प्रतापगडाचे मंत्रयुद्ध –
सर्वप्रथम प्रसिद्ध सिने अभिनेते आणि ज्येष्ठ इतिहास अभ्यासक, व्याख्याते राहुल दादा सोलापूरकर यांचे मनापासून आभार मानतो की ज्यांनी सर्वप्रथम मंत्रयुद्ध म्हणजे काय हे सांगितले अन प्रतापगडाचे युद्ध एका वेगळ्या नजरेतून अनुभवायला मिळाले. तेव्हापासूनच या विषयावर सखोल अभ्यास करण्याची इच्छा झाली अन राहुल दादा यांच्या वर्णनाचा आधार, तसेच ऐतिहासिक संदर्भ, अनेक कादंबऱ्या तसेच तत्कालीन सलातीन यांचा आधार घेऊन प्रतापगडाचे मंत्रयुद्ध हा लेख लिहण्यापर्यंत पोचलो.
सर्वप्रथम मंत्रयुद्ध म्हणजे काय??? “कपटी अन धूर्त शत्रूला चर्चा अन वादविवाद करून वश करणे अन त्याची कुटनीती शत्रूवरच उलटवणे.” या सगळ्या गोष्टी सविस्तरपणे खाली दिल्याच आहेत.
जावळी, एक दुर्गम अन बेलाग प्रदेश, घनदाट जंगल अन डोंगर दऱ्या. शिवरायांच्या आयुष्यातील भौगोलिक आणि राजकीयदृष्टय़ाही एक अत्यंत महत्त्वाचे ठिकाण. एका बाजूला सह्याद्री तर दुसऱ्या बाजूला महाबळेश्वरचा डोंगर अशा खाचेत वसलेला असा हा जावळीचा प्रदेश. कृष्णाजी बाजीच्या ‘चंद्रराव’ पदाला पाठिंबा देऊन राजांनी १६४७ मध्ये जावळीच्या राजकारणात प्रवेश केला होता. राजांच्या राज्यविस्ताराची लालसा जाणून अली आदिलशाहाने वाईवर १६४९ ला अफझलखानाची वाईचा सुभेदार म्हणून नेमणूक केली होती. त्यानंतर अनेक राजकारणे होऊन आदिलशाहाने १६५५ मध्ये अफझलखानाला वाईतून बोलावून कर्नाटकच्या मोहिमेवर पाठवले. पुढे १६५६ च्या आसपास कृष्णाजी ऊर्फ चंद्रराव मोरे राजांचे उपकार विसरला. राजांच्या मुलखात मस्ती करू लागला. राजांनी समजावण्याचा केलेला प्रयत्न व्यर्थ ठरला. १५ जानेवारी १६५६, शालिवाहन शके १५७७, पौष ला राजांनी जावळीवर स्वारी करून हा नैसर्गिक व आर्थिकदृष्टय़ा समृद्ध प्रदेश राज्याला जोडला. पुढे फितुरी करणाऱ्या चंद्ररावाला ऑगस्ट महिन्यात ठार केले आणि खऱ्या अर्थाने जावळी स्वराज्यात आली.
शिवाजी महाराज आता एक एक किल्ला जिंकून आपले राज्य वाढवत होते. पुढे शके १५८० च्या अश्विनात राजे कर्नाटकाकडे कूच करत होते. हळू हळू हि वार्ता विजापूरच्या दरबारात कळू लागली. बादशाहने शहाजी राजेना पत्र लिहून शिवाजी राजांना रोखण्यास सांगितले. पण त्याचा काही फारसा उपयोग झाला नाही. तेंव्हा शिवाजी राजांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे विजापूरच्या इभ्रतीस काळिमा होता. अन अली आदिलशहाची आई बडी बेगम संतापली. आणि तिने व अली आदिलशहाने यासाठी दरबार बोलावण्याचा निर्णय घेतला.
आणि त्याबाबतची आदिलशहाच्या सही शिक्क्यांची फर्मान सुटली. सर्व सरदार विशिष्ट हिजरी सनावळीला विजापूर दरबारी एकत्र आले. आता ज्यावेळी दरबार भरवण्यासाठी फर्मान पाठवले जाते, त्यावेळी त्यात दरबार भरवण्याचे कारण नमूद केलेले असते, पण यावेळी मात्र त्या फर्मानात एकत्र येण्याच्या कारणाचा उल्लेख नव्हता. जमलेले सर्व सरदार आश्चर्यचकित झाले. त्यांना नक्की दरबार भरवण्याचे प्रयोजन समजेना. हा दरबार साधारणतः १६५७ ते १६५८ दरम्यान भरला असावा.
तत्पूर्वी १६४६ ते १६५७ या ११ वर्षाच्या काळात शिवरायांनी स्वराज्याचा विस्तार बऱ्यापैकी केला होता. त्यावेळी स्वराज्यात तळकोकणातील ३००० ताली, २४ बंदरे, २१ किल्ले होते. किल्ल्यांची संख्या अजुन जास्त असती पण १६५४ ला अफझलखानाने शहाजीराजांना अटक केली, आणि त्यांच्या सुटकेसाठी शिवरायांनी आदिलशाहीला ८ किल्ले सोडले. आणि चाकण, पुणे व सुपे या प्रांतात स्वराज्याचा बऱ्यापैकी विस्तार केला.
त्या काळात म्हणजे १६५७ साली, आदिलशाही ही तत्कालीन स्वराज्याच्या जवळपास २१ पट होती. अन मुघलसाम्राज्य हे विजारपूरच्या आदिलशाहीच्या जवळपास ३३ पट होते, म्हणजेच हिंदुस्थानच्या दोन तृतीयांश एवढा भाग मुघलांच्या अधिपत्याखाली होता. यावरुन आपल्याला मुघल सामर्थ्याची कल्पना येईल.
आणि इकडे विजापूरला दरबार भरला, आदिलशहाचे आगमन दरबारात झाले, व अल्काब च्या आरोळ्या देण्यात आल्या. त्यावेळी दरबारात अनेक मातब्बर सरदार हजर होते जसे की रणदुल्ला खान, मुस्तफा खान, मुसेखान, अंकुश खान, पैलवान खान. तसेच काही मराठा सरदार मंबाजी भोसले म्हणजे शिवरायांचे चुलत बंध हे त्यावेळी दरबारी उपस्थित होते. शिवरायांचे मेहुणे फलटणचे बजाजी नाईक निंबाळकर हे दरबारात उपस्थित नव्हते. अन दरबार भरला, कोणत्याही सरदाराला दरबाराचे प्रयोजन ठाऊक नव्हते. नुसती कुजबुज चालू होती सगळीकडे. बडी बेगम ही आदिलशहाच्या डाव्या बाजूला बसली होती. आणि त्यात मागे एका तबकात एक विडा ठेवला, तो सर्वांना दिसला अन मग सरदारांना कळले की कोणतीतरी मोहीम असावी.
बडी बेगम साहिबा संतापून बोलली, “हमने ये दरबार क्यू बुलाया है जानकारी है किसीको?” सर्वांनी नकारार्थी माना डोलवल्या, “उस नाचीज सीवा को गिरफतार करना है, जिंदा या मुर्दा. है ऐसा कोई मर्द सरदार जो इस मूहिम को फतेह कर सके?” अन सगळा दरबार एकदम शांत झाला. सगळे सरदार घाबरले, कारण सर्वजण शिवरायांकडून कधी न कधी पराभूत झाले होते. सर्व आदिलशाही सरदारांचा असा समज होता की शिवाजी म्हणजे भूत. कधी येतो, कुठून येतो, मारतो, कुठे जातो, कोणालाही ठाऊक नव्हते. कोणीही त्यांना पाहिले नव्हते. शिवाजी म्हणजे एक अदृश्य माणूस अशी नोंद तत्कालीन सलातीन मध्ये आढळते. अन या सर्व कारणांमुळे कोणीही विडा उचलायला तयार होईना. बडी बेगम खवळली.
