महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,12,838

खानदेशातील प्रागैतिहासिक काळ

By Discover Maharashtra Views: 1458 7 Min Read

खानदेशातील प्रागैतिहासिक काळ –

मानवी प्रागैतिहासिक काळ समजून घेण्यासाठी स्तरावर उत्खनने तसेच भौगोलिकदृष्ट्या सर्वेक्षण जरूरीचे असते. आदिम मानवाने वापरलेली दगडी अवजारे व काही वस्तू ज्या नैसर्गिक साधनांपासून बनवलेल्या असतात, उदाहरणार्थ हाडे, लाकुड, झाडांच्या फांद्या पाने आणि फुले फळे व दगडी हत्यारे यांवरून तो मानव कसा जीवन जगत होता याचा आढावा घेतला जातो. म्हणूनच मानवी संक्रमणाच्या या काळाला पुराश्मयुग असे म्हटले जाते. तज्ञांनी या काळाची विभागणी सोईसाठी तीन भागात केली आहे. एक पुर्व पुराश्मयुग, दोन मध्यपुराश्मयुग आणि तीन उत्तर पुराश्मयुग ही होय.‌ दगडी वस्यू वापरत असल्याने या काळस अश्मयुग असेही म्हटले जाते. पाषाणानंतर धातुंचा वापर केला म्हणून धातु युगात ताम्रयुग आणि लोहयुग, ब्राँझ युग अशी विभागणी केली आहे. अश्मयुगानंतर येणाऱ्या काळाला ताम्रपाषाण युग म्हटले जाते,या संक्रमणकाळात मानव धातुचा वापर करत असतांनाच पाषाणही वापरत होता. त्यानंतरच्या कालखंडाला लोहयुग असे म्हणतात. वर उल्लेख केल्याप्रमाणे हे कालावधी समजून घेण्यासाठी सखोल तज्ञांनी सर्वेक्षण आणि उत्खननाची गरज असते, याला जोड म्हणून भौगोलिकदृष्ट्या सर्वेक्षण केलेले असते त्याचाही परिणाम होतो. मानव आणि निसर्ग हे वेगळे करता येत नाही. मानवाचा अभ्यास आणि निसर्गाचा अभ्यास एकमेकांना पूरक आहेत.(खानदेशातील प्रागैतिहासिक काळ)

खानदेशातील अश्मयुगीन सखोल अभ्यास करण्यासाठी सर्वेक्षणाची गरज आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आधीचे सर्वेक्षण आणि उत्खनन १९७२ मध्ये झालेले आहे. मानेगाव येथील सर्वेक्षण आणि पाटणे येथील उत्खननामुळे अश्मयुगीन मानवाचे थोडेफार पुरावे मिळाले आहे मानेगाव येथील उत्खननामुळे दिड लाख वर्षे ते एक लाख वर्षांपूर्वीचे पुर्व पुराश्मयुगातील मानव भटके जीवन जगत होता, पुर्णा नदी आणि गंगनाला यांच्या संगमाजवळ त्रिस्तरीय निक्षेप आढळून आले,  या वरच्या थरात तपकिरी गाळात  थरात चुनामिश्र ग्रंथी आणि चॅल्सिडोनीची सुक्ष्म हत्यारे ज्यांना मायक्रोलिथ म्हटली जातात ती सापडली, नदीच्या वरच्या पात्रात  सहा मीटर स्तरावर निक्षेपात मधल्या वालुकामय स्तरात मध्यपुराश्मयुगातील दगडी वस्तू मिळाल्या आहेत तर निम्नस्तरात घट्ट चिकटलेले गारगोट्यांमध्ये अश्युलियन अवजारे मिळाली. गंग नाल्याच्या उजव्या काठावरील या स्तरांमध्ये पुर्व, मध्य आणि उत्तर काळातील अवजारे मिळाली आहे. संदर्भ:  बी.पी. बोपर्डीकर, अर्ली स्टोन एज साईट ऍट मानेगाव इंडीयन अन्टिक्विटी खंड ४, १९७०

