पुरंदरचा तह व मुरारबाजिंची झुंज –
शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानास शास्त केली आणि सुरतेची लुट करून मुगल साम्राज्यास उघड उघड आव्हान दिले . शिवाजी महाराज आदिलशाही, निजामशाही , मुगालशाही यांचे भूभाग जिंकून स्वराज्यात दाखल करत होते. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य विस्तारास पायबंद करण्यासाठी व सुरत लुटीचा बदला घेण्यासाठी औरंगजेबाने त्याच्या ४७ व्या वाढदिवशी शुक्रवार दिनांक ३० सप्टेंबर १६६४ रोजी मिर्झा राजे जयसिंग यांना “ सिवाला दफे करण्याची “ महत्वपूर्ण कामगिरी सोपवली.(पुरंदरचा तह)
मिर्झा राजे जयसिंग हे सूर्यवंशी अंबर राजघराण्यातील राजपूत व प्रभू रामचंद्राचे वंशज . अकबर बादशहाचे सेनापती मानसिंग यांच्यापासूनच मुगलांचे मांडलिक होते. मुगल घराण्याशी सोयरिक असणारे तसेच मुगलांनी दिलेला “ मिर्झा ” हा किताब भूषण मानणारे हे घराणे . मिर्झा राजे जयसिंग हे पराक्रमी, मुत्सदी व बादशाही निष्ठावंत . मुगलगादीच्या वारसा हक्काच्या लढाईत औरंगजेब मुगल गादीवर बसण्यास मिर्झा राजे जयसिंग यांचे योगदान होते . मिर्झा राजे जयसिंग १४००० फौजफाटा, तोफखाना व मुबलक खजिना अनेक नामवंत सरदार यांच्यासह स्वराज्याचा घास घेण्यासाठी मोहिमेवर निघाला. दुय्यम सरदार दिलेरखान ५००० पठाणी फौजेसह त्यांच्या मदतीला देण्यात आला. प्रभू महादेवाचे निस्सीम भक्त असणाऱ्या जयसिंगानी मोहिमेत यश मिळावे म्हणून कोटीचंडी यज्ञ करून मोहिमेस प्रारंभ केला.
पुरंदर मोहिमेस प्रारंभ:-
९ जानेवारीला १६६५ नर्मदा ओलांडून १९ जानेवारीला मिर्झाराजे बऱ्हाणपूरला दाखल झाले व महाराजांची व स्वराज्याची कोंडी करण्यास सुरवात केली. जावळीचे मोरे मिर्झाराजे जयसिंगाना सामील झाले. अफझलखानाचा मुलगा फाझलखान , सुप्याचे जहागीरदार , माणकोजी धनगर हे सरदार मिर्झाराजे जयसिंगाना सामील झाले. पुरंदर किल्याच्या पायथ्याशी असलेले मराठा तोफखान्यातील आत्माजी व कहर कोळी हे बंधू त्यांच्या ३००० जमावासह मिर्झाराजे जयसिंगाना सामील झाले. गोव्याचे पोर्तुगीज , जंजिर्याचा सिद्धी यांच्याशी मैत्रीचा करार केला. ३ मार्च रोजी मिर्झाराजे पुण्यात दाखल झाले. मराठे हे गनिमीयुद्धात पारंगत असून लढवय्ये आहेत याची जाणीव मिर्झाराजे यांना होती त्यामुळे ठिकठिकाणी लष्करी ठाणी उभारून महाराजांना स्वराज्याच्या आत कोंडण्यास सुरवात केली. ३० मार्च रोजी दिलेरखानाच्या सैन्यावर मराठ्यांनी अचानक गनिमी हल्ला करून मोगली सैन्याचि कापाकापी करून मराठा सैन्य पुरंधर किल्याकडे माघारी परतले. दिलेरखानाने सावध होऊन मराठा सैन्याचा पाठलाग करीत मोगली सैन्यासह पुरंधरच्या पायथ्याशी येऊन ठेपला. मिर्झाराजेयांना हि बातमी समजताच मुलगा किरातसिंह व इतर सरदार यांच्यासह ३००० सैन्य व तोफखाना घेऊन दिलेरखानाच्या मदतीसाठी पुरांदाराकडे रवाना केले. शुक्रवार ३१ मार्च १६६५ रोजी पुरंदर मोगली फौजेने वेढला गेला व पुरंदरच्या युद्धास सुरवात झाली.
