महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,24,164

प्रति तिरुपती बालाजी मंदिर केतकावळे

By Discover Maharashtra Views: 7881 6 Min Read

प्रति तिरुपती बालाजी मंदिर केतकावळे

पुणे जिल्ह्यात पुण्यापासून ४० कि.मी. अंतरावर पुरंदर किल्ल्याच्या परिसरात केतकावळे हे सुमारे दोन हजार लोकसंख्येचं छोटंसं गाव आहे. याच गावात व्यंकटेश्वरा हॅचरीज या उद्योगसमूहाच्या ट्रस्टने प्रति तिरुपती बालाजी मंदिर बांधलं आहे.
मूळच्या तिरुमला-तिरुपती येथील मंदिराची ही प्रतिकृती आहे. मूळचं मंदिर हे आंध्र प्रदेशात व्यंकटाचल पहाडावर ८४० मीटर उंचीवर आहे, तर केतकावळे येथील हे मंदिर डोंगराच्या पायथ्याशी आहे. मूळ मंदिराचा परिसर शेकडो एकरांचा आहे. मुख्य देवस्थानाच्या सभोवती जणू एक मोठं गावच वसलेलं आहे. तर केतकावळे येथील देवस्थानाचा परिसर सुमारे २३ एकरांचा आहे. प्रत्यक्ष मंदिर हे अडीच एकरांवर बांधलेलं आहे. मूळ देवस्थानाच्या तुलनेत ते खूप छोटं आहे.

तिरुपती येथील मुख्य मंदिराच्या समोर ध्वजस्तंभ व गरुड मंदिर आहे, तसंच मुख्य मंदिराच्या बाजूने परिवार मंदिरं आहेत. त्यात विविध देवदेवता आहेत. केतकावळे इथेही मुख्य मंदिरासमोर ध्वजस्तंभ व गरुड मंदिर उभारलेलं आहे, तसंच मंदिराच्या चारही बाजूंना छोटी मंदिरं आहेत. त्यात सुदर्शनस्वामी, नृसिंह, पद्मावती, गोदामाता व वेणुगोपालस्वामी अशा देवता आहेत. मंदिराच्या डावीकडे कुबेर आणि वराहस्वामी यांची मंदिरं आहेत. ही छोटी मंदिरं सुबक बांधणीची आहेत.
पिवळ्या धमक रंगात त्यांचे कळस रंगवलेले आहेत. कळसावर त्या त्या देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिरांचा बाह्य भाग निळसर करड्या रंगाचा. त्यात बर्या च प्रमाणात लाल रंगाचाही वापर केलेला दिसतो.
महाराष्ट्रातील पारंपरिक मंदिरांमध्ये अशी रंगसंगती क्वचितच आढळते. या मंदिरांच्या प्रथम दर्शनातच त्यावरील दाक्षिणात्य छाप जाणवते.

मुख्य मंदिरातही रंगांची उधळण केलेली दिसते. तिरुपती येथील मूळ मंदिराप्रमाणेच इथेही मंदिरावर उंच व भव्य गोपूर आहे. आगम शास्त्रानुसार या मंदिराचं बांधकाम करण्यात आलं आहे. श्री बालाजी हा विष्णूचा अवतार मानला जातो. त्यामुळे विष्णू मंदिर बांधण्यासंबंधी जे पारंपरिक नियम आहेत त्यांचं इथे पालन करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. या मंदिराचा प्रत्येक भाग म्हणजे बालाजीचे शरीरावयव आहेत.
उदाहरणार्थ, गर्भगृह म्हणजे मस्तक व राजगोपुरम म्हणजे चरण. यामध्ये अर्थमंडप, अंतराळ मंडप, मुखमंडप, सोपनम, ध्वजस्तंभम, बलिपीठम हे भाग आहेत.

केतकावळे येथील बालाजीची मूर्ती ही तिरुपती येथील मूळ मूर्तीप्रमाणेच घडवण्यात आली आहे. मूळ मूर्ती ही शाळिग्रामाची असून तीन मीटर उंचीच्या कमळावर उभी आहे. या मूर्तीच्या कानांत कर्णफुलं, खांद्यावर नाग व केशसंभार रुळलेला आहे. तिच्या चार हातांपैकी एकेका हातात शंख, चक्र, गदा असून एक हात भक्तांना आशीर्वाद देणारा आहे. या मूर्तीवर उभट आकाराचा मुकुट चढवला जातो, तसंच तिला विविध अलंकारांनी सजवण्यात येतं.
केतकावळे येथील मंदिरातील मूर्तीमध्येही ही सर्व वैशिष्ट्यं आढळून येतात.

