पुरंदर किल्ला
अल्याड जेजुरी पल्याड सोनोरी |
मध्ये वाहते क-हा |
पुरंदर शोभतो शिवशाहीचा तुरा ||
असे वर्णन असलेला पुरंदर किल्ला. हा किल्ला पुण्यापासून साधारण 40 किमी अंतरावर आहे. पुणे, हडपसर, सासवड, नारायणपूर किंवा पुणे-कापूरहोळ-नारायणपूर अशा दोन मार्गाने या गडाकडे येता येते.
पुरंदर हा प्राचीन व ऐतिहासिकदृष्टया प्रसिद्ध किल्ला आहे. शूरवीर मुरारबाजी देशपांडे यांच्या अद्वितीय पराक्रमाचा बोलका साक्षीदार असलेला पुरंदर किल्ला. पुरंदर आणि वज्रगड जरी एकाच डोंगरसोंडेवर वसलेले असले तरी ते दोन स्वतंत्र किल्ले आहेत. काही वर्षे हा पुरंदर किल्ला शिवाजी महाराजांची राजधानी होता.
छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म या किल्ल्यावर झाला होता. तसेच हा किल्ला पेशव्यांची पहिली राजधानी ही होता. आता हा किल्ला भारतीय सैन्याच्या ताब्यात आहे. त्यांची पर्यटकांवर करडी नजर असते.
गाडी रस्त्याने किल्ल्यावर आल्यास मिलिटरीचे सैनिक आपली तपासणी करूनच आपल्याला गडावर प्रवेश देतात. सुरेक्षेच्या कारणास्तव पुरंदर किल्ला सकाळी ९.०० ते संध्याकाळी ५.०० या वेळातच पाहाता येतो. किल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी राज्य किंवा भारत सरकारचे फोटो आयडी कार्ड जवळ असणे आवश्यक आहे. उदा. पॅन कार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, आधार कार्ड, इलेक्शन कार्ड इत्यादी.
बिनी दरवाजातून आपण पुरंदर माचीवर प्रवेश करतो. त्या माचीला पूर्वी पाच दरवाजे असल्याचे मानले जाते. आता फक्त एक दरवाजा उरला आहे. गडाभोवती पूर्व-पश्चिम पसरलेल्या या माचीवर अनेक वास्तू दिसतात. त्यात पुरंदरेश्वर-रामेश्वरची मंदिरे, पद्मावती-राजाळे तलाव, छोटे-मोठे आड, पेशवेकालीन इमारतीच्या जोत्यावर ब्रिटिशांनी बांधलेले बंगले, चर्च, बराकी अशा अनेक वास्तू आहेत. या वास्तूंमधून हिंडतानाच दोन्ही हातात समशेरी घेतलेला मुरारबाजींचा आवेशपूर्ण पुतळा समोर येतो.
पुरंदर किल्ल्याच्या इतिहासातील सर्वात प्रसिद्ध घटना म्हणजे मुरारबाजी देशपांडेने दिलेरखानाला अखेरच्या श्वासापर्यंत दिलेला लढा.
पुरंदर किल्ला विस्ताराने मोठा आहे. किल्ला मजबूत असून शत्रूच्या आक्रमणापासून बचावासाठी उत्तम जागा हेरून बांधण्यात आला आहे. गडावर मोठी शिबंदी राहू शकते. पूर्वी दारूगोळा व धान्य यांचा मोठा साठा करून गड दीर्घकाळ लढवता येऊ शकत असे. गडावर चढायला असलेली एक सोपी बाजू सोडली तर इतर सर्व बाजू दुर्गम आहेत.
किल्ल्याचा परिसर सुंदर आणि नीटनेटका आहे. गाडी पार्किग केल्यानंतर सरळ रस्ता छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मस्थानाकडे जातो. जातांना रस्त्याच्या बाजूला लष्कराच्या इमारती लागतात. उजव्या हाताला शंभुराजांच जन्मस्थान स्मारक आणि समोर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आहे. तिथुन तो सरळ रस्ता पुढे वज्रगडाकडे जातो.
परत येऊन चेकपोस्ट जवळून एक रस्ता गडा कडे जातो तेथे सैनिकांनी दिशा दर्शविलेल्या मार्गावरूनच चालावे लागते. सर्वत्र जाळी लावून रस्ते बंद केले आहेत. दिल्ली दरवज्यातून आत शिरल्यावर डावीकडे एक कडा थेट पूर्वेकडे गेलेला दिसतो. हाच तो खंदकडा. येथून एक वाट पुढे जाते. या वाटेतच आजूबाजूला पाण्याची काही टाकी लागतात. थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे एक उंचवटा लागतो. त्याच्या मागे पडक्या जोत्यांचे अवशेष आहेत. येथेच अंबरखान्याचे अवशेष दिसतात. वाटेवर पुढे गेल्यावर काही पाण्याचे हौद लागतात. या वाटेवरून पुढे जाताना एक वाट डावीकडे गेली आहे.
या वाटेने चालून गेल्यावर काही पायऱ्या लागतात. त्या आपल्याला थेट केदारेश्वार मंदिरापर्यंत घेऊन जातात. पुरंदरचे मूळ दैवत म्हणजे केदारेश्वयर. मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे. महाशिवरात्रीला हजारो भाविक येथे दर्शनाला येतात. मंदिराच्या समोरच एक दगडी दीपमाळ आहे. सभोवती दगडी फरसबंदी आहे. केदारेश्वयराचे मंदिर म्हणजे किल्ल्यावरील अत्युच्च भाग. येथून राजगड, तोरणा, सिंहगड, रायरेश्ववर, रोहिडा, मल्हारगड, कर्हे पठार हा सर्व परिसर दिसतो.
पुरंदर म्हणजे इंद्र, ज्याप्रमाणे इंद्राचे स्थान बलाढय़ तसाच पुरंदरगड. पुराणात त्या डोंगराचे नाव आहे इंद्रनील पर्वत. इंद्राचे अस्त्र वज्र, म्हणून पुरंदरचा सोबती असलेल्या किल्ल्याला नाव देण्यात आले ‘वज्रगड’!
माहिती साभार – माझी भटकंती / Maazi Bhatkanti