना करताना ‘कृष्णेचे जळ खडकांमधले’ अशी शब्दयोजना कुसुमाग्रज करतात. ही काही केवळ दोन नद्यांची तुलना नाही. ही दोन मानसिकतेमधील तुलना आहे.  इंद्रजीत भालेराव यांनी

बारोमास खळाळणार्याा बांधांमधुन
आम्ही उकललो नाही
केळीच्या गाभ्यासारखे
आम्ही वाढलो वर्षानुवर्षे
आवर्षणग्रस्त भागातील
झुडुपांसारखे.
पण खबरदार
आम्हाला खुरटे म्हणाल तर
आम्ही तुमच्यापेक्षा
जास्त उन्हाळे पावसाळे
पाहिले आहेत.

या कवितेत जे भाव व्यक्त केले आहेत ते याच ओळींशी मेळ खातात.

आग्र्याच्या दरबारात महाराज उभे असताना तिथली परिस्थिती काय असेल हे नोंदवताना तेंव्हाच्या आख्ख्या भारताचीच काय मानसिकता होती हे कुसुमाग्रज लिहून जातात.

कवितेचा शेवट करताना ‘काच बिलोरी एैश्वपर्याची पोलादाच्या त्या तुकड्यावर इथेच फुटली’ असं लिहीतानाही एक मोठेच तत्त्व साध्या वाटणार्यास शब्दांतून समोर येते. मोगल साम्राज्याला काचेची उपमा देताना त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी दगड भिरकावला असं लिहीलेलं नाही. दगड भिरकावणे ही केवळ तात्कालीक प्रतिक्रिया असते. (फँड्रि चित्रपटात असा दगड शेवटी उगारला गेला आहे.) पण पोलादाची उपमा देताना लोखंडाची ताकद, तेंव्हाच्या शस्त्रांमध्ये होणारा लोखंडाचा वापर (ढाल, तलवार, भाले) याचा विचार इथे केलेला आहे. महाराजांची ताकद ही शस्त्र वापरणारे सामन्य मावळे ही होती. हत्ती घोडे उंट तोफा ही महाराजांची ताकद नव्हती. दिमाखदार इमारती हे स्वराज्याचे भुषण नव्हते. तर उपयुक्त मजबुत भक्कम डोंगरी किल्ले म्हणजे स्वराज्याची ताकद होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या माघारी तब्बल 27 वर्षे जनता औरंगजेबाशी लढत होती. आजपर्यंतच्या इतिहासात सैन्य सैन्याशी लढले. पण छत्रपती शिवाजी हा असा एकमेव राजा आहे की त्याच्यासाठी सामान्य लोक लढले. नरहर कुरूंदकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नोंदवलेले हे वेगळेपण कुसुमाग्रजांच्या शब्दांतून कलात्मक रूप घेवून येते.

मध्ययुगील कालखंडात महाबलाढ्य मोगल साम्राज्याशी टक्कर देणारे छत्रपती शिवाजी महाराज केवळ मोजक्या शब्दांतून कुसुमाग्रज उभे करतात ही या कवितेची ताकद आहे.

श्रीकांत उमरीकर

Leave a Comment