पुरंदराचा विस्तार हा एकूण ४ मैलांचा . गडाच्या पूर्वेस वज्रगड व पश्चिमेस रुद्र्माळ हे उपदुर्ग व मुख्य किल्ला माची आणि बालेकिल्ला अश्या दोन भागात विभागला होता. पुरंदरची एक कमकुवत बाजू म्हणजे वज्रगड हा वज्रगड जर शत्रूच्या हाती आला तर पुरंदरावर तोफा डागणे सहज शक्य होते त्यामुळे मिर्झाराजेनी वज्रगडावर हल्ला करण्याचे ठरवले. पुरंदरावर २००० मराठा सैन्य व वज्रगडावर ३०० मराठा सैन्य मुरारबाजी देशपांडे यांच्या नेतृत्वात युद्ध करण्यास सज्ज होते. अबुदुल्लाखान , फतह लष्कर , हवेली या तीन अजस्त्र तोफा पुरंदरच्या पायथ्याशी आणल्या गेल्या आणि त्यांनी पुरंदरावर अग्नीचा वर्षाव सुरू केला त्यामध्ये १३ एप्रिलला वज्रगडाचा बुरुज ढासळला व मोगली सैन्य वज्रगडाच्या तटबंदीत शिरले व मराठा सैन्याशी हाताघातीची लढाई जुंपली गेली परंतु अखेर मराठा सैन्याने मिर्झाराजांन समोर शरणागती पत्करली. १४ एप्रिलला सर्व शरणागत मावळ्यांना अभय देवून सोडून देण्यात आले व वज्रगड मोगलांच्या ताब्यात गेला. वज्रगड पडल्याची माहिती शिवाजी महाराजांना मिळताच महाराजांनी २० एप्रिल रोजी मराठ्यांची एक तुकडी दारुगोळा घेऊन पुरंदरला पाठवली हि तुकडी मुगल सरदार दाउदखान याचा वेढा चुकवून पुरंदरी दाखल झाली . मिर्झाराजांना हि बातमी समजताच त्यांनी दाउदखान याची कानउघाडणी केली.
दाऊदखान , कुत्बूदिखान यांनी स्वराज्यात धुमाकूळ घालण्यास सुरवात केली. जाळपोळ , लुटालूट , शेतकऱ्यांच्या शेतीतील पिकांचा नाश , गरीब रयतेस व जनावरे कैद करणे अश्याप्रकारे शिवाजी महाराजांवर दबाव आणण्यास सुरवात केली. मराठ्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत सलग तीन रात्री पुरंदरवरून उतरून मोगल सरदार रसुलबेग व मिर्झाराजां पुत्र किरतसिंह व इतर मोगल फौजेवर अकस्मात हल्ला केला करीत मोगलांची एक तोफ निकामी केली या चकमकीत मोगल व मराठा सैनिक मारले गेले. मिर्झाराजांनी वज्रगडावरून पुरंदरच्या माचीवर तोफांचा मारा चालू केला. परंतु सफेद बुरुज व कला बुरुज हा मारा सहन करत उभे होते . सफेद बुरुज पाडल्याशिवाय पुढे जाणे अशक्य हे ओळखून त्या बुरजाच्या