पुणे भारत गायन समाज –
बाजीराव रोडवर शनिपारच्या जवळ रस्त्याच्या उजव्या बाजूला १४८६, शुक्रवार पेठ इथे एक ऐतिहासिक वास्तू उभी आहे. ती पुणे भारत गायन समाज या संस्थेची आहे. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताला चालना देण्याच्या उद्देशाने ख्यातनाम शास्त्रीय गायक व संगीतकार भास्करबुवा बखले यांनी १ सप्टेंबर १९११ रोजी किर्लोस्कर नाट्यगृहाच्या मागील बाजूस या संस्थेची स्थापना केली. कालांतराने संस्थेचे स्थलांतर ६५९, शुक्रवार पेठ, भूतकर वाडा येथे दरमहा ३५ रु. भाड्याच्या जागेत झाले. परंतु त्या काळी सदर भाडे जास्त वाटू लागल्याने संस्थेने ५२१, शुक्रवार पेठ येथे दुसरा व तिसरा मजला मासिक २० रुपये भाड्यात मिळवून तेथे स्थलांतर केले. भास्करबुवांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे इ.स. १९२२ पर्यंत संस्था तेथेच कार्यरत होती. पुढे २३ ऑक्टोबर १९२८ रोजी विजयादशमीच्या मुहूर्तावर संस्थेने १४८६, शुक्रवार पेठ ही मिळकत खरेदी करून तेथेच कायमचे वास्तव्य केले. इ.स. १९५७च्या सुमारास रस्ता रुंदीकरणात १२ फूट गेल्याने ही वास्तू लहान होऊन आज आहे त्या स्थितीत शास्त्रीय संगीताचे शिक्षण देत मोठ्या अभिमानाने उभी अहे.(पुणे भारत गायन समाज)
सुरुवातीला या संस्थेचे पालकत्व किर्लोस्कर नाटक मंडळी या नाट्यसंस्थेकडे होते. त्यामुळे प्रारंभी किर्लोस्कर भारत गायन समाज म्हणून ती ओळखली जायची. मात्र, कंपनीने संस्थेचे पालकत्व काढल्यानंतर त्याचे नामकरण भारत गायन समाज असे करण्यात आले. त्यानंतर ३ ऑक्टोबर १८७४ रोजी भारतीय शास्त्रीय संगीताला चालना देणारी पुणे गायन समाज ही संस्था भारत गायन समाजात विलीन झाली. त्यामुळे संस्थेचे नाव पुणे भारत गायन समाज असे झाले.
भास्करबुवा बखले यांचा जन्म १७ ऑक्टोबर १८६९ रोजी सुरतजवळील कठोर या गावी झाला. त्यांचे वडील रघुनाथराव यांची बदली बडोद्यास झाल्याने वयाच्या ७व्या वर्षी ते बडोद्यास आले. त्या वेळी पिंपळेबुवा या विद्वान कीर्तनकारांची कीर्तने सर्वत्र गाजत होती. ती ऐकून छोट्या भास्करला संगीताची गोडी लागली व साकी, दिंडी, अष्टपदी इत्यादी पदे तो उत्तम रीतीने गाऊ लागला. पिंपळेबुवामार्फत सयाजीराव महाराजांच्या दरबारात त्याचा शिरकाव झाला. इ.स. १८८३ मध्ये सयाजीरावांना पुत्र झाल्यामुळे चालू असलेल्या पुत्रोत्सवात वयाच्या १४व्या वर्षी गाऊन भास्करने गानरसिकांची मने जिंकली. याच सुमारास किर्लोस्कर नाटक मंडळींतील प्रसिद्ध गायक नट भाऊराव कोल्हटकर हे बडोद्यास आले होते. भास्करचे गाणे ऐकल्यावर किर्लोस्कर मंडळीत याचे सोने होईल, असे वाटल्याने ते भास्करला घेऊनच मंडळीत आले. त्या वेळी मंडळी ‘रामराज्यवियोग’ हे नाटक बसवीत होती. त्यात भाऊराव मंथरेचे काम करीत होते. त्याने भाऊरावांबरोबर कैकयीचे काम केले. व नाट्यरसिकांची टाळी घेतली. पुढे किर्लोस्कर मंडळी इंदूरला गेल्यावर तिथे त्याला विख्यात बीनकार बंदे अली खाँ यांची तालीम मिळून त्याची गायनात प्रगती होऊ लागली. लवकरच किर्लोस्कर नाटक मंडळी सोडून भास्कर बडोद्यात आला. बाळशास्त्री तेलंग हे दरबारचे कारभारी असून, त्यांचेमार्फत भास्करचा प्रवेश दरबारगायक फैजमहंमद खाँ यांचेकडे झाला. भास्करचे हे पहिले गानगुरू त्यांचेकडे नऊ वर्षे राहून अपार कष्ट व मेहनत करून त्याने गानविद्या संपादन केली. आता भास्कर हा भास्करबुवा होऊन स्वतंत्र मैफली करू लागला. पुढे आग्रा घराण्याचे नथ्थनखा, ग्वाल्हेर घराण्याचे कादरबक्ष, जयपूर घराण्याचे अल्लादियाखाँ या थोर गुरूंची गायकी आत्मसात करून भास्करबुवांनी आपली स्वतंत्र गायकी निर्माण केली.