तेवढ्यात मागच्या रांगेतून एक सरदार उठला, अंगाने धिप्पाड, साडेसहा फूट उंच, जणू काही हत्तीचं. त्याच नाव होतं, खान ए मोहम्मद अफजलखान. तो पूढे चालू लागला अन चालताना त्याच्या जडावांचा कररर कररर असा आवाज येऊ लागला. सगळीकडे एकच कुजबुज सुरू झाली, अफझलखान, अफझलखान…. खानाने विडा उचलला, कानाला खोचला. आणि त्याने शपथ घेतली. खान म्हणाला “ये सिवा सिवा क्या लगा रखा है. कोण है ये सिवा, पहाड का चुहा.” सगळा दरबार खुश झाला, बडी बेगम खुश झाली. अन तेव्हा खानाला त्या दरबारात खिल्लत दिल्याची नोंद आहे, अन सोबतच आदिलशहाची रत्नजडित कट्यार अन एक लुगडं. लुगडं म्हणजे आपल्याकडे असत ते नाही, लुगडं हा पर्शियन भाषेतील शब्द आहे, सत्कार करताना आपण शाल वगैरे देतो ना त्याप्रकारे एक तलम रेशमी वस्त्र असते त्याला तिकडे लुगडं म्हणतात.
अन खानाने मोहिमेची तयारी चालू केली. त्यावेळी साधारणतः मार्च १६५९ चा काळ होता. खानाने सैन्याची जमवाजमव केली. तोफा, घोडदळ, पायदळ, सांडनीस्वार अशी एकूण ७७००० ची फौज खानाकडे होती. त्यानंतर सात दिवसांनी खान विजापुरातून बाहेर पडला. खानाचा पहिला मुक्काम विजापूर वेशीवर पडला. तेव्हा खान युद्धाचे डावपेच आखत होता. अन तेवढ्यात त्याला एक खबर मिळाली की त्याचा निशाणाचा फत्तेलष्कर नावाचा हत्ती मरण पावला. खानाला जबर धक्का बसला. अपशकुन झाला. त्यात खानाचा गुरु, काझी त्याला बोलला माझ्या स्वप्नात दोन दिवस झालं तुझं मुंडक नसलेलं धड येतंय, तू मोहिमेवर जाऊ नये, तुला धोका आहे. खान रागावला अन खानाने काझीला मारले. खान अशा गोष्टी मानत नव्हताच मुळी.
पराक्रमी खान.
त्यावेळी दिल्लीचा बादशहा शाहजहान होता, अन त्याचा शहजादा औरंगजेब हा कर्नाटक, बिदर येथे खानसोबत लढत होता. अफजलखानाने मुघल सैन्याची एवढी बेक्कार कोंडी केली की मुघल शहजादा औरंगजेब ला जवळपास कैद केले. पण औरंगजेबाने रात्री विजापुरी वजीराला घाबरवलं, त्याला पत्र लिहल, अन वजीराने रात्रीचं त्याला सोडून दिल, ही गोष्ट जेव्हा खानाला समजली तेव्हा खानाच्या लोकांनी विजापुरी त्या वजीराचे बत्तीस तुकडे केले.
हाच खान पुढे शिवरायांचे ज्येष्ठ बंधू संभाजीराजे यांच्या मृत्यस कारणीभूत ठरला, कर्नाटक मध्ये संभाजीराजे आदिलशहकडून लढत असताना त्यांना कुमक कमी पडली, आदिलशहाने खानाला कुमक घेऊन जाण्यास सांगितले पण खान गेला नाही, अन त्यामुळे संभाजीराजे पडले.
एकदा रणदुल्ला खान अन कस्तुरीरंगन राजाचे तुंबळ युद्ध सुरू होते. दोन्ही बाजूंचे अतोनात नुकसान झाले होते अन शेवटी त्यांच्यात तह करायचा ठरला. रणदुल्ला खानाकडून अफजलखान तहाला बसला. अन कपटाने खानाने कस्तुरीरंगन चे मुंडके तलवारीने उडवले व बाहेर नेऊन सैन्याला दाखवले अन सैन्य शरण आले. असा हा खान महाकपटी अन कावेबाज होता. त्याची खूपच दहशत होती. त्यामुळे खानाला भयंकर अहंकार होता. त्यामुळे त्याने स्वतःचाच एक वेगळा शिक्का तयार करवून घेतला होता.
त्याने शिक्क्यावर लिहिले होते –
गर्र अर्ज कुनद सिपहर अअला, फजल फुजला व फजल अफजल। अझ हर मुल्की बजाए तसबीह आवाझ आयद अफजल अफजल।।। म्हणजेच उच्च स्वर्गाला उत्तम माणसांची उत्तमता आणि अफझलखानाची उत्तमता यांची तुलना करून दाखवण्याची इच्छा झाली तर प्रत्येक ठिकाणाहून जपमाळेतील (नामाच्या) आवाजाऐवजी अफझल अफझल असे शब्द येतील.
त्यामुळे आदिलशहाने स्वतःचा हत्ती खानाकडे पाठवला जेणेकरून खान ठरलेल्या गोष्टीत बदल करणार नाही. त्यावेळी साधारणपणे मार्च चा तिसरा आठवडा सुरू होता. एक ते दीड महिन्यात ही मोहीम संपवून पावसाळ्याच्या अगोदर पून्हा विजापुरी यायचं अस नियोजन खानाने केलं. खानाने विचार केला की शिवरायांना उघड्या मैदानात आणलं तर त्यांना पकडणं, मारणे सोपे होईल. म्हणून त्याने जालीम उपाय शोधला की हिंदू धर्माची अस्मिता असलेली देवळे फोडायची, म्हणजे शिवाजी संतापून आपल्यावर चालून येईल व आपण त्याला पकडू. त्यावेळी महाराज हे पोर्तुगीजांसोबत गोव्याच्या सीमेवर लढत होते, त्यांना याची कल्पना नव्हती.
अन खानाने सर्वप्रथम तुळजापूर ला जायचं ठरवलं. खान सात दिवसात तुळजापूरला पोचला, येताना वाटेत दिसेल ते मंदिर त्याने फोडले, गावे जाळली, दहशत पसरवत खान तुळजापूर ला आला. आणि त्या तुळजा भवानी च्या मूर्तीसमोर उभा राहून खान म्हणतो कसा, “ए भवानी, बताओ तुम्हारी करामत, या हम हमारी करामत बताये.” अन खानाने हातोड्याने ती भवानीची मूर्ती फोडली.
महाराज राजगडी आले होते, त्यांना ही खबर मिळाली. अन हे ऐकताच राजांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. राजे संतापले. राजांना वाटले की लगोलग खानावर चालून जावे. पण राजे सावरले. त्यांनी संयम ठेवला. अत्याधिक जोश हा घात करू शकतो. त्यामुळे राजे सावरले. इकडे राजगड चिंतेत पडला. इकडे खान जवळपास ६ दिवस तुळजापुरात राजांची वाट पाहत होता, पण राजे काय आले नाहीत. मग खान पंढरपुरी रवाना झाला.
तोपर्यंत महाराजांनी शांतपणे विचार करून निर्णय घेतला तो म्हणजे खानासोबत लढायचं, पण ते वेगळ्या पद्धतीने. आता लढायचं मंत्रयुद्धाने.
आणि मंत्रयुद्धाचा पहिला भाग चालू झाला.
महाराजांना ठाऊक होते की खान पंढरपूरला जाणार, म्हणूनच की काय महाराजांनी आपले मावळे रात्रीचे पंढरपूरला पाठवले, बडव्यांच्या दिंडीत. त्यांनी रातोरात विठ्ठलाची मूर्ती तेथून हलवली, मंदिर ते कृष्णदेवराय बडवे यांच्या घरापर्यंत एक भुयार खोदल, मूर्ती त्यास भुयारातुन बडव्यांच्या घरी नेली अन ते भुयार लिंपले. याचा पुरावा म्हणजे वारीला गेल्यावर मंदिराच्या महाद्वाराच्या डाव्या बाजूला नामदेव पायरी आहे, तिथून डाव्या हाताला तिसरं घर हे बडव्यांच आहे. तिथे आत गेल्यावर एक मोठी जाळी आहे, तिथं कोणालाही विचारलं तरी सांगतात इथून सरळ रस्ता विठ्ठलाच्या मूर्तीपर्यंत जातो. खान पंढरपूरला आला, तो तडक मंदिरात आला. त्याने आत जाऊन चौथऱ्याकडे पाहिलं तर चौथरा रिकामा. खान भयंकर खुश झाला. “भगवान भी हमसे डरके भाग गया.” अन त्यावेळी खानाने त्या मंदिरात ११२ गाईंची कत्तल केली, त्या गाईंच्या रक्ताच्या चिखलात खान नाचला. ही वार्ता ऐकून लोक घाबरले.
