पुरंदरचा दख्खन दरवाजा
पुरंदर गड बुलंद आहे बेलाग आहे। प्रचंड तर घटोत्कचासारखा आहे. असा हा गड चटकन मिळावा असा प्रयत्न दिलेरखान करीत होता.महिना उलटून गेला होता. अजूनही गड खानाला चटकन मिळत नव्हता.
अन् एक चित्तरकथाच गडाच्या दक्षिणेस काळदरीत घडली। खानानं गडाचा दख्खन दरवाजा तोफांच्या सरबत्तीने अस्मानात उडविण्याचा घाट घातला. दोन प्रचंड तोफा मोठ्या कष्टाने काळदरी या गावापासून गडाच्या या दख्खन दरवाजापासून थोड्या अंतरावर असलेल्या डोंगरमाथ्यावर चढविण्यात आल्या.
खाटल्यावर पहुडलेल्या घटोत्कचानं आपला एक गुडघा उंचावावा तसा हा डोंगरमाथा दिसतो. भोवती झाडी. समोर उंचावर तो दरवाजा. हा दरवाजा जर कब्जात आला तर पुरंदरच्या थेट बाले किल्ल्यावरच आलमगिरी झेंडा लावता येईल हा दिलेरचा डाव.हे काम अत्यंत अवघड होते. पण तोफांच्या माऱ्याने दरवाजा उडवून ते साधता येईल असा खानाचा विश्वास होता.
या तोफांच्या मोर्च्यावर एक मोगली तुकडी आणि दोन प्रख्यात सरदार खानाने नेमले. दाऊदखान कुरेशी आणि रसूल बेग रोजभानी हे ते दोघे. अहिमही होते. म्हणजे हा दरवाजा आता अशा तोफांच्या आणि मोगली सरदारांच्या तोंडासमोरच उभा होता.त्या मानाने दरवाजा बऱ्याच उंचीवर गडाच्या खोबणीत होता. अन् या तोफांचा मारा दरवाज्यावर सुरूही झाला. दोन-तीन दिवस उलटले. दरवाजा पक्का होता. (अजूनही आहे.)
अन् याचवेळी एका रात्री गडद अंधारातून आणि गडाच्या अंगावर असलेल्या झाडीझुडपांतून सुमारे चारशे मावळे , काळदरीकडून गडावर उंदरासारखे या दरवाजाच्या रोखाने घुसले. चढू लागले. या मावळ्यांच्या पाठीवर धान्याची आणि बारुदाची म्हणजे तोफा बंदुकांच्या दारुची लहानमोठी पोती होती. महाराजांनी राजगडावरून पुरंदरगडावर मुरारबाजींना ही रसद गुपचूप पाठविली होती. सुमारे दोनशे पोती होती.
मोगली सैन्याच्या आणि तोफांच्या तडाख्यातून हे मावळे मोठ्या हिमतीने , कष्टाने आणि चतुराईने गड चढत होते. दाऊदखान कुरेशी आणि रसूलबेग रोजभानी यांना या चोरांच्या चतुराईची चुकूनही चाहूल लागली नाही. दख्खन दरवाज्यावरच्या मराठ्यांनी अचूकपणे दिंडीदरवाजा उघडला. ही मराठी कुमक आणि रसद गडात अगदी सुखरूप पोहोचली. दख्खन दरवाजा बंद झाला. मोगली तोफा उडचत होत्या.
रात्र संपली. दिवस उगवला. मुरारबाजींना ही नवीन कुमक पाहून केवढा आनंद झाला असेल नाही ? खास महाराजांनी गडाला पाठविलेली ही मदत.