केतकावळे येथील बालाजीचे सर्व पूजाविधी तिरुपतीप्रमाणेच आहेत. मंदिरात तीन वेळा पूजा आणि दोन वेळा सेवा केल्या जातात. सुप्रभातम आणि एकान्तसेवा या त्या दोन सेवा. दर गुरुवारी भाविकांना नेत्रदर्शन घडवलं जातं. या मंदिरात वर्षातून दोन मोठे उत्सव साजरे केले जातात. एक वार्षिक उत्सव व दुसरा ब्रह्मोत्सव. ब्रह्मोत्सव हा उत्सव पंधरा दिवस चालतो. या काळात मंदिरातील नेहमीच्या विधींशिवाय अन्य कार्यक्रमही होतात.

तिरुपती येथील मूळ मंदिरात भाविकांनी बालाजीला केस वाहण्याची प्रथा आहे. तशी सोय येथील मंदिरातही उपलब्ध करण्यात आली आहे. मूळ मंदिरात मिळतो त्याप्रमाणे या मंदिरातही लाडूचा प्रसाद मिळतो. मूळ मंदिरात जशा दान-दक्षिणेसाठी हुंड्या ठेवलेल्या आहेत तशा इथेही आहेत. मूळ मंदिरात व्यंकट रमणा गोविंदा अशी तेलुगू भजनं ऐकू येतात, त्याच भजनांच्या ध्वनिफिती इथे ऐकवण्यात येतात. व्यंकट रमणा गोविंदा हा गजर इथे सतत चालू असतो.
तर असं हे केतकावळ्याचं बालाजी देवस्थान- तिरुपतीच्या मूळ बालाजीचं दर्शन घडवणारं. बालाजीचे भक्त भारताच्या सर्व भागांत आहेत. महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही. या मंदिरामुळे इथल्या भाविकांची बालाजीच्या दर्शनाची सोय झाली आहे. तथापि, मूळ बालाजीची प्रतिकृती उभारण्याचं प्रयोजन काय आणि ती इथे का उभारली, हे प्रश्न पडू शकतात.

व्यंकटेश्व्रा हॅचरीज ट्रस्टच्या इथल्या जनसंपर्क अधिका-यांना बोलतं केलं तेव्हा त्यांनी सांगितलं, की बालाजीवर असलेल्या श्रद्धेतून या मंदिराची निर्मिती झाली आहे. या समूहाचे संस्थापक डॉ. बी. व्ही. राव यांची तिरुपती बालाजीवर मोठी श्रद्धा होती. हे त्यांचं कुलदैवत. सर्वसामान्य भाविकांना तिरुपतीला जाणं शक्य होत नाही म्हणून बालाजीचं मंदिर उभारावं, अशी त्यांची इच्छा होती. ती त्यांच्या हयातीत पूर्ण झाली नाही; पण पुढे व्यंकटेश राव, बालाजी राव व अनुराधा देसाई या त्यांच्या मुलांनी ही इच्छा पूर्ण केली. ही भावंडं या मंदिराची व्यवस्था पाहतात.

मूळ देवस्थानाचं पावित्र्य इथेही काटेकोरपणे जपलं जातं, असं इथल्या अधिका-यांनी सांगितलं. याच दृष्टिकोनातून दक्षिणेकडील पुजा-यांची इथे नियुक्ती करण्यात आली आहे. इथे भाविकांसाठी सर्व व्यवस्था सेवाभावी वृत्तीने करण्यात आल्या आहेत, असं सांगण्यात आलं. भाविकांना उपलब्ध करण्यात आलेल्या कोणत्याही सेवेसाठी इथे शुल्क घेतलं जात नाही. इथे येणा-या भाविकांच्या वाहनांकरिता पार्किंग, मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पादत्राणं काढून ठेवण्याची सोय, दर्शनानंतर प्रसाद व भोजनाची सोय अशा अनेक सेवा इथे दिल्या जातात.

तिरुपती येथील मूळ देवस्थानात भाविकांना लाडूचा प्रसाद दिला जातो. इथेही तशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी थेट तिरुपतीहून आचारी आणण्यात आले आहेत. तिरुपती येथील मूळ देवस्थानात भाविकांनी केस वाहण्याची प्रथा आहे. भाविक तिथे मुंडण करून घेतात. केतकावळे इथेही ही व्यवस्था आहे. तथापि, मूळ देवस्थानाच्या तुलनेत इथे मुंडण करून घेणा-या भाविकांची संख्या अल्प दिसते. व्यवस्थापनातील नियोजन व शिस्त हे केतकावळे येथील बालाजी मंदिराचं वैशिष्ट्य ठरू लागलं आहे.

माहिती साभार – अमोल कडू-देशमुख

1 Comment