प्रजा घाबरलेली असेल तर युद्ध जिंकणं अवघड. म्हणून राजांनी ठरवलं, प्रजेची मानसिकता बदलायची. अन येथे सुरू होतो मंत्रयुद्धाचा दुसरा भाग.
मंदिरात रक्ताचा चिखल साचला होता. अन त्यादिवशी पहाटे पहाटे एक साधू काळी कपडे घालून त्या मंदिरात आला अन त्या सभामंडपाची सफाई करायला सुरुवात केली. आजूबाजूच्या लोकांना ही खबर लागताच घाबरत घाबरत दोन चार लोक मंदिरात आले अन त्यांनी मिळून ते मंदिर पुन्हा स्वच्छ केले. लोकांनी साधूला विचारले आपण कोण, इकडे कसे आलात, त्यावर तो साधू उत्तरला, “मै बहुत दूर से हिमालय से आया हु. मेरे सपने मे एक काली मुरत आई थी जो कमर पर हात टेक कर खडी थी, उसने मुझसे कहा की माझ्याकडे ये, मी राहतो ती जागा खराब झाली आहे, ती स्वच्छ कर, मला पुन्हा यायचंय. मै ऐसें ही यहा से गुजर रहा था, मैने ये मंदिर देखा, मुझे लगा यही होगी वो जगह, और मैने साफ करना चालू किया.” तेव्हा तेथील लोक बोलली की अरे आमचा विठ्ठल तुझ्या स्वप्नात आलेला, म्हणजे विठ्ठल घाबरला नाही, आपला देव परत येणार. आणि लोकांच्या मनावर थोडा सकारात्मक परिणाम झाला. त्यानंतर दोन दिवस त्या साधूने त्या मंदिरात हिंदीमध्ये प्रवचन केले अन साधू निघून गेला. तिसऱ्या दिवशी सकाळी मूर्ती परत जागेवर आली म्हणजेच मावळ्यांनी ती पुन्हा मंदिरात आणून बसवली. बघता बघता ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली आणि लोकांच्या मनात पून्हा एकदा विश्वास निर्माण झाला की देव अजूनही शिवाजी राजांसोबत आहे. आणि अशाप्रकारे शिवरायांनी लोकांची मानसिकता बदलली. आता तो साधू कोण होता, तर तो साधू म्हणजे स्वराज्याच्या हेरखात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक. त्यांनी प्रजा पुन्हा एकदा राजांसोबत आणून आपल काम चोखपणे पार पाडल.
इकडे खान पंढरपूरहून साताऱ्यामार्गे माणकेश्वर ला निघाला. अन खानाने वेगळा विचार केला. २५ दिवस झाले तरी शिवाजी शरण येत नाही हे बघून खानाने शिवरायांचे मेहुणे फलटणचे बजाजी नाईक निंबाळकर यांनाच अटक केलं. कारण बजाजींना ठार करण्याची धमकी देऊन राजांना शरण बोलवायचं असा खानाने मनसुबा आखला. जेव्हा ही गोष्ट राजांना समजली तेव्हा राजे खूप चिंतेत पडले. कारण बजाजी हे महाराणी सईबाईंचे सख्खे बंधू . अन त्यात सईबाईंची प्रकृती ही खूपच खालावलेली होती, अन अशात जर त्यांना ही खबर कळली तर त्यांची प्रकृती अजूनच बिघडेल. राजे चिंतेत होते. इकडे खानाच्या फौजेत नाईकजी पांढरे नावाचे एक ज्येष्ठ मराठा सरदार होते. शिवरायांनी त्यांना खाजगीत एक पत्र लिहले, पत्र असे की ” नाईकजी तुम्ही खानाला असे समजवा की जर खानाने बजाजींना ठार केले तर बाकीचे मराठा सरदार फुटण्याचा धोका आहे. अन कितीही चाकरी केली तरी आदिलशाही दरबारी त्याची किंमत नाही.” पांढरेनी खानाला हे समजावून सांगितले, खानालाही पटले अन एक करार करून खानाने बाजाजींची सुटका केली
आता पावसाळा जवळ येत चालला होता, शिवरायांच्या मनासारख्या गोष्टी घडत होत्या. मधल्या काळात औरंगजेब ने कपटाने आपल्या बापाला विष देऊन मारले अन भाऊ दाराशीकोह ची सुद्धा हत्या केली व स्वतःला बादशहा म्हणून घोषित केले. अन त्याने आपला मामा शाहिस्तेखान याला साडेतीन लाख फौजेसह दक्षिणेत पाठवलं. राजांनी लगेच आपला वकील शाहिस्तेखानाकडे वस्त्र घेऊन पाठवला अन त्यामुळे सुरुवातीला खान शांत बसला व लाल महालात त्याने ठाण मांडले. इकडे शिवरायांचा वकील शाहिस्तेखान कडे गेला हे अफजलखानाला समजले अन खान घाबरला. त्याने विचार केला की जर मुघल अन मराठे एकत्र आले तर आदिलशाहीची खैर नाही. आणि अफजलखान रहिमतपूर मार्गे वाईला आला. तोपर्यंत पावसाळा सुरू झाला होता. अन वाईचा मुलुख खानाला चांगला परिचयाचा होता. खान वाईचा सुभेदार म्हणून बरीच वर्षे होता. आणि दोन्ही बाजुंनी स्थिरयुद्ध चालू झाले. स्थिरयुद्ध म्हणजे दोन्ही पक्षांनी आपापल्या बाजूनी फक्त मनसुबे रचायचे. वाईमध्ये खान कुठे होता हे नक्की ठाऊक नाही पण खान वाईच्या औरंगपुऱ्यात वास्तव्यास असावा असा अंदाज. त्यावेळी जावळीच्या त्या घनदाट जंगलात तुफान पाऊस पडायचा.
इकडे राजगडावर ५ सप्टेंबर १६५९ ला स्वराज्याच्या महाराणी सईबाईसाहेबांचे निधन झाले. शिवरायांसाठी हा खूप मोठा धक्का होता, कारण शंभूराजे जेमतेम सव्वादोन वर्षांचे होते, सईबाईंचे दुःख अन त्यात हा राक्षस स्वराज्यावर चालून आला. महाराजांनी तातडीने सदर बोलावली. त्यावेळी सदरेवर बहिर्जी, नेताजी, मोरोपंत पिंगळे इत्यादी मातब्बर आसामी होत्या. महाराजांनी सर्वांना विचारले काय करावे. आमच्या मनात एक कल्पना आहे की खानाला भोरप्याच्या डोंगरावर बोलवावे. भोरप्याचा डोंगर हा १६५६ साली राजांनी चंद्रराव मोरेकडून जिंकला व मोरोपंतांनी त्या डोंगरावर प्रतापगड साकारला. प्रतापगड हा अत्यंत दुर्गम व सुंदर होता. दोन पसरलेल्या सोंडा, रेडका बुरुज, राजपहारा बुरुज, केदार बुरुज तसेच अब्दुल्ला बुरुज. त्यावेळी गडावर भवानी मातेचे मंदिर नव्हते, भवानी मातेचे मंदिर महाराजांनी १६६१ साली बांधले असावे. आज जर आपण कधी प्रतापगडावर गेलो तर आता जिथे मंदिर आहे त्या मंदिराच्या पाठीमागे एक तुटलेला चौकोन म्हणजे एक चौथरा आहे. त्याला ना दार ना खिडकी. तसेच गडावर दोन सुंदर तळी होती. राजांनी ठरवलं खानाशी मुकाबला प्रतापगडावरच करायचा. कारण सावित्री नदीचे घनदाट खोरे, जावळीचे घनदाट जंगल, आताच एवढे घनदाट आहे तर साडेतीनशे वर्षांपूर्वी कसलं असेल. त्या जावळीच्या जंगलबद्दल पूर्वी म्हणायचे की एकवेळ अस्वलाच्या केसातील उ सापडेल परंतु जावळीच्या जंगलात हरवलेला एखादा हत्ती सुद्धा १० दिवस तरी सापडणार नाही, एवढं घनदाट जंगल होत.