भास्करबुवांनी किर्लोस्कर नाटक मंडळी सोडली, तरी कंपनीबरोबरचे त्यांचे संबंध निकोप व सौहार्दाचे होते. बुवांनी तेथे घडविलेल्या शिष्यांपैकी नारायणगाव राजहंस ऊर्फ बालगंधर्व, मास्तर कृष्णा ऊर्फ कृष्णराव फुलंब्रीकर आणि गोविंदराव टेंबे हे प्रमुख होत. बालगंधर्वांनी किर्लोस्कर मंडळी सोडून गंधर्व नाटक मंडळी स्थापन केल्यावर भास्करबुवा गंधर्व नाटक मंडळींचे गानगुरू झाले. संगीतद्रौपदी व संगीत स्वयंवर या नाटकांना बुवांनी दिलेल्या चाली बालगंधर्वांनी आपल्या आवाजाने अजरामर केल्या. स्वतंत्र प्रज्ञेचा एक थोर गायक म्हणून बुवांचे नाव आता देशभर झाले होते. त्यामुळे त्यांना इंदोर, बडोदे, पतियाळा, काश्मीर, चंबा, पंजाब, म्हैसूर इत्यादी दरबारकडून आमंत्रणे येऊ लागली. विशषेतः पंजाबात जालंधर येथे दरवर्षी होणाऱ्या हरिवल्लभ संगीत महोत्सवात बुवा जवळजवळ २० वर्षे मास्टर कृष्णाला बरोबर घेऊन जात असत. तेथे सुमारे ५,००० गानरसिकांसमोर गाऊन बुवांनी अनेकदा सुवर्णपदके मिळविली. महाराष्ट्रातील दोन थोर पुरुषांनी आपले नाव पंजाबच्या इतिहासावर कायमचे कोरून ठेवले आहे. पहिले संत नामदेवमहाराज व दुसरे भास्करबुवा बखले. आयुष्यभर उंच पट्टीत गात राहिल्याने इ.स. १९२१ च्या सुमारास बुवांची तब्येत ढासळली. रक्तक्षयाचा विकार होऊन ८ एप्रिल १९२२ मध्ये ते नादब्रह्मात विलीन झाले.
इ.स. १९११ साली बुवांनी लावलेल्या पुणे भारत गायन समाज संस्थेच्या रोपट्याचे रूपांतर आज वटवृक्षात झाले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने दरवर्षी बॅचलर ऑफ म्युझिक अभ्यासक्रमात प्रथम येणार्या विद्यार्थ्यास पं. भास्करबुवा बखले पुरस्कार देण्यात येतो. मुंबई विद्यापीठही आपल्या मास्टर ऑफ आर्ट्स म्युझिक प्रोग्रामच्या सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यालाही असाच पुरस्कार देते. भविष्यात संस्थेने पदवी अभ्यासक्रमाच्या समकक्ष अभ्यासक्रम सुरू करण्याची योजना आखली आहे. त्यामुळे संगीत विशारद पदवी आणि पारंगत पदवी देता येईल. संस्थेने सुरू केलेले पदवी अभ्यासक्रम महाराष्ट्र सरकारने मान्य केले आहेत. ज्या उमेदवारांनी संस्थेत कमीतकमी एक वर्ष यशस्वीपणे शिक्षण घेतले आहे. त्यांना शाळांमध्ये संगीत शिकवण्यासाठी शिक्षक पदविका प्रदान केली जाते. इ.स.१९४९ मध्ये संस्थेने संगीत प्रशिक्षण देण्यासाठी वेगळा विभाग सुरू केला. त्याला भास्कर संगीत विद्यालय म्हटले जाते. त्यात संगीत, हार्मोनियम, तबला, व्हायोलिन आणि सतार, तसेच भरतनाट्यम आणि कथकसारख्या नृत्य प्रकारांचे धडे दिले जातात. अभ्यासक्रमाचा कालावधी १० वर्षांचा आहे आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर प्रदान केले जाते. शिक्षक, विद्यार्थी आणि सदस्यांसाठी भारतीय संगीताच्या विविध बाबींवरील पुस्तकांचा उल्लेखनीय संग्रह संस्थेमध्ये आहे. संगीताशी संबंधित पुस्तकांव्यतिरिक्त जुन्या कलाकारांच्या ग्रामोफोन रेकॉर्ड आणि स्पूल रेकॉर्डिंगदेखील ग्रंथालयात उपलब्ध आहेत. शिष्यवृत्ती योजना आणि परवडणारी फी ग्रामीण भागातील सर्व पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना संस्थेत प्रशिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करते.
संदर्भ:
पुण्यनगरीतील वाडे व वास्तू – डॉ. एच. वाय. कुलकर्णी
https://www.punebharatgayansamaj.com/
https://www.facebook.com/PBGS1911/
पत्ता : https://maps.app.goo.gl/cdMj8vKER6worXMT9
आठवणी इतिहासाच्या