उंचीचा एक दमदमा ३० में रोजी तयार करून त्यावर तोफा चढवण्यात आल्या. मोगल सैन्य सफेद बुरूजाखाली खंदक खोदुन सुरुंगाने बुरुज उडवून देण्याचा प्रयत्न करत असतानाच अचानक सफेद बुरजावरील मराठ्यांच्या दारूगोळ्यांचा स्फोट होऊन बुरजावरील सुमारे ८० मराठे आगीने भाजले गेले. मोगल सैन्यावर झालेली हि दैवी कृपादुष्टी. मोगल सैन्य आता काळा बुरुजाच्या दिशेने निघाले त्यांनी काळ्या बुरूजासमोर दमदमा उभारून त्यावरून तोफांचा मारा केला या माऱ्यापुढे मराठे सैन्य माघार घेत बालेकील्याकडे निघून घेले. २ जून रोजी पुरंदर माची व ५ बुरुज मोगलांच्या ताब्यात आले. युद्धाचे पारडे व परिस्थिती मोगलांच्या बाजूने आहे हे पाहून शिवाजी महाराजांनी मिर्झाराजांशी तहाची बोलणी करण्यास सुरवात केली परंतु मिर्झाराजांनी ताठर भूमिका घेत शिवाजींनी संपूर्ण शरणागती घेत शरण यावे अशी अट घातली. शिवाजी महाराजांनी विजापूर आदिलशाहाशी मैत्रीसंधीची बोलणी चालू केली . मिर्झाराजांना हि गुप्त बातमी समजताच विजापूर व मराठा सैन्य एकत्र आल्यास आपला निभाव लागणार नाही हे ओळखून शिवाजी महाराजांना निरोप पाठवला “ तुम्ही शिसोदे राजपूत. आम्ही तुम्ही एकाचे एकच आहोत . तुम्ही भेटीस येणे . तुमचे सर्व प्रकारे बरे करू .
शिवाजी महाराजांनी २० में रोजी रघुनाथभट पंडितराव यांना आपला वकील म्हणून मिर्झाराजांकडे पाठवले परंतु मिर्झाराजांनी शिवाजी शीवाय इतर कोणाशीही वाटाघाटी करण्यास नकार देऊन. शिवाजी महाराजांनी निशस्त्र होऊन शरणागती पत्करावी अशी भूमिका घेतल्याने रघुनाथभट माघारी राजगडावर आले. शिवाजी महाराजांनी पुन्हा रघुनाथभट पंडितराव यांना मिर्झाराजांकडे पाठवले व संभाजीराजांना आपल्यकडे पाठवतो असा निरोप दिला परंतु ह्याहीवेळी मिर्झाराजांनी शिवाजी शीवाय इतर कोणाशीही वाटाघाटी करण्यास नकार दिल्याने रघुनाथभट माघारी राजगडावर आले. अखेर नाईलाजेणे शिवाजी महाराज मिर्झाराजांच्या भेटीस तयार झाले त्याआधी ९ जून रोजी मिर्झाराजांकडून शपथक्रिया करून स्वत:च्या सुरक्षिततेची हमी घेतली. रविवार ११ जून रोजी मिर्झाराजांची व शिवाजी महाराजांची भेट निश्चित झाली.