बघता बघता दिवाळी तोंडावर आलेली. इकडे खानाने आपला वकील कृष्णाजी भास्कर कुळकर्णी याला राजगडी पाठवले. कृष्णाजी भास्कर हा मूळचा भोरचा हवालदार होता. वकील कसा असावा तर सभ्य लबाड, तसाच होता कृष्णाजी भास्कर कुळकर्णी. अन खानाने त्याला पत्र घेऊन राजगडी पाठवले. वकील राजगडी आला.
आणि महाराज इथे मंत्रयुद्धाचा सगळ्यात महत्वाचा भाग खेळले.
कृष्णाजी भास्कर राजगडी राजांची भेट घ्यायला आला पण राजे भेटच देईनात. त्याने मोरोपंत पिंगळे याना विचारलं काय भानगड, तेव्हा पंत बोलले, “खान आला हे ऐकून महाराजांनी भयंकर धसका घेतलाय, ते खूप आजारी पडलेत, जाम घाबरलेत, अशक्तपणा आलाय त्यांना, त्यांनी अन्नपाणी सोडलंय हो. काल तर चक्कर येऊन पडले, ताप सुद्धा खूप भरलाय.” कृष्णाजी दोन दिवस राजगडावर होता पण महाराज काय त्याला भेटले नाहीत. गडावर सारखी धावपळ सुरू होती, राजांच्या महालाकडे सारखा लोकांचा अन राजवैद्यांचा राबता सुरू होता. आणि तिसऱ्या दिवशी राजे कृष्णाजी ला भेटले, ते ही अंगावर जाड कांबळ घेऊन, तिघा चौघांनी राजांना धरलं होत. कृष्णाजी ने राजांना खानाच पत्र दिल. ते पत्र उघडताच त्यात “बेमुरर्वत, दगाबाज, धोकेबाज, गलती की है सिवा तुने, शरण आ” अशा शिव्याच जणू खानाने दिल्या होत्या. कृष्णाजी ने राजांना पत्राचे उत्तर विचारले, राजे बोलले आम्ही आमचा वकीक पाठवू. पण कृष्णाजी भास्कर ची जवळपास खात्री पटली की राजे भयंकर घाबरलेत. अन हा डाव राजांच्या मनाप्रमाणे पडला. इकडे कृष्णाजी भास्कर वाईला आला, अन शिवरायांची ही अशी अवस्था पाहून त्याला अतिआत्मविश्वास झाला असावा. तो खानाला बोलला की शिवाजी राजे तर भयंकर घाबरलेत, आपण एवढी रणनीती अशा घाबरट माणसासाठी का आखतोय. पण खानाला विश्वास वाटला नाही.
इकडे राजगडावर महाराजांनी सदर बोलावली आपला वकील निवडण्यासाठी. त्यावेळी राजांकडे तीन वकील असावेत असा अंदाज आहे. नारायण शेणवी, सप्रे अन क्षीरसागर. या तिघांना सगळ्या भाषा यायच्या. परंतु राजांनी यातील कोणालाच वकील म्हणून खानाकडे पाठवले नाही. राजांनी वकील म्हणून निवड केली ती पंताजी गोपीनाथ बोकील. खूप अनुभवी माणूस. पंताजी हे मूळचे कारीचे. पण त्यांचे पूर्वज सिंदखेडराजा येथे स्थायिक झाले. पंताजी बोकील हे चौरस नावाच्या सोंगट्याच्या खेळात खूप हुशार होते. अन अशा माणसाची निवड राजांनी या मोहिमेपुरती वकील म्हणून केली.
आणि पंताजी राजांचा निरोप घेऊन वाईस आले. त्या पत्रात अस लिहल होत की “आम्ही अपराधी आहोत, आम्ही माफी मागतो, आम्ही बगावत केली, आमचे सगळे गुन्हे आम्हाला मान्य आहेत. आम्ही तुम्हाला खूप घाबरून आहोत. आपण आमच्या थोरल्या महाराज साहेबांचे दोस्त, म्हणजे आपण आम्हास चाचासमान आहात. आपण येऊन आम्हाला विजापुरी घेऊन जावं.” खान पंतांना बोलला की आम्ही यावर विचार करू. अन हा निरोप घेऊन पंताजी काका पुन्हा राजगडी आले.
त्यावेळी साधारणतः ऑक्टोबर चा दुसरा आठवडा सुरू होता. इकडे भोरच्या जवळील कारी येथे शहाजीराजांचे मित्र अन स्वराज्याचे मातब्बर सरदार कान्होजी जेधे नाईक होते. त्यांनाही आदिलशहाच फर्मान मिळालेलं. कारी येथे जेधेंचा पाच एकरांचा प्रशस्त वाडा होता. नाईकांनी आपली पाचही मुलांना सोबत घेतलं अन राजगडच्या खोऱ्यात शिवदडी येथे ते महाराजांच्या भेटीस आले, त्यांनी राजांना फर्मान दाखवलं. राजे बोलले “कान्होजी काका तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलात. चंद्रराव मोरे गेले, खंडोजी खोपडे गेले, तुम्हीही जावं खानाकडे, वतन मिळेल.” अन राजांचे हे करारी शब्द कान्होजींच्या काळजाला लागले. मागेच ओसरीवर ठेवलेला पाण्याचा तांब्या त्यांनी हातात घेतला, अंगठ्यावर तो रिकामा केला व सगळं पाणी आपल्या पाचही मुलांवर शिंपडल. अन कान्होजी कडाडले, ” राज वतनाची गुडी न्हाई अमास्नी, रक्तात हरामखोरी न्हाई आमच्या. एकदा सबुद दिला की मागे हटणारी जात न्हाई या म्हाताऱ्याची. परीक्षा बघतोस व्हय र पोरा ह्या म्हाताऱ्याची.” अन असे म्हणताच राजांनी कान्होजींना कडकडून मिठी मारली. कान्होजी जेधे हे शहाजीराजांचा उजवा हात होते. बारा मावळांत त्यांचा शब्द मोडायची कोणाच्यात हिंमत नव्हती. अन राजांनी त्यांना जबाबदारी दिली की मावळातील सर्व मराठा सरदारांना एक करून स्वराज्यात आणायची. अन कान्होजींनी सर्व सरदारांना एकत्र आणले, त्यात हैबतराव शिळीमकर, मोरे, काटके, बेचकर असेच अनेक सरदार होते.
इकडे महाराज जिजाऊ मासाहेबांचा आशिर्वाद घेऊन भोरप्याच्या डोंगरावर निघाले. अन प्रतापगडी येताच राजांनी पुन्हा एकदा पंताजी काकांना वाईला पाठवलं.
पंताजी राजांचा निरोप घेऊन वाईला आले, अन खानाला बोलले, “खानसाहेब राजे तुम्हाला खूप घाबरलेत हो. राजे लपून बसलेत. भितात खूप तुम्हाला. कृपया तुम्ही जावळीत यावं अन राजांना अटक करून विजापुरी घेऊन जावं.”
अन हे ऐकून खान अस्वस्थ झाला, जावळी म्हणजे भयानक जागा हे त्याला ठाऊक होतं अन तो पंताजींना म्हणाला. “पंत जी, नही नही, मै जावली कदापि नही जाऊंगा. बडी कदीम जगह है जावली. हम इस बारेमे सोचेंगे.” तेवढ्यात पंताजी काका बोलले, “आपण आपली सगळी फौज घेऊन या, आम्ही आपणास यायला रस्ता करून देऊ.” अन पंताजी प्रतापगडी आले. परंतु दोन दिवसांतच राजांनी पंताजींना पून्हा वाईला पाठवले.
