शिवाजी महाराजांवर विदेशात प्रथमच टपाल तिकीटे !
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर बाहेरच्या कुणाला अगदी थोडक्यात माहिती करून द्यायची म्हटली तरीही कित्येक पाने पुरणार नाहीत. महाराष्ट्राला कित्येक शतकांनंतर महापराक्रमी, सिंहासनाधिष्ठीत, शककर्ता राजा लाभला तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपामध्ये ! अत्यंत धाडसी, पराक्रमी, न्यायी, निर्लोभी, प्रजाहितदक्ष, त्वरेने निर्णय घेणारा, पूर्णपणे धार्मिक वृत्तीचा पण त्याची राजकारणाशी सांगड न घालणारा असा हा राजा ! स्वतःचे आरमार, तोफा आणि दारुगोळा कारखाने, स्वतंत्र महसूल व्यवस्था, सांकेतिक गुप्त संदेशवहन, सक्षम हेरखाते, स्वतःचे किल्ले अशा असंख्य गोष्टी या राजियांनी, या महाराष्ट्रदेशी प्रथमच घडविल्या. अभिनव अशा गनिमी युद्धावर त्यांची कौशल्यपूर्ण हुकूमत होती. मोगल राजांसारखे स्वतः राजवाड्यात बसून, जोखमीच्या मोहिमांवर आपले सरदार आणि सैनिक पाठविणारे हे राजे नव्हते. शत्रू जितका अधिक घातकी, मोहीम जितकी अधिक जोखमीची, जिवावर बेतणारी, तितके शिवाजी राजे स्वतः सर्वात पुढे असायचे !!(शिवाजी महाराजांवर विदेशात प्रथमच टपाल तिकीटे)
यापूर्वी आपले भारतातील राजे शत्रूविरुद्ध धर्माने, नियमांनी युद्ध करीत. पण मोगलांसारख्या क्रूर, कपटी, विश्वासघातकी शत्रूविरुद्ध त्याच्याच भाषेत त्याला सज्जड उत्तर देणारा हा पहिलाच राजा ! अनेकदा तर शत्रूचा कुटील डाव सुरु होण्याआधीच, महाराज तो त्याच्यावरच उलटवून त्याला भयचकित पराभूत करीत असत.
पण महाराजांचे चरित्र, अफाट कर्तृत्व हे खऱ्या अर्थाने जगभर फारसे पोचले नाही. कांही देशांमधील त्यांची स्मारके, आख्यायिका यांची चर्चा होते. पण ती विश्वासार्ह नाहीत. खरेतर मोगल, पोर्तुगीज, ब्रिटिश आक्रमक हे कांही पराक्रमी वीर नक्कीच नाहीत. लूटमार, क्रूर अन्याय, सत्ता, पिळवणूक यासाठी त्यांची युद्धे होत असत. पण नेपोलियन, अलेक्झांडर यांच्याही आधी छत्रपतींचे नाव घ्यायला हवे असे त्यांचे कर्तृत्व होते, चारित्र्य होते.
अत्यंत आनंदाची गोष्ट अशी की यादृष्टीने एक पाऊल पुढे पडले आहे. छत्रपतींच्या जन्माला ३९० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ” साओ टोम अँड प्रिन्सीप ” या चिमुकल्या आफ्रिकन देशाच्या टपाल खात्याने एक विक्रम केला आहे. शिवजयंतीची मिरवणूक आणि शिवपुतळे यावर आधारित ४ टपाल तिकिटांचा एक संच ( sheetlet ) आणि रायगडावरील महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याचा एक Miniature Sheet त्यांनी २०२० मध्ये प्रसिद्ध केला आहे. या मालिकेसाठी अगदी अलीकडची छायाचित्रे वापरली गेलेली दिसतात. ४ तिकिटांच्या संचाच्या शीटवर शिवजयंतीच्या मिरवणुकीतील क्षणचित्रे पाहायला मिळतात. महाराजांच्या पुतळ्याच्या ३ चित्रांसोबत एका ढोलवादक तरुणीचे चित्र पाहायला मिळते. सर्वात वरती चक्क महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( पण चष्मा नसलेले ) शिवरायांना अभिवादन करतांना पाहायला मिळतात. तर एका तिकिटाच्या Miniature Sheet वर महाराजांच्या वेशभूषेत एका बालकाचे चित्र पाहायला मिळते. या तिकिटांवर महाराजांचा जन्म १६२७ असा नोंदला आहे. प्रत्यक्षात १६३० चा जन्म म्हणून ३९० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तिकिटे जारी करण्यात आली आहेत. ही चूक विकिपीडियामध्ये त्यांची २ वेगळी जन्मवर्षे दिल्याने झाली असावी.पण टपाल तिकिटांचे वैशिष्ठ्य असे की त्यात जर काही चूक झाली असेल तर ती तिकिटे अत्यंत बहुमोल ठरतात.
साओ टोम अँड प्रिन्सीप हा मध्य आफ्रिकेच्या गिनीच्या आखातातील, बेटसमूहांचा एक चिमुकला देश आहे. पोर्तुंगीज भाषा बोलणारा हा जगातील सर्वात छोटा देश आहे. याच्या टपाल तिकिटांवर या देशाचे ” São Tomé e Príncipe ” असे नाव लिहिलेले असते. डोबरा हे येथील चलन असून त्याचे Db असे लघुरूप आहे. जगातील कित्येक देशांमधील टपाल खाती, विविध विषयांवर अत्यंत कल्पक तिकिटे प्रसृत करून महसूल मिळवीत असतात. हा एक विशेष सन्मानही मनाला जातो. त्यांचे विषय, व्यक्ती यांचा त्या देशांशी कांही संबंध असतो असे नाही. पण त्यावर संग्राहकांच्या
उड्या पडतात. अल्पावधीत अशी तिकिटे दुर्मीळ होतात, बहुमोल ठरतात. कांही ठिकाणी खासगी कंपन्यांना हे कंत्राट दिले जाते. तर कांहींना Universal Postal Union या जागतिक संस्थेची मान्यता नसते.
या आधी झांशीची राणी, नानासाहेब पेशवे या योद्ध्यांवर विदेशांनी टपाल तिकिटे प्रसारित केलेली आहेत. पण संपूर्ण देशभरातील आक्रमकांना यशस्वी आव्हान देऊन, भारतीयांना स्फूर्ती देणाऱ्या शिवाजी महाराजांवर आजपर्यंत
जगातील एकाही देशाने टपाल तिकिटे प्रसारित केलेली नव्हती. आता ती कसर भरून निघाली असून यापुढे जगभरातील अनेक देशांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर टपाल तिकिटे प्रसृत केली जावोत अशी इच्छा व्यक्त करू या. आपले पोस्ट खाते आणि दुसऱ्या देशातील पोस्ट खाते यांच्या एकत्रित सहभागाने,अनेकदा तिकिटांचा Joint Issue काढतात. एकच व्यक्ती, संस्था, विषय यांवर एकाच चित्राची तिकिटे दोन्हीही देश एकाच वेळी प्रसारित होतात. त्यामध्ये आपण शिवाजी महाराजांच्या नावाचा आग्रह धरला पाहिजे.
( हा लेख आणि छायाचित्रे शेअर केल्यास कृपया माझ्या नावासह शेअर करावीत )
मकरंद करंदीकर.