मुरारबाजिंची झुंज –
शिवाजी महाराजांबरोबर तहाची बोलणी चालू असतानाच पुरंदराचा ताबा घ्यावा व मराठ्यांची होणारी कत्तल पाहून शिवाजीराजांनवर दबाव आणून तह आपल्या इच्छेनुसार घडवून आणावा अशी योजना मिर्झाराजांनी आखली .त्यानुसार ११ जूनला दिलेरखान आपल्या सैन्यानिशी मिर्झाराजांच्या इशाऱ्याची वाट पाहत थांबला असताना अचानक मुरारबाजी अवघ्या ७०० मावळ्यांसह दिलेरखानाच्या ५००० पठाणी फौजेवर तुटून पडले. अचानक झालेल्या या हल्यात ५०० पठाण मारले गेले . मुरारबाजिंनी व मावळ्यांनी रुद्रावतार करून तांडव करण्यास सुरवात केली यात अनेक पठाण मारले गेले. मराठ्यांच्या या हल्यामुळे मोगली फौज मागे सरकली . मुराराबाजीनी दिलेरखानावर चढाई करण्याच्या निश्चय करून त्याच्या रोखाने निघाले. परंतु मुरारबाजी हजारो शत्रुच्या घेरावात सापडले. हजारो शत्रूच्या गराड्यात लढणारे मुरारबाजी पाहून दिलेरखान आश्चर्यचकित झाला. मुरारबाजींचा “ मर्दाना शिपाई “ असा गौरव करत त्यांना “ कौल माग म्हणजे तुला नावाजतो “ असे प्रलोभन दाखवत त्यांना स्वतःकडे वळवण्याचा प्रयत्न केला. परंतु स्वामिनिष्ठ मुरारबाजी यांनी “ तुझा कौल म्हणजे काय ? मी शिवाजीराजांचा शिपाई . तुझा कौल घेतो कि काय ? “ असे उदगारून दीलेरखानाच्या रोखाने निघाले. दिलेरखानाच्या तीरकामठ्याच्या हल्याने मुरारबाजी धारातीर्थी पडले. शत्रू दिलेरखानाने “ असा शिपाई खुदाने पैदा केला ! “ असे उदगार काढत आपल्या शिरावरील पगडी काढून ठेवत “ गड घेईन तेव्हाच पगडी बांधेन “ अशी प्रतिज्ञा केली . मुरारबाजींसोबत ३०० मावळे धारातीर्थी पडले व उर्वरित ४०० मावळेे गडावर परतले व त्यांनी “ एक मुरारबाजी पडला तरी काय झाले.? आम्ही तैसेच शूर आहोत . ऐसी हिंमत धरून भांडतो “ असे उदगारत मोगली सैन्यास आव्हान दिले.
पुरंदराचा तह –
शिवाजी महाराज महादेवाचे व आई भवानीचे दर्शन घेऊन जिजामाता व सत्पात्री ब्राम्हणाचे आशीर्वाद घेऊन गडावरून खाली उतरले व मिर्झा राज्यांच्या छावणीत दाखल झाले. मिर्झा राजांनी “ जर सर्व किल्ले आमच्या ताब्यात देण्याची तयारी असेल तरच यावे अन्यथा तेथूनच परत जावे “ असा निरोप पाठवला. शिवाजी महाराजांनी “ मी आता मोगलांची चाकरी पत्करली असून सर्व किल्ले मोगली साम्राज्यात देण्यास तयार असल्याचे दर्शविले “ . मिर्झा राजांची मागणी मान्य होताच शिवाजी महाराज मिर्झा राज्यांच्या छावणीत दाखल झाले. मिर्झा राजांनी शिवाजी महाराजांना आलिंगन देवून स्वतःजवळ बसवले तेथून पुरंदरावरील लढाई शिवाजी महाराजांच्या स्पष्ट दृष्टीक्षेपात होती . गडावरील माणसांची होणारी प्राणहानी टाळण्यासाठी शिवाजी महाराजांनी मिर्झा राजांना विनंती केली व आपल्या ताब्यातील किल्ले मुगलाना देण्याचे मान्य केले. त्यानुसार सोमवार १२ जून रोजी पुरंदर मोगलांच्या हवाली करून मराठा सैन्य जड अंत:करणाने गडावरून खाली उतरले.
प्रदीर्घ चर्चा व वाटाघाटीनंतर शिवाजी महाराज व मिर्झाराजे जयसिंग यांच्यात १३ जुन १६६५ रोजी इतिहास प्रसिद्ध अश्या पुरांदर तह चा पाच कलमी मसुदा तयार करून त्यावर सर्वसहमती झाली.