एक महत्त्वाचा भाग म्हणजे एवढ्या मोठ्या काळानंतर काहीच पुरातत्वीय हालचाली झाल्या नाहीत, नोव्हेंबर महिन्यात मी मानेगावला गेले होते आणि याचा काहीच मागमुसही मिळाला नाही, एकतर गंगनाल्यात शेतीला सुरवात झालेली आहे आणि हतनूर धरण्याच्या बॅकवाटरमुळे पुर्णा नदीचे पात्र खुपच पसरट झालेले आहे, अशा वेळी उत्खनन झालेली स्थळांची जागा मार्क करून सोडून द्यायला हवी किंवा इतर उपाययोजना करायला हवी, तसेच पाटणे गावाजवळ आड नाल्यात उत्खनन झाले होते त्याचाही मागमूस लागत नाही. काळाच्या ओघात बऱ्याच बाबी नष्ट होतात, असो.(खानदेशातील प्रागैतिहासिक काळ)

खानदेशातील भौगोलिक घडामोडी आणि भौगोलिक कालमापनाचा विचार केला तर मध्य पुराश्मयुगाच्या प्रारंभीच्या काळातील भुगर्भातील घडामोडींचा विचार केला तर पाटणेजवळील अजिंठ्याच्या पायथ्याशी एक अर्थवर्तुळाकार खोलगट भाग तयार झाला. या भागात ४०,००० वर्षांपासून वसाहत असल्याचे निदर्शनास आले. पाटणे उत्खनन १९७३ साली झाले. रवि कोत्तीसेत्तार या पुरातत्वज्ञांच्या मते हे पुर्वपुराश्मकाळाचे अतिशय क्लासिक उदाहरण आहे, मध्यपुराश्मकाळातील आणि उत्तर पुराश्मकाळातील असून अंड्यांच्या कवचावर मानवाने केलेली जाळीची नक्षी आहे. शिवाय शहामृगाच्या अंड्यापासून बनवलेले तीन सुंदर मणी आणि नदीच्या मुखाजवळ आढळणारे शंखाचे मणीदेखील सापडले आहेत. पाटणेच्या शहामृगाच्या अंड्यावरील कलाकृती, कोरीव नक्षी, अंड्याचे मणी आणि घोटीव वस्तू व त्या करतांना उरलेले अवशेष दर्शवतात की या वस्तू येथेच बनवल्या असाव्यात. पाटणेला मिळालेली अश्युलियन  अवजारे गंगापुरला मिळालेल्या  उत्तर अश्युलियन अवजारांशी तुलना करण्याजोगी आहेत.

पाटणेला मिळालेली सांस्कृतिक साधनसामग्री ४०,००० ते ६००० वर्षापुर्वीची असून त्याचे तीन कालखंड  पाडण्यात आले आहे. या परिसरात उत्तर अश्युलियन काळापासून मानवी वसाहत असणार, समशितोष्ण हवामान, पाणी, शिकारीसाठी प्राणी, कंदमुळे फळे व अन्नधान्याची उपलब्धता व सुरक्षित निवाऱ्यामुळे माणसाने कायम रहाणे पसंत केले असावे. येथील हवामान हे  आजुबाजुला असलेल्या गोदावरी नदीच्या आणि तापी नदीच्या खोऱ्यात असलेल्या हवामानाप्रमाणेच असावे. हा अंदाज आहे पण अधिक सखोल पर्यावरण समजून घेण्यासाठी संशोधन करण्याची गरज आहे, संदर्भ: एस.ए.साळी, अप्पर पॅलिओलिथिक ऍन्ड मेसोलिथीक कल्चर ऑफ महाराष्ट्र, १९८९

