जुन्नर तालुक्यात आढळली चौथी पुष्करणी आणि शिवपिंड.
जुन्नर तालुक्याला फार मोठे धार्मिक महत्त्व आहे याचे भक्कम अनेक पुरावे तर आहेतच परंतु काही पुरावे तर त्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासारखे नक्कीच आहे. जुन्नर तालुक्यात खालील छायाचित्रात आढळून येणारी ही चौथी पुष्करणी आहे. मला तरी वाटतं की सर्वांत जास्त एकाच तालुक्यात पुष्करणी आढळून येणारा जुन्नर तालुका महाराष्ट्रातील एकमेव तालुका असावा. जुन्नर तालुक्यात बेल्हे गावात पुर्वेकडे, चावंंड किल्ल्यावर , निमगिरी किल्ल्याच्या दक्षिण पायथ्याला पुष्करणी आढळून येतात. परंतु या वरील तीन पैकी ज्या पुष्करणी आणि शिवपिंड दिसतात त्यापैकी ही पुष्करणी वेगळ्याच स्वरूपात दिसून येते. याबाबत संशोधन होणे नक्कीच गरजेचे आहे.
धामणखेल डोंगरावर खंडोबा मंदिराच्या अगदी जवळच दक्षिणेला ही पुष्करणी दिसून आली याचे श्रेय जाते ते अविनाश भाऊ कोंडे व त्यांच्या मुलाला. कारण आपल्या सकाळची सुरुवात हे बापलेक हातात टिकाव व खोरे आणि घमेले घेऊन या पुष्करणी संवर्धनातून करत होते. मला पण यांच्या सोबत थोडाफार संवर्धनात हातभार लावता आला व मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली हे माझं भाग्यच. नंतर यांच्या मदतीला धावून आली ती अभिषेक भाऊ वर्पे आणि टिम. मग काय पाहता पाहता धामणखेल गावचे विविध संस्था व ट्रस्टचे पदाधिकारी या संपूर्ण कार्यात सहभागी झाले व धामणखेल गावच्या ऐतिहासिक वारसेत एक आगळीवेगळी भर पडली.
खरेतर ग्रामस्थांनी उन्हाळ्यात वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी व पावसाळ्यात येथील ऐतिहासिक टाकित पाणी साचून रहावे म्हणून त्यातील माती काढली असता हे सर्वकाही दृष्टीक्षेपात आले. या टाकीत एक शिवपिंडी पण आढळून आली आहे. तसेच जुन्या विटांचे,खापरांचे तुकडे पण या मध्ये आढळून आले आहे विशेष म्हणजे याच पुष्करणी मध्ये उत्तरेकडून एक साधारण पाच फुट लांबीचे व खोलीचे व अडिच फुट रूंदिचे दुसरे टाके पण आढळले आहे. विटा व खापरांच्या तुकड्यांचे संशोधनासाठी गावकऱ्यांनी जतन केले आहे. याबाबत थोडं मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली हे माझं भाग्यच. पुढील काळात याबाबत संशोधन व्हावे हिच गावकऱ्यांची इच्छा असुन जुन्नर तालुक्यातील ऐतिहासिक वारसेत एक नवीन भर पडेल असे त्यांचे मत आहे. सह्याद्रीचे सौंदर्य फेसबुक ग्रुप परीवारातर्फे ग्रामस्थ व तेथील तरुणाईचे खुप खुप कौतुक की आपण वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्थातर केलीच व गावचा इतिहास पण उजागर केलात.
छायाचित्र/ लेख – रमेश खरमाळे
माजी सैनिक खोडद