कलम १ :- शिवाजी महाराजांकडे लहान-मोठे १२ किल्ले , त्यातील १ लाख होन ( ५ लाख रुपये ) उत्पनाचा मुलुख शिवाजी महाराजांकडे राहावा. शिवाजी महाराजांनी मोगलांनविरुद्ध बंड करू नये व मोगली मुलुख लुटू नये.
कलम २ :- शिवाजी महाराजांचे २३ लहान-मोठे किल्ले व चार लाख होन उत्पनाचा मुलुख मोगल साम्राज्यास जोडण्यात यावा.
कलम ३ :- दाख्खनच्या सुभ्यात कोणतीही शाही कामगिरी शिवाजी महाराजांवर सोपवल्यास टी त्यांनी पूर्ण करावी.
कलम ४ :- शिवाजीपुत्र संभाजीराजे यांनी मोगलांची पंचहजारी मनसबदारी बहाल करण्यात येईल . त्यांच्या वतीने ( शंभूराजे ८ वर्षाचे असल्याने ) प्रती-शिवाजी नेताजी पालकर यांनी सदैव दख्खन सुभेदाराच्या तैनातीत राहावे.
कलम ५ :- विजापूर तळ कोकणातील ४ लक्ष व विजापुरी बालघाटी ५ लक्ष होन उत्पनाचा मुलुख शिवाजी महाराजांना बहाल करण्यात येईल . व या बदल्यात शिवाजी महाराजांनी औरंगजेब बादशहास ४० लक्ष होन खंडणी दरवर्षी ३ लाख होनाच्या हप्त्याने बादशहास द्यावी.
शिवाजी महाराजांकडील किल्ल्ले :- राजगड , तोरणा , लिंगाणा ,सुधागड ( भोरप ) , तळेगड , महाडगड , घोसाळा , अशेरी , पाली ( सरसगड ) , रायगड , कुवारीगड ( कोरीगड ) , उदयदुर्ग ( राजमाची )
मोगलांना दिलेले किल्ले :- वज्रगड ( रुद्र्माळ ) , पुरंदर , कोंढाणा , रोहिडा, लोहगड , विसापूर , टंकी ( तुंग ), खडकाळा, तिकोना, माहुली , प्रबळगड ( मुरंजन ) , सरसगड ( खीरदुर्ग ) , भंडारदुर्ग , पलाशगड ( तुलसीखोल ), नळदुर्ग , अंकोला ( खाईगड ) , मार्गगड ( अत्रा ) , कोहज , वसंतगड , माणिकगड ( नंगगड ) , कर्नाळा , सोनगड , मानगड
पुरंदरच्या या पुरंदरचा तह स औरंगजेब बादशाहची अधिकृत शाही मंजुरी मिळवण्यास वेळ लागणार होता. मिर्झाराजांच्या हेरांनी त्यांना बातमी दिली त्यानुसार शिवाजी महाराजांनी राजगड सोडताना आपल्या किल्यांचा व मुलखाचा कडेकोट बंदोबस्त करून ठेवला होता व आपण मिर्झा राजांकडून लवकर परत न आल्यास मृत्यू पावलो असे समजून आपल्या अधिकारी व सहकारी यांनी स्वराज्याचे सर्वोतपरी रक्षण करावे अशी सक्त ताकीद दिली होती . मिर्झा राजांनी हमी देवून देखील या तहास वेळ लागला असता तर इतर सरदार , पाळेगार मिर्झा राजांच्या वचनावर विसंबून मोगलांना सामील झाले होते त्यांचा विश्वास उडाला असता . त्यामुळे मिर्झाराजा जयासिंगानी स्वतःच्या जबाबदारीवर हा तह मंजूर करून घेतला.