प्रागैतिहासिक काळाची रचना लिखीत किंवा मौखिक पुराव्यावरून करता येत नाही तर भौतिक पुरावेच महत्त्वाचे असतात. नदीकाठी असलेल्या भुगर्भिय स्थळांचे शास्त्रीय दृष्ट्या उत्खनन केल्यास निरनिराळ्या कालखंडातील पर्यावरणाची, हवामान, वनस्पती व प्राणी सृष्टी यांची कल्पना येते. गेल्या दिडशे वर्षांत भारतात भुगर्भशास्र, पुराप्राणीशास्र व प्रागैतिहासिक पुरातत्व या शाखांमध्ये झालेल्या संशोधनात बरीच प्रगती केली आहे. पुर्वपुराश्मकालीन मानेगाव हे ठिकाण होते हे लक्षात येते. उत्तर प्लायस्टोसीन काळात व कालगणनेच्या दृष्टीने ४००००-१२००० या काळात भारतात उत्तर पुराश्मयुग होऊन गेले. हा काळ महत्वाचा म्हणजे या काळात मानव चित्रकला व शिल्पकला यांचा विकास झालेला दिसून येतो.या काळात प्रगत तंत्राची पाती, ब्युरीन तसेच हाडे, शिंगे व हस्तीदंत यांचा हत्यारासाठी व अलंकार बनवण्यासाठी उपयोग केलेला आढळतो. महाराष्ट्रात उत्तर पुराश्मयुगाचा पुरावा ढवळापुरी आणि चिटकी अहमदनगर, पितळखोरा, आणि औरंगाबाद,कांदिवली ,नेवासा, इनामगाव आणि झरपटनाला आणि पाटणे येथे आढळला आहे.

उत्तर पुराश्मयुगातील काळात मानव पाती, चाकु, तासण्या, तीराग्रे, गिरमीटे यांचा समावेश असलेल्या वैशिष्ट्य पुर्ण काळात व नवीन हत्यार म्हणजे ब्युटील होय. हे छीन्नीसारखे हत्यार आहे. पाटणे येथील उत्तर पुराश्मयुगीन वसतीस्थानात जास्पर, चॅल्सिडोनी, चर्ट आणि रक्ताश्म यांची हत्यारे असलेले सांस्कृतिक पुरावे मिळालेले असून हत्यारांची निर्मिती कशी झाली आणि तंत्र कसे विकसित झाले हे लक्षात येते. हाडे, प्राण्यांची अंडी कवड्या, शिंपले व शहामृगाच्या अंड्याचा वापर दिसून येतो. आंतराश्मयुग भुगर्भिय दृष्टीने पुराश्मयुग हे प्लायटोसीन मधून हाॉलोसीनमध्ये प्रवेश केला तेव्हा आले आणि याच्या काळाचा विचार १२०००-४००० वर्ष असा करता येईल. उत्तर पुराश्मयुग आपेक्षा वनवास मयोग यांना जोडणारे आंतरराश्म युगाचे वेगळेपण म्हणजे मानव त्याच्या भटक्या आशयाचा हळूहळू त्याग करू लागला होता असे दिसते आणि त्याने आपल्या राहण्याच्या ठिकाणात विविधता आणली होती. तसेच हत्यारे बनवण्याचे तंत्र विकसित केले होते. अग्नीचा उपयोग करता येऊ लागला होता. मातीची भांडी तसेच घराच्या भिंती बांधण्याचे तंत्र, पशुपालन आणि मृतांचे दफन ही त्याच्या संस्कृतीची काही महत्त्वाची अंगे सांगता येतील. पाटणे येथील उत्खननातील तिसऱ्या कालखंडात जळगाव जिल्ह्यात जवळजवळ आजच्या सारखेच हवामान होते असे दिसते. या थरावरून मिळणारा महत्त्वाचा पुरावा म्हणजे झोपडी बांधताना लावलेले लाकडी टेकू साठी पडलेले खड्डे आणि अन्न तयार करण्यासाठी तयार केलेली ओबडधोबड चूल होय.

@सरला

Leave a Comment