मंत्रयुद्ध: यावरून शिवरायांच्या चाणाक्ष बुद्धीची कल्पना आपण करू शकतो, शत्रूच्या डोक्यात घुसून त्याला आपल्या मनाजोगत पाऊल उचलण्यासाठी भाग कस पाडायचे अन त्यासाठी वकिलामार्फत वारंवार निरोप पाठवून जवळपास त्याचा विचारच बंद करायचा. अन पंताजींनी तसच केलं. ते पुन्हा वाईला आले अन खानाला म्हणाले: “खानसाहाब आप बेवजह सोच रहे है, चंद्रराव मोरे आपके साथ है, वो तो इस इलाके का चप्पा चप्पा जनता है.” हे ऐकून मोरेची सुद्धा छाती फुगली, तो खानाला बोलला, जी हुजूर, मै हु ना आपके साथ. अन नाही नाही म्हणत सरतेशेवटी खान तयार झाला. हा शिवरायांचा सगळ्यात मोठा विजय होता, की खान जावळीत येतोय.
इकडे खानाच्या फौजेसाठी रस्ते बनवायचं काम चालू झालं, वाई ते सावित्री चे खोरे असा रस्ता बनवला गेला. पण रस्ता अशाप्रकारे बनवला की प्रत्येक डोंगर उतारावर दर तीन फुटांवर एक झाड कापून वळण बनवलं होत. त्यामुळे हत्ती व घोडे नीट येणारच नाहीत. असा अवघड रस्ता असल्यामुळे तोफा आणता येणार नाहीत. फार फार तर सुतरनळ्या म्हणजे लहान तोफा फक्त आणता आल्या असत्या. तत्कालीन सलातीन मध्ये असलेल्या नोंदीप्रमाणे खान २५००० एवढी फौज घेऊन जावळीला निघाला. त्याचे खूप सारे हत्ती, घोडे जखमी झाले. खानाला ते सर्व डोंगर उतरत यायला जवळपास ७ दिवस लागले. म्हणजे जवळपास ऑक्टोबर च्या शेवटच्या आठवड्यात खान जावळीत आला. अन वाईहून जावळीला येत असताना खानाचे १९७ लोक ठार झाले.
इकडे खान सावित्रीच्या खोऱ्यात आला. मागे महाबळेश्वर, सूर्य मावळताना डोळ्यावर सूर्य येतो अन वरच काही दिसत नाही पण वरून सगळं दिसत अशा जागी महाराजांनी खानाची छावणी बसवायला जागा करून दिली. पण इथे सुद्धा राजांनी एक मेख मारली. खानाच्या छावणी साठी जी झाडे तोडली गेली व त्या झाडांचे ओंडके हे तेथील घाटवाटांवर टाकले वर सगळे रस्ते बंद करून टाकले, जवळपास पोलादपूर घाट, रणतोंडी घाट, पारचा घाट, बोचेघळ आणि बाकी घाटवाटा बंद केल्यामुळे खानाला जी रसद येऊ शकणार होती ती राजांनी बंद केली. खानाला अंदाज आला की शिवाजीराजा आपल्या फसवतोय.
आता मंत्रयुध्दात हेरखाते सगळ्यात महत्वाचे. खानाच्या भटारखान्यात राजांनी आपले विश्वासू विश्वासराव नानाजी दिघे यांना पाठवलं. महाराजांना बहिर्जी नाईक अन आबाजी सोनदेव हे महत्वाच्या खबरा देत होतेच पण विश्वासरावांकडे राजांनी वेगळी जबाबदारी दिलेली ती म्हणजे खान कसा आहे ते सांगणे, त्याच्या शरीराची रचना, वजन, उंची, त्याच वर्णन आम्हाला सांगणे.
आता नोव्हेंबर चा पहिला आठवडा चालू झालेला अन राजांनी खानाला ठार करायचं हे नक्की केले. राजांच्या फौजेत सिद्धी इब्राहिम नावाचा बाटलेला लोहार होता, तो हत्यारे बनवायचा. त्याने राजांना जांबिया चालवायचं शिक्षण दिल, जिथे शिक्षण दिले ती जागा म्हणजे लेखात सुरुवातीला एका पडक्या चौथऱ्याचा उल्लेख केला होता ना ती. मंदिरामागे एक खोली, जिला दरवाजा किंवा खिडकी नव्हती. दोर टाकून आत उतरायच. विश्वासरावांकडून समजलेल्या खानाच्या वर्णनानुसार राजांनी एका पोत्यात समुद्राची रेती व लाकडाचा ओला भुस्सा भरून खानाच्या पोटाची प्रतिकृती तयार केलेली. व खानाच्या पोटात कसा वार करायचा याचा सराव राजे १० दिवस करत होते. त्यासाठी राजांनी जांबिया म्हणजे बिछवा हे शस्त्र वापरले. जांबिया असा होता की एका बाजूला दातेरी व एका बाजूने धार. आत घुसताना सरळ व बाहेर काढताना दाताने आतडी बाहेर काढेल असा.
इकडे राजांनी पुन्हा एकदा पंताजी काकांना खाली छावणीत राजांचा निरोप घेऊन पाठवलं, निरोप असा की “खानाच्या एवढ्या सैन्याला पाहून राजे घाबरलेत, राजे काही गडावरून खाली यायला तयार नाहीत, तरी आपण वरती यावं.” खानाचा पंताजींवर विश्वास नव्हता, मग पंताजी काकांनी खानाला कृष्णाजी भास्कर याला विचसरण्यास सांगितलं व कृष्णाजीने पंताजींच्या बोलण्यास दुजोरा दिला. खानाने नकार दिला, पण पंताजीनी गोड बोलून खानाला कसबस पटवल. खान अर्ध्यात यायला तयार झाला. भेटीची तयारी सुरू झाली. भेटीसाठी शामियाना हा राजांनी उभारायचा अस ठरलं. राजांनी भेटीसाठी दोन मसुदे तयार केले.
पहिला मसुदा असा की दोघांच्या बरोबर १० हत्यारबंद लोक राहतील अन ती भेटीच्या शामियान्यापासून एका बाणाच्या म्हणजेच ४० फूट अंतरावर थांबतील. भेटीवेळी सोबत दोन्ही बाजूंचे वकील तसेच दोघांचेही अंगरक्षक असे एकूण ६ जण राहतील
दुसरा मसुदा: खान खालून सकाळी अकरा वाजता वर यायला निघणार. खान निघाला की तुताऱ्या, नगारे वाजवून इशारत होणार. राजे निघाले की परत तुताऱ्या, नगारे वाजणार, अन राजे शरण गेले की तुताऱ्या व नंतर तोफ उडणार व राजे शरण आल्याची खबर सैन्याला समजणार. या मसुद्यातील इशाऱ्यांचा बरोबर दुसरा अर्थ राजांनी आपल्या सैन्यासाठी सांगितला होता. राजांची व खानाची भेट ही कुठे झाली नक्की ठाऊक नाही पण भौगोलिक परिस्थिती पाहता अब्दुल्ला बुरुजावर माचीवर भेट झाली असावी. त्या अब्दुल्ला बुरूजाच्या खालच्या बाजूला एक घळ आहे, त्याच घळीत राजांनी कान्होजी जेधे याना अडीचशे मावळ्यांसह लपण्यास सांगितलं. भेट झाली की तुताऱ्या म्हणजे मावळे सावध होतील. तसेच तोफ उडाली की खान मेला असे समजून जोरदार हल्ला चढवायचा. झाली खानाच्या छावणीच्या भोवती चे गवत राजांनी मधून कापले व त्यात ढोल्या बनवून ३००० शस्त्रबंद मावळे तिथे लपवले.