अन् रात्र संपल्यावर दिवसाउजेेडी दाऊदखानला अन् रसूलबेगला बातमी लागली की , रात्रीच्या अंधारातून आपल्या समोरच्या झाडीतून मोठी थोरली कुमक मराठ्यांनी गडावर नेली. दोघेही सरदार थक्क झाले , सुन्न झाले , गप्प झाले , गप्पच राहिले. कारण ही आपली फजिती आपणच कशी कुणाला सांगायची! अन् जर गडाच्या उत्तर पायथ्याशी असलेल्या दिलेरखानाला ही फजिती समजली , तर तो संतापेल. अन् काय करील याचा नेम नाही , हे ते दोघे ओळखून होते. म्हणून गप्पच बसले.
तो दिवस मावळला. रात्र झाली. तोफा उडतच होत्या. अस्वलानं शिकावं तशा.
गडाच्या बाले किल्ल्यावर याच रात्री एक भयंकर धाडसी कवटाळ किल्लेदाराने योजले. त्याने चाळीस मावळ्यांना सज्ज केले. मोगलांच्या उडणाऱ्या तोफांवरच झडप घालण्यासाठी, केवढे धाडस!
या चाळीसातील काहींच्या जवळ टोकदार मोठे लोखंडी खिळे आणि हातोडे होते. ही सशस्त्र टोळी दख्खन दरवाजाच्या दिंडीतून गुपचूप बाहेर पडली. झाडीतून लपत छपत तोफांकडे उतरू लागली. या छाप्याची कल्पनाही दाऊद आणि रसूल यांना आली नाही.
या मराठ्यांनी एकदम अंधारातून येऊन मोगलांवर झडप घातली. मोगलांचा गोंधळच उडाला. झटापट पेटली. हातोडेवाल्या मावळ्यांनी गदीर् करून तोफांच्या छिदात खिळे घातले. घाव घातले. तोफा क्षणात निकामी झाल्या. काम झाले. मावळे जितक्या झपाट्याने आले तितक्याच झपाट्याने झाडीत पसार झाले. चार सहा मावळे मारले गेले.
दख्खन दरवाजाची दिंडी उघडली गेली. मावळे किल्ल्यात शिरले. दिंडी बंद झाली. खानाच्या तोफा ठार बंद पडल्या होत्या. काळगडावर मावळी कुमक पोहोचली.
आज आपल्या तोफा बेकाम होऊन निपचित पडल्या. तोबा!
या गोष्टी लपून राहिल्या नाहीत. दिलेरखानाला त्या समजल्या. तो आगीसारखा भडकला. संतापून तो या बंद पडलेल्या तोफांच्याकडे दौडत आला. दाऊद आणि रसूल गुन्हेगारासारखे मान खाली घालून उभे होते.
संतापलेल्या दिलेरखानाने आपला क्रोध शब्दात उधळावयास सुरुवात केली. अत्यंत कठोर भाषेत दाऊद आणि रसूल यांची तो अब्रू सोलून काढीत होता. थांबतच नव्हता. तो त्यांना बेवफादार , हरामखोर , नालायक , बत्तमीज अशा घनघोर शिव्यांनी झोडपीत होता. कितीतरी वेळ.
त्यांनी दोघांनी तरी किती ऐकून घ्यायचे ? जबाबदारी त्या दोघांवर होती हे खरं. पण आता त्याबद्दल किती शिव्या घालायच्या ? अखेर एक क्षण असा आला की , दाऊदखान कुरेशीने मान वर करून दिलेरखानालाच जाब विचारला , ‘ तुमच्याच छावणीत दारूगोळ्याचा सारा साठा भडकून उडाला , कोण जबाबदार होतं त्याला ? आम्ही ? की तुम्ही ?’
दाऊदचा सवाल मुँहतोड होता.
अन् मग! दाऊदखान आणि रसूल बेग यांची लांब दुसऱ्या छावणीत बदली करण्यात आली! ते परिंड्याच्या किल्ल्याकडे रवाना झाले. पुरंदर झुंजतच होता.
PC -JIDDIMARATHA
माहिती साभार
दुर्ग मावळा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य – रजिस्टर