त्या रात्री मिर्झा राजांनी व शिवाजी महाराजांनी एकत्र भोजन करून १४ जून रोजी शिवाजी महाराजांनी मिर्झाराजांचा निरोप घेतला व कोंडाणा किल्ला मुगलांच्या हवाली करून १५ जून रोजी राजगडावर दाखल झाले. तहाच्या अटी पाळल्या जाव्यात यासाठी १७ तारखेस मुगल सरदार उग्रसेन कच्छवा यांच्या हवाली ओलीस म्हणून संभाजी राजांची पाठवणी मिर्झा राजांच्या शिबिरात केली गेली. तहाच्या अटींचे पालन होत किल्ले मिर्झा राजांच्या ताब्यात येताच संभाजी राजांची सुटका करण्यात आली. मोगलांनी गड ताब्यात येताच तेथे मोगली किल्लेदार नेमले.
२३ जूनला गुलाबी ईदच्या दिवशी पुरंदर विजयाची व शिवाजी महराजांच्या शरणागतीची बातमी औरंगजेबाला मिळाली . मिर्झा राजांनी दख्खन विजायाचे प्रतिक म्हणून व औरंगजेबाची मर्जी संपादन करण्यासाठी पुरंदरच्या मोहिमेवरील सर्व खर्च आपल्या खाजगी रक्कमेतून वर्ग केला. औरंगजेबाने आनंदाने जोरजोरात शहाजाणे वाजवण्याचे फर्मान दिले. मिर्झा राजांना सप्तहजारी मनसब , मानाचा पोशाख, सुवर्ण नक्षीकाम असलेली तरवार, हत्ती देवून गौरवण्यात आले. दिलेरखानास पंचहजारी मनसब देण्यात आली .तसेच इतर सरदारांचा गौरवसत्कार औरंगजेबाने केला.
पुरंदरच्या या पुरंदरचा तह ने स्वराज्यावर मोगली परचक्र येऊन स्वराज्य काही काळासाठी मोगली पारतंत्र्यात जखडून गेले. समकालीन विजापूर कवी मुल्ला नुस्त्रती पुरंदर किल्याचे वर्णन त्याच्या अलीनामा या काव्यमय ग्रंथात पुढीलप्रमाणे करतो :-
सिवा का च एक गड जॉ अवगड अथा
बुलंदी में अफलाक ते चड अथा /
देखत जिस की वसअत कहीं दुर-र्बी
फलक सर पो ले ज्यूं खडां है जमीं /
वसन्त गड पो चौ-गिर्द हो बे-करां
दिसे ज्यूं हवा पर बसे एक जहाँ /
लगी हर गली अब अदिक सलसबील
हर एक ठार यक मिस्त्र यक रुदे-नील /
उतर कर सरग ते कधीं इंद्र आए
इसी गड पो रह वक्त अपना गमाए /
शिवाजीचा तो एक गड अवघड होता. तो उंचीमध्ये आकाशापेक्षा श्रेष्ठ होता. दूरस्थ पाहणाऱ्याला त्याची विशालता पाहून असे वाटे कि आकाश डोक्यावर घेऊन जणू पृथ्वी उभी आहे. गडावर वसंतऋतू चहूकडे बहरलेला दिसे. त्यामुळे असे वाटे की हवेवरच एक जग वसलेले आहे. गडावरील प्रत्येक गल्लीत स्वर्गाच्या नदीप्रमाणे पाणी होते. प्रत्येक ठिकाण मिस्त्र , इजिप्त सारखे संपन्न आहे. प्रत्येक ठिकाणी नील नदीचा प्रवाह वाहत आहे. इंद्र स्वर्गातून उतरून , अधून मधून याच गडावर राहून , आपली सुखकालक्रमना करीत असतो.
संदर्भ :-
शककर्ते शिवराय :- विजयराव देशमुख
समरधुरंधर :- विद्याचरण पुरंदरे
दख्खनी हिन्दीतील इतिहास व इतर लेख :- देवीसिंग व्यंकटसिंग चौहान
छायाचित्र साभार विकिपीडिया
नागेश सावंत