इकडे पंताजी काकांनी खानाची मस्त खातीरदारी चालू केली. खानाकडून हिरे जवाहिर विकत घेऊन त्यालाच भेट दिले. खानाला वाटलं आपला डबल फायदा होईल, आपले धन आपल्याला मिळेल अन सोबत पैसा सुद्धा मिळेल. ते सर्व धन घेऊन अन जवाहिराना घेऊन पंताजी काका गडावर आले. ते जवाहिर मोरोपंतांकडे पैसे मागायला गेले, तर पंत त्यांना बोलले आता पैसे नाहीत, आम्ही सावकारांच्या नावाच्या हुंड्या लिहून देतो, त्या महिनाभरात वठतील. आणि राजे असेही शरण येणार आहेत, मग हा सर्व मुलुख खानाचच होणार, तुम्हाला त्यावेळी पैसेही मिळतील तूमचे.
आता मंत्रयुद्धाचा सगळ्यात महत्वाचा भाग
खान हा शरीराने धिप्पाड होता, जणू काही राक्षसच. त्यात तो महाकपटी म्हणून राजांनी स्वरक्षणाची तयारी केली. त्यांनी एक चिलखत बनवून घेतलं त्याला आतील बाजूस साखळी होती त्यात फक्त चाकूचे टोक घुसू शकेल अशा प्रकारचं. राजांना ठाऊक होतं की खानाकडे कट्यार आहे, तो डोक्यावर वार करू शकतो म्हणून राजांनी खबरदारी म्हणून जिरेटोपाच्या आतून एक लोखंडी पट्टी बसवून घेतली, वाघनख बनवून घेतली व सोबत जांबिया म्हणजेच बिछवा. राजांचा आत्मविश्वास जबरदस्त होता त्यावेळी.
राजांनी सैन्याची पेरणी सुद्धा चहुबाजूंनी केली. राजांनी नेताजी पालकर यांना कोकण दिशेला पाठवले. मोरोपंतांना ५००० सैन्य देऊन पुण्याच्या दिशेने पाठवलं. कान्होजी जेधे २५० मावळ्यांसह घळीत दडून बसलेले तसेच खानाच्या छावणी भोवती गवतात ३००० सैनिक पेरलेले व गडावर ४००० सैन्य होते.
राजांनी खानाच्या भेटीसाठी मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी, गुरुवार, १० नोव्हेंबर १६५९ चा दिवस नक्की केला. आता मार्गशीर्ष का?? तर मार्गशीर्ष च्या वेळी सूर्यकिरणे लांब पडतात उत्तरायण असल्यामुळे.. त्यामुळे सावल्या मोठ्या दिसतात. आणि छावणीवर मागच्या डोंगराची सावली होती त्यामुळे खालच्या लोकांना वरच काही दिसणार नव्हतं पण गडावरून राजे खालचं सगळं बघू शकणार होते.
शामियान्याची रचना कशी होती?? शामियान्यात राजांनी खानासाठी मुद्दाम एक तख्त बनवलेले, जेणेकरून राजांना खानाने अंगात चिलखत घातले आहे की नाही ते समजेल. जेव्हा खान तख्तावरून उतरून राजांकडे येईल तेव्हा पायऱ्या उतरताना खान वजनदार माणूस असल्याने त्याच्या अंगरख्याला जर सरळ घडी पडली तर चिलखत आहे, अन जर का वेडीवाकडी घडी पडलेली दिसली तर चिलखत घातले नाही हे समजण्यासाठी हे सगळे. तसेच शामियान्यात सगळीकडे कस्तुरी उधळली होती जेणेकरून खानाला झिंग येईल. तसेच खानाला शरबत ए आझम पाजायचा जो की गुलाबापासून बनवलेला असेन अन त्यात सब्जा घातलेला असेल. इतका बारीक विचार त्यावेळी राजांनी केलेला जेणेकरून खानाला मारणं सोपं जाईल. त्यावेळी राजांसोबत कोण कोण होत तर जिवाजी महाले, येसाजी कंक, संभाजी कावजी, सुरजी काटके.
भेटीच्या आदल्या दिवशी राजांनी सर्व पाहणी केली, सगळी व्यवस्था पून्हा एकदा पडताळून बघितली. तेव्हा बहिर्जी राजांना भेटले अन राजांनी बहिर्जी काकांना विचारलं की सगळं काही ठीक, बहिर्जी बोलले “राज समद ठरल्याप्रमाणे मनाजोगत घडतंय पण आपल्या समद्या मावळ्यासनी वाटतय की राजांच काय खर नाही, दगा होईल, तुम्ही भेटीला जाऊ नये असं समद्याना वाटतय.” अन राजे कडाडले, राजे बोलले तुम्ही हेरखात्याचे प्रमुख अन तुम्हाला गडावर घडलेल्या गोष्टी ठाऊक नाहीत. बहिर्जी नाईकांना काहीच समजेना की राजे कशाबद्दल बोलत आहेत. त्यांनी राजांना विचारलं महाराज काय झालं म्हणून.
आणि महाराज इथे मंत्रयुद्धाचा अजून एक महत्वाचा डाव खेळले. राजांना ठाऊक होतं लढाई जर जिंकायची असेल तर सैन्याला पराभूत मानसिकतेतून बाहेर काढणे खूप गरजेचे आहे. जोपर्यंत सैन्याचा तुमच्यावर विश्वास नसतो तोपर्यंत कोणताही राजा युद्ध जिंकू शकत नाही.
राजे बहिर्जी नाईकांना बोलले, “काल दुपारी आराम करत असताना आमचा अचानक डोळा लागला. अन आम्हाला अचानक आई भवानीने दर्शन दिले. भवानी आम्हाला बोलली की शिवबा मी तुझ्या तलवारीत प्रवेश करत आहे, मला त्या बत्तीस दातांच्या बोकडाचा बळी हवाय. अन आई भवानी विजेचा लोळ होऊन आमच्या तलवारीत शिरली.” राजांनी ही आवई उठवली ती फक्त एवढ्यासाठी की जेणेकरून आपल्या मावळ्यांचा दृष्टिकोन बदलेल. आणि झालेही तसेच, बघता बघता ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. मावळ्यांना जेव्हा ही बातमी समजली तेव्हा सगळ्या मावळ्यांमध्ये मोठा जोश संचारला. साक्षात आई भवानी महाराजांसोबत आहे, आता खान वाचत नाही. आणि सैन्याच्या या सकारात्मक मानसिकतेसह सगळे झोपी गेले.
१० नोव्हेंबर १६५९, गुरुवार, भेटीचा दिवस उजाडला.
त्यादिवशी पहाटे उठून महाराजांनी गडावरील महादेवाचं दर्शन घेतल. साधा अंगरखा, चिलखत चढवलं, बाराबंदी अंगरखा अंगात घातला, हातामध्ये वाघनखे लपवली, जांबिया म्हणजेच बिछवा लपवला. आई भवानीचे अन मासाहेबांचे स्मरण केले व राजे भेटीला तयार झाले. भेटीदिवशी सकाळी राजांनी खानाच्या सैन्याला मोठी मेजवानी दिली, राजांनी खानाच्या सैन्यात असणाऱ्या मराठा सैन्यासाठी १८ बोकड कापले जेणेकरून पोटभर जेवून हे सुस्तावतील व लढाई सोपी होईल.
राजांनी पंताजी काकांच्या कानात काहीतरी बोलले अन काकांना निरोप दिला की काका, तुम्ही खानाकडे जा व त्याला गडावर घेऊन या, त्या खानाचा काही भरवसा नाही. अन बोकील काका गडावरून खानाच्या छावणीत आले. खान चकित झाला की आता हे का आले असावेत, तेव्हा तुम्हाला अदबीने घेऊन जाण्यास आलो असे पंतांनी सांगितले व खान मेण्यात बसला. त्यावेळी खानाने आपल्यासोबत ७५० सशस्त्र हशम आपल्या सोबत घेऊन गड चढायला सुरुवात केली. गड चढताना त्या घळीजवळ आल्यानंतर वळून येताच पंत थांबले. खान म्हणाला “अब क्या हुआ पंत?” तेव्हा पंताजी बोलले की हे शस्त्रबंद सैन्य पाहून राजे घाबरले, ते येणार नाहीत. अन नाईलाजाने खानाला हे ७५० सैन्य पहिल्या टप्प्यावर थांबवून पुढे जावे लागले. त्या ७५० सैन्याचा अन खानाचा संपर्क तुटला.
बघता बघता खान शामियान्यात पोहचला. त्यावेळी खानासोबत शामियान्यात बडा सय्यद नावाचा एक पराक्रमी हशम होता. बडा सय्यद हा एकाच वेळी छोटी तलवार अन दांडपट्टा चालवण्यात तरबेज होत. एकाच वेळी तलवार अन दांडपट्टा चालवणे हे खूप जिकरीचे कसब, त्यात स्वतःचे मस्तक तुटण्याचा धोका असतो, परंतु बडा यात निपुण होता. सोबतच कृष्णाजी भास्कर कुळकर्णी हा खानाचा ब्राह्मण वकील होता.खान शामियान्यात पोचला अन त्याला राजांनी तयार केलेलं तख्त दिसलं. खान बेहद खुश झाला. तेथील जडजवाहीर बघून खान खुश झाला अन बोलला “सचमूच सिवा के पास इतनी बडी दौलत है?” तो सरबत प्यायला अन राजांची वाट बघत तख्तावर बसला.
इथेच महाराजांनी मंत्रयुद्धातील अजून एक चाल खेळली.
आपल्याकडे जर एखादा माणूस आपल्याला टाळत असेल अन आपण त्याला भेटायला बैचेन असू, अन भेटीची वेळ ठरवून आपण त्याला भेटायला गेलो अन तो तिथे आलाच नाही तर…. मानसिकता कशी होईल आपली.
राजांनी नेमकी हीच चाल खेळली. राजे काही ठरलेल्या वेळेत आले नाहीत. त्यामुळे खान बैचेन झाला, खान राजांची खूप दिवस वाट बघत होता. कधी एकदा राजे भेटतील अन तो राजांना घेऊन आदिलशहाकडे जाईल असा खानाला वाटत होतं. अन त्यामुळे राजांनी ठरलेल्या वेळेपेक्षा निघायला दोन प्रहर उशीर केल्यामुळे खानाची मानसिकता बिघडू लागली, खान विचलित झाला. तो अस्वस्थ झाला अन त्याने पंताजी ना विचारले, “अब क्या गडबड है??” अन पंताजी बोलले की खानसाहेब महाराज लय घाबरलेत हो त्यामुळेच उशीर होतोय अन हे ऐकून खानाला अतिआत्मविश्वास झाला.
इकडे जवळपास तीनच्या प्रहरास राजे वरून निघाले. राजे खाली आले. तो भेटीचा शामियाना कुठे होता त्या जागेची नक्की नोंद कुठे नाही, परंतु अब्दुल्ला बुरुजाकडे जाताना ज्या जागेवर चार तुटलेल्या पायऱ्या आहेत तिथे कुठेतरी तो शामियाना असावा असा अंदाज येतो.
इकडे राजे शामियान्याच्या बाहेर आले, त्यांना सावलीत नंगी तलवार दिसली जी बडा सय्यद च्या हातात होती राजांनी कृष्णाजीला सांगितले, आम्हाला भीती वाटते, ती तलवार म्यानबंद करा, नाहीतर आम्ही परत जातो. अन ती तलवार म्यानबंद केली. अन महाराज विजेच्या चपळाईने शामियान्यात गेले अन थेट खानासमोर जाऊन त्याच्या डोळ्याला डोळे भिडवून उभे राहिले. जणू काही सिंह आणि हत्तीच एकमेकांसमोर उभे होते. खान चमकला, एवढे दिवस इतका घाबरलेला माणूस अस कस काय वागू शकतो. वकिलांनी खानाला अन राजांना एकमेकांची ओळख करून दिली अन खानाने बडबड करायलाच सुरुवात केली. “दगाबाज, धोकेबाज, बेमुरर्वत सिवा.” अन हे ऐकून राजांनी परत घाबरल्याच नाटक केलं. खान पून्हा ओरडायला लागला अन गप्प झाला.
राजे पून्हा एकदा ताठ झाले अन खानाच्या डोळ्याला डोळे भिडवून कडाडले, “आम्ही जे केलं ते आमच्या रयतेच्या सुखासाठी अन आमच्या स्वराज्याच्या विस्तारासाठी केले. त्याचा आम्हाला काही पछतावा किंवा गम वाटत नाही.” अन राजांचे हे करारी शब्द ऐकून खान आश्चर्यचकित झाला. त्याने वकील कृष्णाजीकडे पाहिलं. कृष्णाजीने मान खाली घातली. खानाने ओळखलं की आपली फसवणूक झालीय, इतके दिवस जे चालू होत ते सगळं एक नाटक होत. खान राजांना बोलला, “ये सब ठीक है सिवा, लेकीन जैसे खत मे लिखा था वैसे हमे अपना चाचा तो मानते हो ना तुम. या वो भी एक नाटक था.?” राजांनी मान हलवून हो असा इशारा दिला.
अन खान बोलला, “बेटे सिवा, अपने चाचाजान के गले नही मिलोगे. आव हमारे गले लग जाओ.” राजांनी मान डोलावली अन राजांना आलिंगन देण्यासाठी खान तख्तावरून खाली उतरायला लागला. राजांचे लक्ष एकदम खानाच्या अंगरख्याकडे होते. खानाने पहिल्या पायरीवरून जसा मधल्या पायरीवर पाय ठेवला तशी खानाच्या अंगरख्याची घडी वाकडी पडलेली राजांना दिसली अन राजे मनातल्या मनात खुश झाले. घडी वाकडी पडली म्हणजे चिलखत घातलं नव्हत खानाने.
दोघेही समोरासमोर आले,दोघांनी तीनदा एकमेकांना डाव्या उजव्या बाजूला आलिंगन दिले. तिसऱ्या वेळी आलिंगन देताना अचानक खानाने राजांना ओढलं व राजांचा तोल गेला. खानाने राजांची मान डाव्या बगलेत दाबली व आदिलशहाने दिलेल्या रत्नजडित कट्यारीने राजांवरती वार केला. त्या वारामुळे राजांचा अंगरखा फाटला अन कट्यार चिलखताला घासल्याने खर्रर्रर्रर्र खर्रर्रर्रर्र असा कर्कश आवाज झाला. चिलखत असल्यामुळे राजे बचावले, खान दुसरा वार करणार त्याआधी राजांनी आपली मान खानाच्या बगलेतून सोडवली. खानाने राजांवर दुसरा वार केला तो डोक्यावर. तो वार जिरेटोप फाडून आतील लोखंडाची पट्टी चिरून आत गेला, अन त्याचवेळी खानाच्या पोटाला वाघनखांचा पहिला फटका बसला. व खानाच पोट फाटलं. यावरून खानाच्या प्रचंड ताकदीचा अंदाज आपल्याला येतो. खान तिसरा वार करणार तेवढ्यात राजांनी खानाच्या पोटात जांबिया घुसवला, अन तो बाहेर काढताना खानाच्या पोटातील आतडी बाहेर आली. रक्ताचा धबधबा कोसळू लागला.तेवढ्यात खान ओरडला, “या अल्लाह, दगा दगा, खून खून.” अन आपली आतडी तशीच हातात धरून शामियान्याच्या मागच्या दरवाजाने खान पळाला.
तेवढ्यात गडावर ठरल्याप्रमाणे तुताऱ्या वाजू लागल्या. खानाच्या फौजेला वाटले राजे शरण आले. खानाला पळताना पाहून सय्यद बडा पुढं आला अन राजांवर वार करणार एवढ्यात जिवा महालेंनी उलटा वार करत बडा सय्यद चा हात दांडपट्ट्यासहित उडवला अन दुसऱ्या वारात त्याच मुंडक उडवलं. तेवढ्यात राजांवर कृष्णाजी भास्करने तलवारीने वार केला, राजांनी तो अडवला अन राजे त्याला बोलले “आम्ही वकीलावर शस्त्र उगारत नाही, बाजूला हो.” तरीही भास्करने पुन्हा राजांवर वार केला अन राजे कडाडले”ब्राह्मण म्हणून कोण तुझा मुलाहिजा राखतो.” अन असे म्हणत राजांनी कृष्णाजी च मस्तक धडावेगळे केले. अन राजे परत गडावर निघाले.
जाताना महाराज आपल्या दहा सैनिकांना म्हणाले खान पळाला, त्याला पकडा, त्याला मारा. इकडे खान मेण्याकडे गेला अन मेण्यात पडला, भोई घाबरले अन मेणा घेऊन पळू लागले. तेवढ्यात तिथे संभाजी कावजी अन काटके आले, त्यांनी भोयांचे पाय काटकोनात तोडले व खानाचे मुंडके छाटले. त्याचवेळी गडावर तोफेचे तीन बार काढण्यात आले. इशारतीच्या योफ ऐकून घळीत लपलेल्या सैन्याने इथे थांबलेल्या ७५० शत्रू सैन्याची जागेवर कत्तल केली.
इकडे खानाच्या छावणीभोवती असणाऱ्या ३००० सैन्याने सुस्तावलेल्या खानाच्या फौजेवर अचानक हल्ला चढवला. सुस्तावलेल्या सैन्याने सुद्धा जवळपास अडीच तास लढाई केली. पण खानाच्या फौजेने पांढरे निशाण दाखवत शरणागती पत्करली.
त्या लढाईत महाराजांचे एकूण १७४२ मावळे ठार झाले अन ५५० मावळे जायबंदी झाले. तसेच खानाचे ३००० सैन्य ठार झाले अन ३००० हशम कायमचे जायबंदी झाले. तसेच खानाचे जवळपास तीन ते चार हजार लोक कैद झाले. बाकीचे सैन्य पळून गेले. खानाचा मुलगा फाजलखान चंद्रराव मोरेसोबत कोकणात गेला व नंतर तिथून विजापुरास गेला.
या युद्धाने राजांना काय मिळालं??
खान आपल्या सैन्यासकट जावळीत बुडाला हे ऐकून विजापूर दरबारात हाहाकार माजला. बडी बेगम तर चक्कर येऊन पडली असे म्हणतात.
तर बादशहा औरंग्या चे धाबे दणाणले, कारण याच अफझल खानाने एके काळी या औरंग्याला जिवंत पकडलेले.
अफझलखान वध हि राजकीय दृष्ट्या फार मोठी गोष्ट घडली,कारण त्यानंतर विजापूरकर या धक्क्यातून सावरायच्या आतच शिवरायांनी स्वराज्य एकाच महिन्यात दुपटीने वाढविले.
तर या लढाईत राजांना ३००० गाठी कापड, वर मिळालेले जडजवाहीर, खाली छावणीत सात लक्ष रुपये रोकड, ९० उंट, १४०० घोडी, ४० हत्ती तसेच तोफा ह्या गोष्टी राजांनी जप्त केल्या.
आता खान मेला म्हणून राजे शांत बसले नाहीत, राजांना माहीत होतं, लोखंड गरम आहे तोपर्यंत हातोडा मारला तर कमी ताकदीत जास्त फायदा होतो. राजांनी खानाला मारलं ही बातमी वाऱ्यासारखी अवघ्या हिंदुस्थानात पसरली. अन अनेक प्रतिस्पर्धी शाह्यांनी राजांच्या नावाचा धसका घेतला.
इकडे नेताजींनी १५ दिवसात बराच कोकण प्रांत काबीज केला, राजांनी स्वतः कराडवर हल्ला चढवला, स्वराज्याची सीमा जवळपास पन्हाळ्याजवळ नेला. सगळीकडे महाराजांची दहशत निर्माण झाली. त्या १५ दिवसात राजांनी कृष्णा, वेण्णा, वारणा नद्या ते कर्नाटक पर्यंतचा मुलुख काबीज केला, कराडजवळील वसंतगड अन वर्धनगड स्वराज्यात सामील करून घेतले, म्हणजे मूळ स्वराज्याच्या जवळपास अडीच पट मुलुख राजांनी त्यानंतरच्या पंधरा दिवसात स्वराज्याला जोडला.
आमच्या राजाला २० वर्षे आणखी आयुष्य लाभलं असतं तर त्यांनीच दिल्लीपर्यंत धडक मारली असती
अटकेपर्यंत धडक मारून भगवा रोवणाऱ्या मराठेशाहीची हि खरी सरुवात होती !
या अनुषंगाने कवी भूषण यांनी लिहलेले काव्य आठवले.
[इंद्र जिमि जम्भ पर] जसा इंद्र जम्भासुरावर (माझलेल्या हथ्थी रूपात),
[बाड़व सुअम्ब पर] जस वादळ आकाशावर
[रावण सदम्भ पर रघुकुलराज हैं] जसा राम माझलेल्या दिडशहाण्या रावाणावर ||१||
[पौन बरिवाह पर] जसा वारा पावसाने भरलेल्या ढगांवर,
[संभु रतिनाह पर] जसा शंभू रतीच्या पतीवर (मदनावर)
[ज्यो सहसबाह पर रामद्विजराज हैं] जसा परशुराम सहस्त्र क्षत्रियांवर ||२||
[दावा द्रुम दंड पर] जशी विज झाडाच्या कठोर बुंद्यावर,
[चीता मृग झुंड पर] जसा चीता हरणाच्या कळपावर तुटून पडतो,
[भूषण वितुंड पर जैसे भृघराज हैं] जश्या भल्या मोठ्या हथ्थिवर सिंह हल्ला करतो ||३||
[तेज तमअंस पर] जसा प्रकाशाचा किरण काळ्या अंधाराच नाश करतो,
[कान्ह जिमि कंस पर] कृष्ण कंसाचा नाश करतो,
[त्योम म्ल्लेंछ बंस पर सेर सिवराज हैं ] तसा हे शिवाजी राजा या म्ल्लेंछ वंशाचे कपटी (मोघल, आदिलशाह, निजामशाह, सिद्धि, हब्शी, पोर्तुगीज) यांचा नाश करणारा वाघ आहेस.
संदर्भ.
अणूपुराण – कविंद्र परमानंद, सभासदाची बखर, उद्धृत श्री छत्रपती शिवाजी महाराज, पूर्वार्ध, वा. सी. बेंद्रे, पृ. अनुक्रमे १८९, १७५).– आसावरी बापट
(संदर्भ : दैनिक लोकसत्ता – १७ एप्रिल २०१५)
http://www.loksatta.com/lokprabha/kautilya-and-shivray-1092917/लक्ष्यवेध – (कादंबरी, लेखक रणजित देसाई
Pratapgad Campaign लेखक मे. मुकुंद जोशी
जावळी १६५९ (दिग्दर्शक प्रवीण तरडे)
खूपशा नोंदी- तत्कालीन मु. सलातीन
जदुनाथ सरकार (१९९२). शिवाजी अॅण्ड हीज टाइम्स. ओरिएन्ट ब्लॅकस्वान. pp. ४७–५२. आय.एस.बी.एन. 978-81-250-1347-1.
^ जे. नाझरेथ (२००८). क्रिएटिव्ह थिंकिंग इन वॉरफेअर(सचित्र आवृत्ती.). लान्सर. pp. १७४–१७६. आय.एस.बी.एन. 978-81-7062-035-8.
^ आर. एम. बेथम (१९०८). मराठाज अॅण्ड दखनी मुसलमान्स. एशियन एज्युकेशनल सर्व्हिसेस. pp. १३६. आय.एस.बी.एन. 978-81-206-1204-4
^ स्टीव्हर्ट गॉर्डन (१९९३). द मराठाज् १६००-१८१८, पार्ट २, व्हॉल्यूम ४ (इलस्ट्रेटेड आवृत्ती.). केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस. पान क्रमांक ६७. आय.एस.बी.एन. 978-0-521-26883-
धन्यवाद
सोनू बालगुडे पाटील